Weather Station : प्रत्येक गावामध्ये का असावे हवामान केंद्र?

Weather Update : स्थानिक हवामान केंद्रात पर्जन्यमापक, तापमापक, आर्द्रता मापक, वारा वेग व दिशा दर्शक असे घटक असतात. त्यांचा आपल्या शेती नियोजनात कसा उपयोग होतो हे माहिती असणे सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे.
Weather Station
Weather StationAgrowon

सतीश खाडे

Weather Update In Maharashtra : आठ-नऊ वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात माझं काम कामानिमित्त सतत जाणं-येणं होतं. तिथे बऱ्याच गावात एक गोष्ट दिसली, की अगदी छोट्या छोट्या पाड्याला भक्कम काँक्रीटचा कॉलम आणि स्लॅब असलेली स्मशानभूमी. त्याला कंपाउंड वॉल होत्या आणि त्याही काँक्रीटच्या. त्यांना उत्तम रंगही दिलेला होता.

या सगळ्या गावांची लोकसंख्या हजाराच्या आत. मात्र गावात पिण्याच्या वा शेतीच्या पाण्याच्या काही योजना वा सुविधा नव्हत्या. एक खूप खटकलेले दृश्‍य म्हणजे ओढ्याच्या काठावर भक्कम काँक्रीटची स्मशानभूमी आणि शेजारीच ढासळलेल्या दगडी बंधाऱ्यातून पाणी वाहून जात होते.

याच साक्री तालुक्यात आठशे ते हजार मि.मी. पाऊस पडतो, पण पावसाळ्यानंतर या पाड्यामधले बरेचशे शेतकरी सुरत व नाशिक जिल्ह्यांत मजुरीला जातात, कारण त्यांच्याकडे रब्बी हंगामासाठी सिंचनाची, पाणी साठवण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. सांगण्याचे तात्पर्य आमच्या नक्की गरजा कोणत्या हे आम्हाला कधी कळणार? कोणत्या गरजांना मी प्राधान्य द्यायला हवं हे आम्हाला कधी सुचणार?

इतक्या जोरकसपणे मला म्हणायचे आहे, की प्रत्येक गावाला शाळा, आरोग्य केंद्र, पाण्याची व्यवस्था या बरोबरच हवे स्थानिक हवामान केंद्र. किमान पर्जन्यमापक असला पाहिजे. आज बहुतांशी गावात ग्रामपंचायतीकडे सुसज्ज इमारती, संगणक सुविधा, स्मार्ट टीव्ही अशी बरीच आधुनिक साधने उपलब्ध आहेत.

गावातील ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती असताना त्यासाठी आवश्यक असणारे हवामान केंद्र मात्र दिसत नाही. ज्या ठिकाणी विशेषतः कृषी विज्ञान केंद्रांनी स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले आहे. तेथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळते. शेतकरी समृद्ध होण्याकडे वाटचाल करत आहेत.

बाजारात साधारण स्थानिक हवामान केंद्राची किंमत पस्तीस हजारांपासून एक ते दीड लाखापर्यंत आहे. या हवामान केंद्रामधील सर्व नोंदी दर दहा मिनिटाला स्वयंचलित पद्धतीने घेतल्या जातात.

Weather Station
Weather Station : पीकनुकसान मदतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र

त्यामध्ये मोबाईलचे सीम कार्ड टाकले तर हव्या तेवढ्या लोकांना या नोंदी मोफत पोहोचू शकतात. या सर्व माहितीचा उपयोग योग्य कृषी सल्लागाराची मदत घेऊन केला तर याचा शेती आणि उत्पादनात भरपूर उपयोग होतो.

गावचे शिवार कमीत कमी पाचशे हेक्टरपर्यंत असते. म्हणजे ग्रामपंचायतीने एक हवामान केंद्र उभारले तर खर्च विभागून तीनशे रुपये प्रति हेक्टर येईल. हवामान केंद्राचा सुयोग्य वापर करून एकरी तीनशे रुपये उत्पन्न वर्षाला वाढवणे अजिबात अशक्य नाही. उलट याचा योग्य वापर झाला तर हवामान केंद्राच्या या किमतीच्या हजार पट पैसे शेतकऱ्यांच्या नफ्याच्या स्वरूपात वसूल होऊ शकतात.

