Pest Management : गेंड्या भुंगा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

Integrated Pest Management : गेंड्या भुंगा ही नारळ, तेलताड, खजूर, शिंदी, ताड इ. नारळवर्गीय बागांमध्ये सुमारे वर्षभर आढळणारी कीड आहे. नवीन लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात भुंग्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
Weed Integrated Management
Weed Integrated ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. संतोष वानखेडे, डॉ. किरण मालशे, डॉ. विनायक जलगावकर

किडीची ओळख व अवस्था

एकूण चार अवस्था : गेंड्या भुंग्याच्या अंडी, अळी व कोष या तीन अवस्था शेणखत तसेच कुजलेल्या पालापाचोळ्यामध्ये आढळतात, तर भुंगा ही चौथी अवस्था झाडांवर दिसून येते.

प्रौढ भुंगा : मध्यम आकार, गडद तपकिरी किंवा काळा, डोक्यावर पाठीमागच्या बाजूला गेंड्यासारखे एक शिंग. मादी सरासरी ३.८८ मिमी. लांब व १९ मिमी. रुंद, तर नरभुंगा ४४.८ मिमी लांब आणि २३.२ मिमी रुंद असतो.

अंडी : पांढरी किंवा पिवळसर पांढरी, आकार साबुदाण्यासारखा, लांबी ३ ते ४ मिमी. तर रुंदी २ ते ३ मिमी., एक मादी सरासरी १०८ अंडी घालते. अंडी ८ ते १४ दिवसांत उबल्यानंतर, त्यातून अंड्यातून अळी बाहेर पडते.

अळी : अळी कुजलेल्या शेणखत, नारळाची खोडे, पालापाचोळा यावर उपजीविका करते. पिवळसर पांढऱ्या अळीचा मागील भाग करडा आणि फिक्कट निळसर असून, डोके गडद तपकिरी असते. पूर्ण वाढलेली अळी सर्व साधारण अंगठ्याएवढ्या जाडीची (८० ते १२० मिमी. लांब तर २० ते ३० मिमी. रुंद) असते. इंग्रजी ‘सी’ अक्षराप्रमाणे दिसतात. अळीची वाढ ३ ते ६ महिन्यांत पूर्ण होते.

कोष : अळ्या खताच्या खड्ड्यातच मातीचे आवरण तयार करून कोषावस्थेत जातात. कोषावस्था सुमारे १४ ते २९ दिवसांची असते. तयार झालेला भुंगा कोषामध्येच ५ ते २५ दिवसांपर्यंत राहतो आणि नंतर उडून नारळ बागेत जातो. नरभुंगा १२० दिवस, तर मादी भुंगा १४२ दिवसपर्यंत जगते. या किडीची वर्षातून एक पिढी तयार होते.

Weed Integrated Management
Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात रब्बीची १२.६२ टक्के पेरणी

नुकसानीची पद्धत व लक्षणे

शेणखताच्या खड्‍ड्यामध्ये आढळणारी या किडीची अळी निरुपद्रवी असून, पूर्ण वाढलेला भुंगा नारळ झाडाचे नुकसान करतो. विशेषतः झाडाच्या शेंड्यामध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. लहान रोपांमध्ये सुईचे उगमस्थान भुंग्याने खाल्ल्यामुळे अशा रोपांना नवीन सुई येत नाही. कालांतराने ते रोप मरते.

कधी कधी नवीन वाढणारी सुई कुरतडली गेल्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या नारळ झाडाच्या झावळ्या त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. यावरून या किडीचा प्रादुर्भाव सहज ओळखता येतो.

मोठ्या प्रमाणावर सुई खाल्लेली असल्यास झावळी मध्यावरून मोडून पडते. अशा प्रादुर्भावग्रस्त झावळ्या शाकारण्यासाठी वापरता येत नाहीत. तसेच नारळाच्या उत्पन्नावरही परिणाम होतो.

गेंड्या भुंग्याने पाडलेल्या छिद्रांमध्ये सोंड्या भुंग्याची मादी अंडी घालण्याची शक्यता असते. म्हणजेच प्रादुर्भावग्रस्त झाडांना सोंड्या भुंग्याचाही उपद्रव होण्याची शक्यता वाढते. या छिद्रामध्ये पावसाचे पाणी गेल्यास त्यामध्ये कोंब कुजव्या रोगाचाही प्रादुर्भाव होऊ शकतो.

मोठ्या माडावरील सुई/कोंब व्यवस्थित दिसत नसल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. भुंग्याने पाडलेल्या छिद्रातून ताजा भुस्सा बाहेर येत असल्यास त्यामध्ये व्यवस्थित पाहिल्यास भुंगा आढळतो. लहान झाडांबरोबरच मोठी झाडेही या किडीस बळी पडतात. गेंड्या भुंग्याचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करणे आवश्यक ठरते.

डॉ. संतोष वानखेडे,

: ९७६५५४१३२२

(डॉ. वानखेडे हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे सहायक प्राध्यापक (कीटकशास्त्र), डॉ. मालशे हे कृषी विद्यावेत्ता असून, डॉ. जलगावकर हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली हे कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख आहेत.)

