Sahyadri Shepherd Community : सह्याद्रीच्या जंगलातले कठीण आयुष्य आणि सगाबाईंची जिद्द

Traditional Livestock Farming : सगाबाईंनी विशाल सह्याद्रीच्या डोंगर रांगांत आयुष्याचे धडे गिरवले. त्यांचं खरं शिक्षण तिथंच झालं. पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेला तोरणा किल्ल्याचा घेरा म्हणजे त्यांचं विश्‍व. आताच्या राजगड तालुक्यातील वेल्हा गावाच्या पाठीमागील भट्टी वाघदरा गाव हे सगाबाईंचं माहेर.
Sahyadri Shephard Community
Sahyadri Shephard Community Agrowon
Published on
Updated on

“माझ्या आयुष्याची कथा तुम्हाला मी कशी सांगू? किती सांगू? मी रानावनातील एक शेतकरी गुराखी स्त्री. मावळातील डोंगर, इथल्या दऱ्या-नदी-ओहोळ, ही झाडे-काटेरी झुडपं-रानफुलं, ही माझ्या जिवाभावाची मेंढरं आणि जनावरं हाच माझा संसार आहे. तीच माझी दुनिया आहे. आम्ही शिवरायांच्या शूर मावळ्यांच्या वंशातले. दऱ्याखोऱ्यात राहून लढणं हाच आमच्या वंशजांचा धर्म होता. आजही आम्ही तो धर्म सोडला नाही.

आता संघर्ष असतो तो रोजच्या जगण्याशी. मी शाळेत कधी गेली नाही. तोरणा किल्ल्याच्या घेऱ्यातील जंगल हीच माझी शाळा...” गुंजन मावळातील रानावनात धाडसाने पशुपालन करणाऱ्या सगाबाई कोंडिबा कचरे आपली कहाणी सांगत होत्या. गेल्या ५०-६० वर्षांपासून तोरणा किल्ल्याच्या पाठीमागे असलेल्या जंगलात, डोंगरात राहून संसार करणाऱ्या सगाबाई एक धाडसी महिला गुराखी म्हणून गुंजन खोऱ्यात परिचित आहेत. दारिद्र्याच्या संकटाशी त्या एखाद्या वाघिणीसारख्या लढत आहेत.

सगाबाईंनी विशाल सह्याद्रीच्या डोंगररांगांत आयुष्याचे धडे गिरवले. त्यांचं खरं शिक्षण तिथंच झालं. शहरवासीयांसारखं त्यांना बोलता-सांगता येत नसलं, तरी त्यांची कहाणी आधुनिक शहरी समाजातील महिलांना आदर्शवत ठरू शकते. पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेला तोरणा किल्ल्याचा घेरा म्हणजे त्यांचं विश्‍व.

आताच्या राजगड तालुक्यातील वेल्हा गावाच्या पाठीमागील भट्टी वाघदरा गाव हे सगाबाईंचं माहेर. तेथील दाट जंगलात अजूनही श्‍वापदं आहेत. याच जंगलात शेतकरी आई-वडिलांसोबत सगाबाईंचं बालपण गेलं. धनगर असल्याने त्या आणि त्यांचं कुटुंब पशुपालनात रमलेलं. “माझ्या वडलांचं नाव लखु ढेबे. मला तीन बहिणी आणि दोन भाऊ.

मी सर्वांत छोटी. माझं नाव सगा ठेवलं. सारे जण मला सगाबाई म्हणत. आमची चार एकर शेती होती. पण कुटुंब चालायचं ते जनावरांच्या जोडधंद्यावर. दूधदुभतं खूप होतं. जंगलात आमचा खूप मोठा गोठा होता.

त्यात २००-३०० जनावरं होती. जनावरं खूप असली तरी आम्ही श्रीमंत नव्हतो. आला दिवस आनंदात घालवायचा हाच आईवडलांचा प्रयत्न होता. ते गुराखी होते आणि दोघेही जण आम्हा मुलांना घेऊन दिवसरात्र जनावरांमध्ये असायचे...” सगाबाई आपल्या बालपणीच्या आठवणी सांगण्यात मग्न होतात.

Sahyadri Shephard Community
Livestock Decline: पशुधन होणार कमी

सगाबाईंच्या आईवडुलांना पाटीपुस्तक, शाळा माहीत नव्हती. त्यामुळे लहानग्या सगाबाईंच्या हातीदेखील पाटीपेन्सिल आली नाही. हुशार असली, तरी आईवडील तिला शाळेऐवजी लहानपणापासून गायीगुरांसोबत जंगलात घेऊन जात असत. दहा वर्षांची असतानाच ती एकटी जनावरं सांभाळू लागली. थोडक्यात, ती स्वतंत्र गुराखी झाली होती.