स्मार्ट शेतीचा हवामान केंद्र हा पहिला पाया आहे. हा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक ग्रामपंचायतीने शासन योजना, अनुदानाची वाट न बघता आपल्या गावात हवामान केंद्र त्वरित बसवून स्मार्ट शेती करायलाच हवी !!

पर्जन्यमापक :

आजही देशातील ६३ टक्के लोकांचे (९० कोटी लोकसंख्या) जीवन आणि अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पाण्यावर आणि पाणी पावसावर अवलंबून !! पाणी नियोजनात सर्वांत पहिला टप्पा येतो पाऊस मोजण्याचा. काय यंत्रणा आहे आपल्या राज्यात पाऊस मोजण्याची? अधिकृतपणे तालुक्याला तीन (एका मंडलामध्ये एक) म्हणजेच ५० गावांसाठी शासनाचा एक पर्जन्यमापक!!

त्यावरचे रीडिंग पन्नास गावांसाठी ग्राह्य धरणार. प्रत्यक्षात एकाच गावात असमान पाऊस पडतो. हिवरे बाजारसारख्या पाणी नियोजन करण्यात अग्रेसर असणाऱ्या गावात तीन ठिकाणी पर्जन्यमापक आहेत. त्या गावात तीन ठिकाणच्या पावसामध्ये फरक असतो. प्रत्येक गावात किमान एक तरी पर्जन्यमापक असला पाहिजे. याचा फायदा असा की...

१) गावात वेळोवेळी पाऊस किती झाला आहे हे मोजण्यासाठी.

२) गावात अतिवृष्टी झाली तरी वा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला तर त्याची अधिकृत नोंद होण्यासाठी. कारण अनेक शासकीय उपाययोजनांचा आधार अशी आकडेवारी असते.

३) पेरणी करण्या इतका पाऊस झाला की नाही हे कळण्यासाठी. अन्यथा, पेरलेले वाळून जाते, दुबार पेरणी करावी लागते.

४) गाव, शिवारातील पाण्याची आवक मोजण्यासाठी.

५) गाव हद्दीतून किती पाणी वाहून जाते, त्यातले किती अडवू शकतो, किती मुरवू शकतो याची शास्रीय आकडेवारी कळण्यासाठी. ही आकडेवारी पाण्याचा हिशेब लावण्यासाठी आवश्यक.

६) गावात पूर्ण पावसाळ्यात किती पाऊस पडला आहे त्यावर आधारित वर्षभराचे नियोजन करण्यासाठी. उदा. कडवंची, खरपुडी (जि. जालना) यांसारखी उपक्रमशील गावं पावसाळा संपला नियोजन करतात.

सरासरी इतका पाऊस झाला तर तीन पिके घ्यायची, सरासरीपेक्षा पंचवीस-तीस टक्के पाऊस कमी झाला की दोनच पिके घ्यायची आणि सरासरीच्या पन्नास टक्के वा त्यापेक्षा कमी झाला की फक्त चारा पिकाची लागवड करायची.

७) काही वेळा पीकविम्याचे पैसे मिळणार की नाही ते पावसाचे आकडे ठरवते. गावात भरपूर पाऊस होऊन नुकसान झाले आणि जिथे शासनाचा अधिकृत पर्जन्यमापक आहे तिथे अजिबात झाला नाही किंवा कमी झाला तर तुमच्या गावातल्या जास्त पावसाची नोंद कशी ग्राह्य धरणार?

८) अनेक गावांत लघुपाटबंधारे किंवा मध्यम तलाव आहेत ते किती पावसाने भरतात, किती पावसाने पूर येतो याची नोंद ठेवता येते. याचा उपयोग संकट काळात नियोजनासाठी, नुकसान कमी करण्यासाठी होऊ शकतो. तसेच कमी पावसाच्या वर्षातही पाणी नियोजनासाठी करता येतो.

