Indian Politics: अस्वस्थ थरूर यांच्या निमित्ताने...

Rahul Gandhi’s Leadership in Crisis: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात ‘उरल्यासुरल्या’ प्रतिभावान उपेक्षितांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यापाशी वेळ नसतो. पक्षात मानाचे स्थान मिळावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या अनेक ‘थरूर’ आणि ‘पायलटां’शी थेट संवाद साधला, तरच राहुल गांधींना काँग्रेस पक्ष शाबूत ठेवणे शक्य होणार आहे.
Politics
PoliticsAgrowon
Published on
Updated on

Internal Struggle of Politics:

सुनील चावके

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अधूनमधून समाजातील क्षमतावान, पण परिस्थितीमुळे वंचित, उपेक्षित आणि गांजलेल्या लोकांना गाठून त्यांच्या समस्या सहानुभूतिपूर्वक जाणून घेण्याचा ‘फोटोऑप’ प्रयत्न करतात. पण काँग्रेस पक्षात ‘उरल्यासुरल्या’ प्रतिभावान उपेक्षितांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यापाशी वेळ नसतो.

दोन टप्प्यांमधील देशव्यापी ‘भारत जोडो’ यात्रांदरम्यान राहुल गांधी यांना प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेसजनांशी संवाद साधून नव्या प्रतिभेला आणि रक्ताला पक्षात स्थान देऊन पक्षसंघटना बांधण्याची सुवर्णसंधी होती. ती त्यांनी गमावली. शिवाय काँग्रेस पक्षासाठी डोईजड झालेली जुनी खोडंही ते आजतागायत दूर करू शकलेले नाहीत आणि वैचारिक बांधिलकी असलेल्या नव्या दमाच्या नेत्यांच्या मदतीने पक्षाचा विस्तार करण्यातही अपयशी ठरले आहेत.

Politics
Indian Politics : कॉँग्रेस-‘आप’चा कलह विकोपाला

सुमारांची गर्दी

‘‘ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. आपण नव्याने पक्षबांधणी करू,’’ अशी राहुल गांधी भूमिका घेतात. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे त्यांचीच री ओढताना दिसतात. अर्थात, ठाकरेंच्या पक्षात प्रतिभासंपन्न नेत्यांची वानवा असल्यामुळे त्यांना अशी विधाने करणे परवडू शकते. पण काँग्रेस पक्षाचे तसे नाही. काँग्रेसच्या विचारसरणीशी प्रतिबद्ध आणि ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्याच्या ससेमिऱ्यापासून मुक्त असलेल्या अनुभवी व बुद्धिमान नेत्यांचा सध्या काँग्रेसमधील बेसुमारांच्या गर्दीत श्वास कोंडला गेला आहे. काँग्रेस पक्षात आपल्या नेतृत्वाची उंची शाबूत राखण्यासाठी पक्षातील ‘उरल्यासुरल्या’ प्रतिभावान आणि अनुभवी नेत्यांना अडगळीत टाकण्याचा राहुल गांधी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोप होतो.

मुत्सद्दी थरूर

आपल्या प्रतिभेला हवा तसा न्याय मिळत नसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शशी थरूर यांच्यामुळे काँग्रेस पक्षातील ही कुंठित अवस्था ऐरणीवर आली आहे. परराष्ट्र धोरणात पारंगत शशी थरूर हे आंतररराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले मुत्सद्दी, लेखक, वक्ते, बुद्धिवंत, मुक्त वातावरणात वावरणारे, उदार लोकशाहीवादी, सुधारणावादी व्यक्तिमत्व आहे. ते पारंपरिक राजकारणी नाहीत. तरीही केरळमधील तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळविताना कुठल्याही राजकीय नेत्याला हेवा वाटेल, अशी लोकप्रियता त्यांनी संपादन केली आहे.

काँग्रेसमध्ये संघटनात्मक सुधारणा व्हाव्या म्हणून पक्षातील नाराज ‘जी-२३’ गटात सामील होऊन तसेच गांधी कुटुंबीयांची इच्छा नसतानाही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात ११.४ टक्के मते मिळविताना पक्षशिस्तीची चौकट न ओलांडता त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले. काँग्रेसश्रेष्ठींनीही काँग्रेस कार्यकारिणीत समावेश करून त्यांचा योग्य सन्मान केला. पण केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष बळकट करण्याची जबाबदारी सोपवून त्यांना सतत व्यग्र ठेवणे गांधी कुटुंबीयांना सहज शक्य आहे.