एकात्मिक कीड व्यवस्थापन

बागेची स्वच्छता : कुजलेला पालापाचोळा, तोडलेल्या नारळ झाडाच्या खोडांचे अवशेष नारळ बागेत ठेवू नयेत. शेणखताची साठवण नारळ बाग किंवा जवळपास करणे शक्यतो टाळावे. शेणखतात आढळणाऱ्या अंडी, अळी व कोष वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात.

मेटारायझिमचा वापर : खतांच्या खड्ड्यांतील शेणखतामध्ये दोन महिन्यांच्या अंतराने मेटारायझिम ॲनिसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण शिंपडावे किंवा फवारावे.

फसवे खड्डे : नारळ बागेमध्ये ६० सेंमी. लांब, ६० सेंमी. रुंद व ६० सेंमी. खोल या आकाराचे फसवे खड्डे तयार करून त्यामध्ये कुजलेला पालापाचोळा, शेणखत भरून घ्यावे. अशा खड्ड्यांमध्ये गेंड्या भुंग्याची मादी अंडी घालण्यासाठी आकृष्ट होते. दर दोन महिन्यांनी शेतातील खतखड्ड्यांवर मेटाराझिम ॲनिसोप्ली या जैविक कीडनाशकाची आळवणी करावी.

Weed Integrated Management
Oil Seed Market : मानोरी केंद्रावर भुसार, तेलबिया शेतीमाल लिलाव सुरू

तारेच्या हुकाने काढून नष्ट करणे : नारळ झाडाच्या सुईमध्ये छिद्र आढळल्यास आणि त्यामधून ताजा भुस्सा बाहेर येत असल्यास त्या छिद्रामध्ये तारेचा टोकदार हूक घालून भुंगे बाहेर काढावेत. त्यांचा वेळीच नाश करावा. भुंग्याने पोखरलेला भाग स्वच्छ करून या छिद्रात जितके निमकेक, तितकीच वाळू घेऊन केलेले समप्रमाणातील मिश्रण भरावे. ही उपाययोजना नारळ झाडे छोटी असताना उपयुक्त ठरते.

गंध सापळा : प्रति हेक्टरी एक सापळा बागेत लावावा. त्याच्या गंधाचा परिणाम त्याच्या गुणवत्ता आणि प्रमाणकानुसार २ ते ५ महिन्यांपर्यंत टिकतो. सापळ्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी सापळ्यामध्ये नारळ झाडाचे लहान ताजे तुकडे किंवा तेलताड बियांची साल टाकावी.

जैविक कीड व्यवस्थापन : नारळाच्या बागेत बॅक्युलो विषाणूग्रस्त ३० ते ३५ भुंगे प्रति हेक्टर या प्रमाणात जून ते जुलैमध्ये सोडावेत किंवा शेणखताच्या खड्ड्यात हिरवी मस्कार्डीन बुरशी ५० ग्रॅम मिसळावी. अळ्यांच्या अंगावर हिरव्या रंगाची बुरशी वाढते. या बुरशीमुळे गेंड्या भुंग्याच्या अळ्या मरतात.

पर्यावरणपूरक व्यवस्थापन :

i) माडाच्या सुरामध्ये दोन डांबरगोळ्या किंवा निमपेंड १०० ग्रॅम अधिक वाळू १०० ग्रॅम प्रति महिन्याला ठेवाव्यात.

ii) माडाच्या सुईजवळच्या ३ व ४ थ्या झावळीजवळ शक्यतो या भुंग्याचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. म्हणून अशा ठिकाणी भुंग्याचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता बारीक जाळीचा नायलॉन नेट (डिस्को नेट) सुईजवळच्या ४-५ झावळ्या धरून माडाला गोल गुंडाळावे. त्यात त्याकडे आकर्षित होणारा भुंगा अडकतो. माडाला होणारी इजा टाळली जाते.

कीटकनाशकांचा वापर (प्रतिबंधात्मक)

i) नारळावरील (५ वर्षांखालील) गेंड्या भुंगा किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी क्लोरॲन्ट्रानिलीपोल (०.४ टक्का दाणेदार कीटकनाशक) ६ ग्रॅम सच्छिद्र पिशवीमध्ये घेऊन वर्षातून तीन वेळा माडाच्या सुईजवळ बांधण्याची शिफारस करण्यात येत आहे.

ii) माडाला ५ व्या वर्षापर्यंत या किडीचा जास्त प्रादुर्भाव होतो. लहान वयातील रोपांवर भुंग्याचा अतिप्रादुर्भाव झाल्यास रोपे मरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे रोपांचे भुंग्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि रोपांमधील भुंग्याचे नियंत्रण करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस. एल.) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रादुर्भावित भागात ओतावे. प्रभावी व्यवस्थापन होते.

(टीप : लेखात नमूद कीटकनाशकांना लेबल क्लेम नाही, परंतु केंद्रीय लागवडीखालील पिके संशोधन संस्था (CPCRI), कासारगोड यांनी सूचित केलेली आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com