

Soybean Cultivation : गेल्या दोन दशकांपासून सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच विविध कंपन्यांच्या बोगस बियाण्यांमुळे, चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे वापराची मोहीम जोरात आहे. मात्र, याची दखल सरकार दरबारी आणि मीडियाने घेतलेली नाही.
२०२० मध्ये अनेक बियाणे कंपन्यांनी सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करायला लावले होते. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. बोगस बियाण्यांमुळे बियाणे खर्च, रासायनिक खतांचा खर्च, मेहनत, पेरणीचा खर्च, वेळ, मानसिक त्रास असे सर्व शेतकऱ्यांना सहन करावे लागते.
त्यामुळे जागृत असलेल्या शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे जतन करणे आणि पुढील वर्षी हंगामात पेरणीसाठी वापरणे चालू केले. दुसरे, सोशल मीडियाद्वारे घरगुती बियाणे जतन करून वापरण्याची मोहीम चालू आहे. जे शेतकरी सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांना या मोहिमेचा फायदा होत आहे.
मात्र सोशल मीडियापासून दूर असलेल्या अनेक शेतकऱ्यांना याबाबत पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे बियाणे धरून ठेवता आले नाही. त्यांना यावर्षी विविध कंपन्यांचे बियाणे वापरावे लागणार आहे.
बियाणे जतन करणे, संवर्धन करणे याबाबतीत प्रशिक्षण-प्रात्यक्षिके अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांना पारंपरिक पद्धतीने बियाणे जतन करावे लागत आहे. या संदर्भात कृषी विभागाकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले असल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे.
परंतु प्रत्यक्षात असे प्रयत्न कृषी विभागाकडून झाले नसल्याचे अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या भेटीतून दिसून येते. त्यामुळे घरगुती बियाणांच्या मोहिमेला शासकीय पातळीवरून पाठबळ मिळताना दिसून येत नाही. पुरेसे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि जागृती अभावी बीजप्रकिया किंवा उगवण क्षमता न तपासता घरगुती बियाण्यांची पेरणी करावी लागणार आहे.
कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या कृषी विभागाकडून बीजप्रकिया आणि बीज उगवण क्षमता तपासणी मार्गदर्शक आणि जागृतीसाठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. ही मोहीम हाती घेण्यास शासनाकडून उदासीनता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरातील बियाणे काढून तिफनीवर मूठ धरावी लागणार आहे. घरगुती बियाणांची मोहीम ही शेतकऱ्यांनी स्वतःसाठी चालवलेली मोहीम आहे.
पदवी शिक्षण घेतलेले शेतकरी नानासाहेब मुंडे (मुंडेवाडी ता. केज जि. बीड) सांगतात की, या वर्षी दोन क्विंटल सोयाबीनचे बियाणे ठेवले आहे. त्या बियाण्याची उगवणक्षमता तपासली असता, ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पुढे त्या बियाणांची बीजप्रकिया आणि बुरशीपासून संरक्षण कसे करावयाचे हे माहीत नाही.
कृषी विभागाकडून बियाण्यांची प्रमाणित करण्याची प्रक्रिया कशी करावयाची या संदर्भातील प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके याविषयी मार्गदर्शन मिळाले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक-दोन व्हिडिओ तेवढे पाहण्यासाठी मिळाले आहेत.
दुसरे उदाहरण भास्कर खेडकर (लिंबेनांदूर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांनी गेल्या वर्षी खरीप हंगामात सहा बॅग सोयाबीन पेरले होते. सर्व सोयाबीन बियाणे बोगस निघाले. पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. शेतीतील नुकसानीचा पंचनामा नाही, की आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे घरगुती बियाणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी एक क्विंटल बियाणे ठेवले आहे. मात्र बियाणांची उगवण क्षमता कशी आहे? किती आहे? हे तपासण्याचे काहीच माहीत नाही. त्यांना बियाणे उगवण्यापूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया, बियाणे संवर्धन करावे लागते ह्याविषयी देखील काहीच माहिती नाही, मार्गदर्शनही मिळाले नाही.