तरीपण, सोबत आई असायची. कारण जंगल खूप घनदाट होतं. तिथं वाघ, बिबटे, अजगरांचा अधिवास होता. सगाबाईच्या भागाचे नावच ‘वाघदरा’ होते. या वाघदऱ्यात सगाचे वडील मात्र शूर मावळ्यासारखे वावरत होते.

ते एकदा जंगलात गेले. सायंकाळी जंगलातील एक मोठे वाळके लाकूड वडिलांनी खांद्यावर टाकले आणि ते जनावरांसह घराकडे परतू लागले. याचवेळी जंगलात लपून बसलेला एक वाघ चक्क वडिलांच्या मागावर होता आणि तो हळूहळू घराकडे आलादेखील. सुगावा लागताच बहाद्दर वडिलांनी वाघाला पळवून लावलं होतं.

सगाबाई म्हणतात, “आमच्या जनावरांच्या कळपाभोवती अधूनमधून वाघ फिरायचे. जनावरांची पळावापळव करायचे. पण आम्ही कधीच वाघाला घाबरलो नाही. त्याचे कारण माझी आई. तिचे नाव भागाबाई लखू ढेबे. तीदेखील एक शूर गुराखी शेतकरी महिला होती. एकदा एक वाघ कळपात घुसला होता.

त्या वाघाला काठीने रट्टे देत पिटाळून लावताना मी आईला बघितलं होतं. तेच धाडस माझ्यातही उतरलं. धैर्याचा तो पहिला धडा त्या दिवशी मी जंगलात आईकडून शिकले. त्या प्रसंगानंतर मी जंगलात कधीही घाबरले नाही.

नाचणीची भाकरी, रानभाज्या खायच्या, भरपूर दूध प्यायचे आणि दिवसभर जंगलात जनावरे वळायची, असा साधासोपा रोजचा दिवस आमचा जायचा. रानात आंबे पिकले की आम्ही पोतेपोते भरून घरी आणायचो.

कंटाळा येईपर्यंत महिनाभर रानआंबे खात असू. तोरणं, करवंद, आळवं ही रानफळं होतीच. रानकाकड्या भरपूर होत्या. कुर्डू, शेंडवल, गेठवल अशा कितीतरी रानभाज्या असायच्या. त्या जंगलात मी कधी लहानाची मोठी झाले हे मलाही कळलं नाही.”

बालपणं असं जंगलात गेलेल्या सगाबाईंचं लग्न आईवडिलांनी १९८८ मध्ये लावून दिले. सगाबाईंच्या गावापासून कोकणात जाणाऱ्या जंगलातील डोंगररांगावर ढोफेखिंड वाडी आहे. तेथील कोंडिबा कचरे या शेतकरी मेंढपाळाचा मुलगा बबन हा सगाबाईंचा घरधनी बनला.

बबनची चार एकर शेती, २० जनावरं होती. लग्न झाल्यामुळे सगाबाईंचं माहेरचं जंगल सुटलं, माहेरची जनावरं सुटली; पण इकडे सासरी नवं जंगल मिळालं. त्यामुळे जीवनशैलीत फारसा बदल झाला नाही. लग्नघरी येताच घरधनी म्हणाले, “मी शेती सांभाळतो; आणि तू ही सारी जनावरं सांभाळ.” त्यामुळे तिचं गुराखीपण सासरीदेखील कायम राहिलं.

Sahyadri Shephard Community
Womens Day 2024 : महिला शक्तीने व्यापलेला सह्याद्री

सकाळी लवकर उठून गोठ्यातली कामं, मग चुलीवर भाकरी करणं, मग जनावरं सोडणं, त्यानंतर डोंगरधारेवर दिवसभर चालणं, शेवटी खोल जंगलात जनावरं चारायला नेणं आणि पुन्हा पाड्यावर परतणं, असा नित्यक्रम सगाबाईंचा होता. घरात साळाबाई कचरे म्हणजे बबनरावांच्या आजी सगाबाईंना जीव लावायच्या. साळाबाई त्यांच्यासाठी आई, आजी, सासू अशा सर्व भूमिकेत होत्या.

सगाबाईंचे जंगलातील रोजचं जाणंयेणं बंद झाले ते थेट पहिल्या बाळंतपणात. पहिलं बाळ म्हणजे सुशीला. झोपडीत आनंदीआनंद झाला. त्या वेळी साळाबाईंनी दोन वर्षे सगाबाईंना जंगलात जाऊ दिलं नाही. इथं सगाबाईच्या बालपणासारखंच जिणं सुशीलाच्या वाट्याला आले. कारण शेती, जनावरं सांभाळण्यासाठी घरची माणसं हवीत म्हणून सगाबाई आणि बबनरावांनी मुलीला शाळेत जाऊ दिलं नाही.

