
Jalgaon News : खानदेशात विविध भागांत यंदा मेंढपाळ सुमारे ३० ते ३५ दिवस लवकर दाखल झाले होते. त्यांचा मुक्काम अजूनही शिवारात आहे. गारपीट, वादळी पाऊस आदी स्थितीचा सामना या मंडळींना करावा लागत असून, आपापल्या भागातून लवकर स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
खानदेशातील मेंढपाळ नाशिक जिल्ह्याच्या सीमेलगत वास्तव्यास आहेत. धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारलगत मेंढपाळ बांधवांचे वास्तव्य आहे. ही मंडळी चार ते सहा महिने आपल्या भागांत पीकपाणी व अन्य बाबींसाठी वास्तव्यास असतात. आपल्याकडे जलसाठे कमी होताच किंवा शिवारात कोरड आल्यानंतर ते स्थलांतर करतात.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव, पाचोरा, जामनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांत आपापले मेंढ्यांचे कळप घेऊन मेंढपाळ पाच ते सहा महिने थांबतात. या भागांत पऱ्हाटीची उलंगवाडी मार्चमध्ये सुरू होते. तसेच रब्बी पिकांतील काढणीही याच काळात पूर्ण होते.
दरवर्षी मार्चअखेरीस ही मंडळी आपल्या मूळ भागातून स्थलांतर करायची. परंतु यंदा जानेवारीमध्ये ही मंडळी आपल्या भागातून स्थलांतरीत झाली आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत ही मंडळी दाखल झाली होती. आपले बिऱ्हाड, कुटुंब व मेंढ्यांसमवेत ही मंडळी मोकळे शिवार किंवा नदी, खोऱ्यांत आहेत.
जेथे पशुधनाला चारा व पाणी उपलब्ध आहे, तेथे ही मंडळी आहेत. एका कळपात एक ते दीड हजारांवर मेंढ्या असतात. सध्या मळणी, कापणीचा हंगाम सुरू आहे. शिवारात थेट मेंढ्यांना चरण्याची परवानगी शेतकरी देत नसल्याची स्थिती आहे. कारण अद्याप कापणी, मळणी सुरू आहे. यामुळे नदी, खोऱ्यांत त्यांना थांबावे लागत आहे.
दरवर्षी मेंढपाळ खानदेशातील विविध शिवारांत एप्रिलमध्ये दिसायचे. यंदा मात्र जानेवारीतच दिसू लागले होते. आपल्या घरी किंवा गावाकडे कुटुंबातील एक सदस्य वास्तव्यास असतो. तो घरी शेती व अन्य जबाबदाऱ्या पार पाडतो. तर अन्य सदस्य मेंढ्या-बिऱ्हाडासमवेत स्थलांतर करतात.
शेतात मेंढ्या बसवून घेण्याकडे कल
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, पारोळा, मुक्ताईनगर भागांत काही शेतकऱ्यांनी आपली पऱ्हाटी मेंढपाळांकडून चराईच्या बदल्यात उपटून शेत रिकामे करून घेतले. उलंगवाडी झालेल्या कापूस किंवा पऱ्हाटीच्या क्षेत्रात मेंढ्या चारून घ्या व नंतर पऱ्हाटी उपटून घ्या, असा तोंडी करारनामा शेतकरी मेंढपाळांसमवेत करून घेतात. तसेच काही शेतकरी ५०० ते ७०० रुपये प्रति दिवस किंवा २४ तास असा मोबदला मेंढ्या शेतात बसविण्यासाठी काही भागांत देत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.