महारुद्र मंगनाळे
तीन एकर सोयाबीनच्या रानावर ज्वारी पेरलीय. पाणी दिलेलं असल्याने मस्त उगवण झालीय. उगवणीमध्ये ८० टक्के सोयाबीन आणि २० टक्के ज्वारी असं प्रमाण आहे. हे बघितल्यावर पहिल्यांदा पोटभर हसलो. एका एका वावरात किमान ५० किलो सोयाबीन पडलं असावं. पहिला विचार मनात आला, ज्वारीऐवजी सोयाबीनचं घ्यावं. सोयाबीनवर सोयाबीन घेतलं तर, ते उत्पादन नाही देणार. शिवाय पुन्हा जूनमध्ये इथं सोयाबीनचं पेरायचंय. हे काही मनाला पटेना. काय करावं?
नेहमीच्या शेती करणाऱ्या दोन-तीन मित्रांना बोललो. त्यांच्याकडं याचं उत्तर असतं, असं नाही. माझ्या समाधानाचा भाग म्हणून बोलतो. एकाच मत. कोळपून, खुरपून घ्यावं. मी म्हटलं, कोळपणीला भाड्याने बैल मिळतील अशी शक्यता कमी आहे. तरीही काहीतरी करून कोळपणी करेन पण खुरपणी कशी परवडेल? एकाच वावराला कमीतकमी पाच-सहा हजार रूपये लागतील तो खर्च कसा करायचा? शिवाय मजूर मिळण्याची खात्री नाही. त्यापेक्षा पाळी घालून सगळं मोडून टाकलं तर कसं राहिलं?
तो बोलला, हे पण काही वाईट नाही. उत्पन्न निघण्याची काहीच खात्री नसेल तर, पाळी घालून रान मोकळं ठेवलेलं बरं! दुसऱ्या मित्राला म्हटलं, सोयाबीनचं तण जाळायला टुफोरडी हे तणनाशक मारलं तर कसं राहिलं? तो बोलला, नको लई बेकार तणनाशक आहे. ज्वारी पण मार खाईल. मी म्हटलं, कोळपणी, खुरपणी परवडत नाही, ते सहज शक्यही नाही. मग दुसरं काय करू? तो बोलला, मोडून टाक मग?
मी म्हटलं, तो पर्याय तर मला आधीच सुचलाय. पण नरेश म्हणतोय, तीन वेळा पाळी घालून रान तयार केलं. खत घालून बियाणं पेरलं. तीन वेळा रात्री-बेरात्री पाईपं बदलून पाणी दिलयं. हे कसं मोडू? त्याला मी काय उत्तर देऊ? मित्र बोलला, नरेश म्हणतोय ते खरचं आहे. मी म्हटलं, तु तर दोन्हीकडून बोलतोयस. हे पण बरोबर आहे आणि ते ही चुकीचं नाही, असं म्हणतोयस.
मित्र बोलला, मी तुझेच शब्द तुला ऐकवतोय. कुठलाही निर्णय घेतला तरी, तो पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चुकीचा असू शकत नाही. शेतीतला कितीही तज्ज्ञ असला अगदी डॉक्टरेट केलेली असली तरी, त्याच्याकडंही याचं नेमकं उत्तर नाही. तू जो काही निर्णय घेशील तेच त्याचं उत्तर असेल. पण ते चूक की बरोबर, हे ठरायलाही वेळ जावा लागेल.
मी ही चर्चा सविताला सांगून म्हटलं, तुला जे वाटतं की, शेतीत आपण अनुभवातून का शिकत नाही. असं वाटणं योग्य आहे. पण वरवर तिच परिस्थिती आहे असं वाटत असलं तरी, त्यात वेगळेपण असतं. तो अनुभव तसाच्या तसा नसतोच. शिवाय आजची परिस्थिती उद्या, परवा काय राहिल तेही सांगता येत नाही. त्यामुळं कितीही विचारपूर्वक निर्णय कोणीही घेतला तरी, तो योग्य ठरेलच याची खात्री देता येत नाही. एवीतेवी निर्णय चुकणारच असेल तर, तो नरेशवर सोपवू. त्याला जे करायचं ते करू दे.
तिनं होकार दिला. रब्बी पेरणीनंतर अशी गंमतीशीर परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झालीय. कोणालाही निर्णय घेणं कठीणच आहे. मुक्तरंगमध्ये असं होऊ शकत नाही. तिथं प्रत्येक निर्णय मी घेतो. त्याबद्दल चर्चा करण्याची गरज पडत नाही. तिथं मी घेतलेल्या निर्णयामुळं नुकसान झालं, असं होऊ शकत नाही. तिथं बांधलेले परिस्थितीचे अंदाज चुकत नाहीत. दोन्हीत हा मोठा फरक आहे. शेतीकडं व्यापारी दृष्टीने बघा म्हणणं खूप सोप आहे. पण व्यापारासारखा निर्णय करता येत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.