मुलगी दोन वर्षांची होताच सगाबाईंना त्यांचं गुराखीपण पुन्हा मिळालं. केळद, वाडीची शिव, मढेघाट, निगडे भागांत त्या जनावरांसोबत जंगल पालथं घालीत असत. सगाबाईंना वंशाला दिवा हवा होता. सुशीलानंतर तो थेट बारा वर्षांनंतर आला. सगाबाई सांगतात, “आमच्या झोपडीत दुसरं बाळ आलं.

त्याचे नाव संतोष. सगळ्यांना खूप आनंद झाला. घरधनी, आजीबाईंना किती आनंद झाला काय सांगू तुम्हाला. मात्र नियतीला आनंदाचे दिवस वाढवायचे नव्हते. संतोष दीड वर्षांचा असताना घरधनी आजारी पडले. ते अंथरुणावरून उठले नाहीत.” वाघाला सामोऱ्या जाणाऱ्या सगाबाई त्यांचा धनी गेला त्या दिवशी खचल्या. पुरत्या भेदरल्या.

तो प्रसंग डोळ्यासमोर आणताना सगाबाई सांगतात, “मला सारं जंगल भकास वाटू लागलं. शेती उघड्यावर पडली. शेळ्या-मेंढ्या-गायी-बैलं सारं उघड्यावर आली. त्यांना चरायला कोण नेणार हा प्रश्‍न होता. पण सासूबाईने धीर दिला. हार मानायची नाही; हा तुटका संसार आपण दोघी सांभाळू, असं त्या म्हणाल्या. चिमुकल्या संतोषला सासूबाई सांभाळू लागल्या. मी मग जनावरं विकून टाकली. फक्त शेळ्या ठेवल्या.

शेती सांभाळून शेळ्यांना रानात घेऊन जाण्याचं काम पुन्हा सुरू केलं. मात्र छोट्या संतोषमध्ये मी माझं भविष्याचं विश्‍व पाहू लागले. त्याला माझ्यासारखं रानवनातलं आयुष्य द्यायचं नाही, असं मी ठरवलं. त्याला शिकविण्याचा निर्धार मी केला. डोंगराखालच्या पाड्यातील अंगणवाडीत त्याला घातलं. एकदा संतोष आजारी पडला. त्यानं अंथरूण धरलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.

कारण त्याचे वडील अशाच आजाराने देवाघरी निघून गेले होते. मी धावपळ केली. घरातलं किडुकमिडुक विकून त्याच्या उपचार सुरू ठेवले. आम्ही दऱ्याडोंगरातील साधीभोळी माणसं. आम्ही डोंगरातील देवाशिवाय राहू शकत नाही. तोरणा किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस पायथ्याशी असलेल्या कुंबळजाई मातेवर माझी श्रद्धा होती. तिला मी साकडं घातलं. पुढे संतोषने उपचाराला दाद दिली. तो मरणाच्या दारातून परत आला. त्यामुळे त्याला खांद्यावर घेऊन दरमजल करीत डोंगर पार करीत देवीकडे गेले.”

Sahyadri Shephard Community
Livestock Decline: पशुधन होणार कमी

सगाबाईंनी संतोषला जिद्दीने वाढवलं. याच डोंगरी भागातील माजगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत तो चौथी उत्तीर्ण झाला. संतोषला गायीगुरे, दऱ्याडोंगराचा लळा होता. शेवटी तो धनगरपुत्रच होता. मात्र ‘‘मुला तू शिकायचं. माझ्यामागे शेळ्यामेंढ्याबरोबर डोंगरांमध्ये यायचं नाही,’’ असं सगाबाई त्याला बजावत असत. संतोषला अभ्यासात गोडी होती. पासली गावच्या शाळेत तो दहावी उत्तीर्ण झाला.

सगाबाई जनावरं सांभाळून त्याला शिकवत होत्या. शिक्षणासाठी सगाबाईंनी संतोषला झोपडी सोडायला लावली. त्याने धरगर पाडा सोडला आणि तो विंझरच्या अमृतेश्‍वर महाविद्यालयात बारावी शिकायला गेला. सगाबाई त्याच्या शिक्षणासाठी बकऱ्या विकत असे. त्याला शिक्षणासाठी पैसा पाठवत असे.