यावरून बियाण्यांच्या बाबतीत मार्गदर्शन आणि जागृती पुरेशी नसल्याचे दिसून येते. अशीच कहाणी अनेक शेतकऱ्यांची आहे. ज्या शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसला ते शेतकरी नुकसानीतून जागृत होऊन बियाणे जतन करण्यास पुढे आले. घरगुती बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी जवळपास ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीजप्रकिया का आणि कशी करावयाची असते, याविषयी जाणीन-जागृती नाही.
दुसरे, या वर्षीच्या खरीप हंगामात पेरणीसाठी ज्याच्याकडे घरगुती बियाणे नाही. अशा शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी विविध कंपन्यांचे बियाणे वापरायचे की इतर शेतकऱ्यांकडून घेऊन घरगुती बियाणे वापरायचे याविषयी संभ्रम आहे. नेमके कोणते बियाणे दर्जेदार असेल, हा प्रश्न आहेच. विविध कंपन्यांचे बियाणे दर्जेदार असेलच असा विश्वास शेतकऱ्यांना नाही.
दुसरे असे की घरगुती बियाणे वापरायचे म्हटले, तर बीजप्रक्रिया कशी करावयाची हे देखील माहीत नाही, प्रशिक्षण-मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे घरगुती बियाणे विना प्रक्रिया वापरले आणि उगवण क्षमता कमी असली किंवा उतारा कमी मिळाला, तर काय करावयाचे? अशा दुहेरी कोंडीत राहून यावर्षीची पेरणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.
गेल्या वर्षीचा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टीचा फटका घरगुती दर्जेदार बियाणे उत्पादनाला झालेला आहे. रब्बी हंगामात घेतलेले सोयाबीन पावसाळा हंगामाप्रमाणे दर्जेदार असेल का, याविषयी शंका आहे. गेल्या वर्षीपासून बियाणे कंपन्यांनी बियाण्यांचे दर वाढवल्यामुळे भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
दर्जेदार बियाण्यांच्या धोरणाबाबत केंद्राकडून प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याची गरज आहे. ही कार्यपद्धती शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करायला हवी. कृषी तंत्रज्ञान आणि बियाणे प्रक्रिया पद्धत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी सरकारची आहे. या बाबतीत सरकार अपयशी ठरत आहे का, हा प्रश्न शासनाला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.
२०२० या वर्षी बोगस बियाणे निघाले असता, २०२१ आणि २०२२ मध्ये घरगुती बियाणे चळवळ जोमाने पुढे आली. मात्र या चळवळीत कंपन्यांचे बियाण्याची प्रथम पेरणी करून निघालेल्या शेतीमालाचे पुढील वर्षीसाठी घरगुती बियाणे म्हणून शेतकरी पकडतात.
मात्र, या पकडलेल्या बियाण्याची उगवण क्षमता जास्त असल्याचे पाहण्यास मिळते, परंतु उत्पादन कमी असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. शेतकरी सांगतात की अलीकडे कंपन्यांच्या बियाण्याचा दर्जा खूपच घसरला असल्याने, पुढील वर्षांसाठी बियाणे पकडणे अवघड झाले आहे. जरी बियाणे पकडले तरी त्यापासून शेतीमालाचा उतार पुरेसा मिळत नाही. त्यामुळे काळी, बागायती किंवा भारी जमिनीतील घरगुती बियाणे पकडून वापरणे कमी झाले आहे.
केवळ तांबड्या, खडकाळ, मुरमाच्या, हलक्या जमिनीवर घरगुती पकडलेल्या बियाण्यांचा वापर करण्यात येत आहे. घरगुती बियाणे पकडणे, बीजप्रकिया करण्यातील अडथळे आणि कंपन्यांच्या बियाण्यांचा घसरलेला दर्जा यामुळे घरगुती बियाणे वापर चळवळीला खीळ बसल्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे.
परिणामी शेतकऱ्यांना कंपन्यांच्या बियाण्यावर अवलंबून राहावे लागणारे आहे. घरगुती बियाणे वापराच्या मोहिमेला उभारी मिळण्यासाठी धोरणात्मक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
(लेखक शेती, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून ‘द युनिक फाउंडेशन, पुणे’ येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.