Weather Station
Crop Damage Survey : पालघरला पीक नुकसान पंचनामे सुरू

९) मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हे पर्जन्यमापक असतात. पण तिथे त्यांची संख्या खूप वाढवायला हवी, कारण एकाच भागात (डोंगरावर) कमी वेळात खूप पाऊस पडून डोंगर ढासळू शकतो. मनुष्यहानी झाल्यावरच त्याच्या बातम्या होतात.

१०) ओढ्याचा पूर, पुरामुळे बाजूच्या शेताचे नुकसान पूर्वसूचनेमुळे काही प्रमाणात टाळू शकते.

११) जिरायती गावे, कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये याची खूप आवश्यकता आहे. एकूण पावसाचे दिवस, दोन पावसांतील अंतर, पावसाची तीव्रता, दिवसवार, आठवडावार आणि महिनावार पावसाचे मोजमाप हे काही वर्षे केले, की या नोंदीचा संदर्भ घेऊन गावच्या पावसाचा पॅटर्न काही प्रमाणात का होईना निश्‍चित करता येतो. त्यावर आधारित वार्षिक नियोजन अधिक अचूकतेकडे जाईल.

१२) पावसाच्या तीव्रतेवर जमिनीतील हवेतील आर्द्रता बदलते, त्यामुळे पिकावर पडणारे बुरशीजन्य रोग किंवा कीड, अशा इतर समस्यांची चाहूल आणि जाणीव पावसाची आकडेवारी समजली की लवकर होते. त्यावर आधारित खते, कीटकनाशके आणि इतर उपाययोजना करण्यास पुरेसा अवधी मिळतो.

वाऱ्याचा वेग, दिशा दाखविणारे यंत्र

- शेत, शेततळे, तलाव, बंधारा तसेच इतर सर्व ठिकाणच्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग हा वाऱ्याचा वेग आणि दिशा यावर अवलंबून असतो.

- हवा आणि जमिनीत आर्द्रता वाऱ्यामुळे बदलते. फळांवर कोरड्या व ओल्या वाऱ्याचे परिणाम होतात. त्यामुळे संभाव्य नुकसान टळण्यासाठी योग्य उपाययोजना वेळेत करणे या माहितीमुळे शक्य होते.

तापमापक

- पावसाच्या प्रमाणाच्या बरोबरीने तापमानावर शेतीमधील किती तरी बाबी अवलंबून असतात. तापमानावर हवा आणि जमिनीतील आर्द्रता अवलंबून असते. त्यावर आधारित झाडांना, पिकांना पाणी देण्याचे नियोजन ठरते. पिकांची, बागेची सुदृढता आणि उत्पादकता झाडांच्या पर्णोत्सर्जनावर ठरते. हे पर्णोत्सर्जन तापमानावर ठरते.

- फुलधारणा, फळधारणेवर तापमानाचा मोठा परिणाम होतो. जमिनीचे आरोग्य तापमानाशी निगडित आहे. उदा. खूप जास्त वा खूप कमी तापमानात जमिनीतील सूक्ष्मजीव निष्क्रिय होतात आणि झाडांना अन्नद्रव्य मिळणे अवघड होते, यातून पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

- रोग तसेच किडी यांचा आर्द्रतेशी खूप जवळचा संबंध आहे आणि आर्द्रतेचा तापमानाशी. त्यामुळे तापमानाविषयी आणि त्याचबरोबर आर्द्रतेची सतत माहितीची नोंद झाल्यास प्रतिबंधात्मक कार्यवाही करून पिकाचे संभाव्य नुकसान टळू शकते. यामुळेच उपाययोजनेचा खर्चही तुलनेने कमी येऊ शकतो.

- अनुकूल आणि प्रतिकूल हवामानाची जाणीव वेळीच झाली तर आपल्याला पिकाच्या उत्पादकतेत चांगली वाढ करता येणे शक्य असते.

लेखक - सतीश खाडे, ९८२३०३०२१८, (लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com