अनेकदा प्रतिभावान व्यक्ती भरकटून नको त्या चुकाही करते. त्याला थरूरही अपवाद ठरलेले नाहीत. पण अशा असंख्य चुका राहुल गांधींनीही केल्या आहेत. ‘‘पक्षात काम करण्याची संधी मिळावी. केरळमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अग्रगण्य नेत्यांमध्ये आपला समावेश व्हावा, आपल्या कल्पना जनतेपुढे मांडण्याची संधी मिळावी’’, अशी अपेक्षा राज्यात वर्चस्व असलेल्या नायर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या थरूर यांनी बाळगणे स्वाभाविक आहे.

Politics
Indian Politics : ‘मविआ’ला ठेच... ‘आप’ शहाणा

काँग्रेसच्या नेतृत्वाने म्हणजे राहुल गांधींनी कानाडोळा करू नये म्हणून पक्षाकडून संधी मिळत नसेल तर लिखाण, व्याख्यान आणि चर्चा-संवादाचे आपल्यापाशी भरपूर पर्याय असल्याची जाणीव करून देत थरूर यांनी आपल्याभोवती काहीसे संशयाचे वलय निर्माण केले आहे. आपल्याला भाजपमध्ये तसेच केरळमधील सत्ताधारी माकपमध्येही जायचे नाही, असा दावा थरूर करतात. अर्थात, पक्षाने केलेल्या दुर्लक्षामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते टोकाचे पाऊल उचलूही शकतात.

देशातील इतर सर्वच राज्यांप्रमाणे केरळमध्ये काँग्रेसची पक्षसंघटना भुसभुशीत नाही. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशाने ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तरीही विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा हरणाऱ्या काँग्रेसपुढे पुढच्या वर्षी पराभवांची हॅटट्रिक टाळण्याचे आव्हान असेल. केरळमध्ये प्रभावी नेतृत्वाचा असलेला भाजप सत्तेत येण्याचा चमत्कार घडवू शकत नाही. अर्थात, थरूर यांच्यासारखा नेता गळाला लागल्यास हमखास सत्तेत येण्याची काँग्रेसची संधी भाजप हुकवू शकतो.

वायनाडमधून लोकसभेवर निवडून आलेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना केरळच्या राजकीय अंतर्प्रवाहांची बऱ्यापैकी जाणीव आहे. शशी थरूर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार व्हावेसे वाटत असले, तरी रमेश चेन्निथला, के. सी. वेणुगोपाळ आणि व्ही. डी. सथीसन या जनाधार असलेल्या नेत्यांचीही दावेदारी नजरेआड करता येणार नाही. अशा स्थितीत थरूर यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाणून घेऊन त्यांचे बौद्धिक समाधान करण्याची जबाबदारी राहुल गांधी- प्रियांका गांधी वाड्रा यांनाच पार पाडावी लागणार आहे.

शशी थरूर यांच्यासोबत चर्चा करून त्या दिशेने त्यांनी पावलेही टाकली आहेत. पण शशी थरूर हे एकमेव नाराज नेते नाहीत. सचिन पायलट यांची दावेदारी दुर्लक्षित करून अशोक गहलोत यांना झुकते माप देणाऱ्या काँग्रेसश्रेष्ठींचे डोळे राजस्थानमधील सत्ता गमावल्यानंतर किंचित उघडले. एकेकाळी नकोसे झालेल्या पायलट यांना नाइलाजाने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस करावे लागले. उमेदीच्या काळात आपण सत्तेत असावे, असे प्रत्येक बड्या नेत्याला वाटत असते. सत्ता नसेल तर निदान पक्षात महत्त्वाचे पद तरी मिळावे, अशी त्यांची अपेक्षा असते.

गेल्या दहा वर्षांमध्ये याच कारणांमुळे काँँग्रेस पक्षाला प्रतिभावान महत्त्वाकांक्षी नेत्यांची गळती लागली आहे. आपल्यापेक्षा कमी कुवतीच्या लोकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देत असल्याचा राहुल गांधींवर आरोप होतो. महत्त्वाची जबाबदारी सोपविलेले नेते राहुल गांधी यांच्याविषयी आत्मीयता दाखवू शकलेले नाहीत तसेच पक्षाशी वैचारिकदृष्ट्या प्रतिबद्धही राहू शकलेले नाहीत, हे गेल्या दहा-पंधरा वर्षांत अनेकदा दिसले. पक्षात मानाचे स्थान मिळावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या अनेक ‘थरूर’ आणि ‘पायलटां’शी थेट संवाद साधला, तरच राहुल गांधींना काँग्रेस पक्ष शाबूत ठेवणे शक्य होणार आहे. नव्याने पक्षबांधणी त्यानंतरच होऊ शकेल.

(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com