
Artificial Insemination : व्यावसायिक पशुपालन करताना, कळपाची सुफलनता राखण्यासाठी उत्तम प्रजनन व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी कळपातील माद्यांचे लवकर वयात येणे, माजाची लक्षणे दाखविणे आणि त्यानुरूप उत्तम वंशावळीच्या वळूने नैसर्गिकरीत्या किंवा कृत्रिम रेतन आवश्यक असते. याशिवाय आर्थिक लाभाच्या दृष्टीने दोन वेतातील काळ, भाकड काळ महत्त्वाचा घटक असतात. व्यवस्थापनात विलंब किंवा दुर्लक्ष झाल्यास नाहक खर्च वाढतो.
म्हैसपालन करताना हंगामी आणि मुका माज दर्शविणारी म्हैस ओळखणे आणि रेतन करणे जिकिरीचे काम होऊन बसते. म्हैसपालनात प्रथम विण्याचे वय व दोन वितांतील अंतर अधिक असणे या काही प्रमाणात समस्या आहेत. तसेच अतिरिक्त नर वासरे किंवा रेड्यांची पैदास सुद्धा म्हैसपालकास नकोशी असते. मात्र जागरूक म्हैसपालकाने सुयोग्य प्रजनन व्यवस्थापन केल्यास वरील अडचणींवर मात करता येऊ शकते.
आपल्या गोठ्यातील जनावरांच्या ठळक नोंदी ठेवल्यास आपल्याला प्रजनन गुणधर्म नेमकेपणाने सांगता येतील आणि कुठे विलंब होतो आहे हे सहज लक्षात येईल. प्रजनन व्यवस्थापनात कृत्रिम रेतन प्रमाणे नवनवीन तंत्रज्ञान जसे लिंगनिश्चित रेतमात्रेमुळे (सेक्स सॉर्टेड सीमेन) केवळ माद्यांची (दूध उत्पादनासाठी) किंवा नराची (मांस उत्पादनासाठी) निर्मिती शक्य आहे. विशिष्ट लिंगाची वासरे जन्माला येणे ही खर्च बचत करणारी गोष्ट आहे.
कृत्रिम रेतनासारख्या तंत्रज्ञानाने आनुवंशिक सुधारणा शक्य आहे. गोठ्यातील वातावरणात होणारे बदल किंवा म्हशीतील मुका माज ओळखण्यासाठी आता संगणक तंत्रज्ञानधारीत उपकरण (आर्टिफिशियल हीट डिटेक्टर नोज) बाजारात उपलब्ध आहेत.अनेकदा म्हशींचे गोठ्यात ठाणबंद रीतीने संगोपन केले जाते.
पुरेसा सूर्यप्रकाश नसणे, वायुविजन न होणे, कोंदट हवामान असणे, अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे म्हशींची आवश्यक शारीरिक हालचाल न झाल्याने उत्पादन प्रजनन क्षमता प्रभावित होते. म्हैसपालनात मुक्त संचार गोठा ही संकल्पना मूळ धरू लागली आहे, ज्यामुळे पुरेशी हालचाल करता येते. उत्पादन व प्रजनन क्षमता जोमाने वाढीस लागू शकते. माज ओळखणे सोपे होते.
पैदास धोरण
काही पशुपालक हौसेखातर हरियाना आणि गुजरात या राज्यांतून जास्तीचा खर्च करून मुऱ्हा किंवा जाफराबादी म्हशी विकत आणतात. येताना वाहतुकीच्या ताणतणावमुळे म्हशींची रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होते. येथे आल्यानंतर म्हशी थायलेरियासारख्या आजारास बळी पडतात आणि दूध उत्पादनात घट दिसू लागते. यामुळे म्हैसपालक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचतो. यासाठी खूप खर्च न करता आपल्या गोठ्यात उच्च अनुवंशिकतेची रेडी/वगारीची पैदास करण्यासाठी म्हशींचे पैदास धोरण समजून घेणे गरजेचे आहे.
अधिकाधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी व्यवस्थापन, आनुवंशिकता, पोषण, आरोग्य, उत्पादन निर्मिती प्रक्रिया अशा प्रमुख बाबींचा समावेश होतो. आनुवंशिक पातळीवरील सुधारणा ही सुजाण पशुपालकांसाठी महत्त्वाची आहे. आनुवंशिक सुधारणा ही पशुधनाच्या जनुकीय पातळीवर होत असून कायमस्वरूपी राहते. एका पिढीत झालेली सुधारणा आनुवांशिकतेने पुढल्या पिढीत हस्तांतरित होत असते. वासरांचे जन्मदाते असलेल्या म्हशी, रेडा यांचे गुणधर्म त्या वासरात उतरतात.
आपल्या पशुधनाचे दूध उत्पादन, मांस उत्पादन, कार्यशक्ती इत्यादी गुणधर्म नियंत्रित करण्याचे काम शरीरातील अतिसूक्ष्म अशी जनुके करतात. प्रत्येक जातीचे गुणवैशिष्ट्ये त्यांच्यातील विविध जनुके नियंत्रित करीत असतात. आनुवंशिक पातळीवर सुधारणा करण्यासाठी विशिष्ट गुणधर्मधारक जनावरांचा संकर करून किंवा एखाद्या जातिवंत जनावरांचा उत्पादनक्षमतेचा विकास करण्यासाठी त्या जातिवंत जनावरांना ‘निवड पैदास’ पद्धतीचा अवलंब केल्यास होणारी पिढी आपल्याला पाहिजे त्या उत्पादनक्षमताधारक गुणधर्मांनी तयार होते. आपल्या राज्यातील त्या त्या भागातील म्हशीच्या जातीची निवड प्रक्रियेतून अनुवंश सुधारणा करून दूध उत्पादन क्षमतेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ज्या म्हशी गावठी/ गावरान किंवा शास्त्रीय भाषेत अवर्णीत (Non descript/ND) या गटात मोडतात, ज्यांच्यातील गुणधर्म कुठल्याच जातिवंत जनावरांशी जुळून येत नाहीत. त्याचबरोबर ज्यांची उत्पादनक्षमता खालावलेली असते, अशा गटातील जनावरांसह उत्पादनक्षमता अधिक असलेल्या जनावरांचा संकर घडविणे म्हणजे पत सुधारणा. म्हशीमध्ये पत सुधारणा (Grading up) ही पद्धत अवलंबिली जाते. पत सुधारणा पद्धतीत गावठी म्हशींचा इतर स्थापित जातींच्या म्हशीसोबत संकर करतात. जेणेकरून पुढील पिढीत स्थापित जातीच्या म्हशींचे अर्धे गुणधर्म आढळतील. कृत्रिम रेतनासाठी सिद्ध वळूच्या रेतमात्रा सर्वच शासकीय पशूंच्या दवाखान्यात उपलब्ध आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.