संतोषदेखील खूप गुणाचा. त्याला आईच्या परिस्थितीची तीव्र जाणीव होती. त्याने कधीही वेळ वाया घालवला नाही. सगाबाईंच्या श्रमातून संतोष विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाला. जंगलात जनावरे घेऊन जाणाऱ्या सगाबाईंनी त्याला शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. संतोष शहरात असला, की अभ्यासात मग्न असतो आणि तिकडे पाड्यावर केला की आईला मदत म्हणून स्वतः जनावरे चारायला जातो. शेतीची सर्व कामंदेखील आता संतोष सांभाळतो आहे.

सगाबाईंच्या आयुष्याची ही अशी एकाकी वाटचाल सुरू असताना गेल्या वर्षी एक वेगळी घटना त्यांच्या आयुष्यात घडली. त्यामुळे त्यांचं सारं जीवन बदलून गेलं. त्याला निमित्त ठरली ती ‘अॅग्रोवन’ची एक बातमी. पायाला भेगा पडलेल्या सगाबाईं जिद्दीने पशुपालन करीत असल्याची माहिती केळद गावचे मंगेश शिंदे यांना होती. ही माहिती सगाबाईंच्या छायाचित्रासह प्रसिद्ध झाली.

मावळातील ‘आधुनिक हिरकणी’ म्हणजे सगाबाई असं त्या बातमीत म्हटले होते. ती बातमी शहरात शिकणाऱ्या संतोषला वाचायला मिळताच त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचवेळी आईचं आयुष्य अधिक सुंदर बनविण्याचा निर्धार या मुलाने केला. त्या बातमीत सगाबाईंची व्यथा मांडलेली होती.

त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यासाठी तालुक्याला त्या चकरा मारत होत्या; त्यांना कोणीही दाद देत नव्हते. मात्र बातमी पाहून केळदचे उपसरपंच अंकुश तुपे यांनी सगाबाईंचं अभिनंदन केलं. ‘पीएम किसान योजनेसाठी अर्ज भरून देण्यासाठी तालुक्याला जा.

तुम्हाला आम्ही मदत करू,’ असा सल्ला तुपेंनी दिला. कृषी आयुक्तालयातील तत्कालीन उपायुक्त दयानंद जाधव यांनी सगाबाईंची दखल घेतली. वेल्ह्यातील कृषी अधिकारी तानाजी गुलाबराव गायकवाड यांनी सगाबाईंचा अर्ज भरण्यासाठी मदत केली. आता त्यांना नियमितपणे सन्मान निधी योजनेची मदत मिळते आहे. चार महिन्याला मिळणारे दोन हजार रुपये सगाबाईंना खूप आधाराचे ठरतात.

विशेष म्हणजे ही बातमी वाचून चिपळूणमधील ‘अॅग्रोवन’च्या वाचक मंदाताई शिंदे हेलावून गेल्या. त्यांनी सगाबाईसाठी नवे बूट आणि चपला पाठवल्या. सगाबाई म्हणतात, “माझ्या आयुष्यात नातंगोतं सोडून समाजातून आलेली ती पहिली भेट होती.” या प्रसंगातदेखील सगाबाईंची भोळी वृत्ती दिसून आली. “मला नव्या चपला नकोत. माझ्यापेक्षाही अजून दुसरे गरीब कुठेतरी असतील; त्यांना ते चपला, बूट द्यावेत,” असं त्या सांगत होत्या.

सगाबाईंचा मुलगा संतोष आता हॉटेल मॅनेजमेंटचे पदवी शिक्षण घेत आहे. गेली साठ वर्षे सगाबाई याच दऱ्याडोंगरात फिरत आहेत. त्यांचे भेगाळलेले हातपाय खूप दुखतात. पायतल्या भेगातून कधी कधी रक्त वाहते. मुलगा त्यांना म्हणतो, “आई, आता तो डोंगरात जाऊ नको. अजून थोड्या दिवसांत माझं शिक्षण पूर्ण होईल.

तुझं दऱ्याडोंगऱ्यात, काट्याकुट्यातील कष्टाचं काम कायमंच थांबणार आहे.” संतोषमुळे आपले दिवस पालटतील, असा आशेचा आधार सगाबाईंना आहे. संतोष सध्या शहरात शिकत असला तरी त्याची या डोंगराशी असलेली नाळ अजिबात तुटलेली नाही. गुंजन मावळातील ‘वाघीण’ असलेल्या सगाबाईंनी उपाशी राहून वाढविलेला जिवाचा तुकडा म्हणजे संतोष. तो आता याच पाड्यावर भव्य कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचं स्वप्नं बघतो आहे..!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com