Nashik News : केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीमुळे प्रचंड संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक जिल्ह्यात शेतकरी वर्ग संतप्त झाला असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
यातच, शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ११) चांदवड येथे आंदोलन होणार आहे. या वेळी ते कांदा उत्पादकांशी संवाद साधणार आहेत.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक झाला असून, शुक्रवारी ठिकठिकाणी आंदोलने झाल्यानंतर शनिवारपासून लिलाव बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता कांदा निर्यातबंदीवर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी खासदार शरद पवार रस्त्यावर उतरले आहेत.
निर्यातबंदी विरोधात सोमवारी (ता. ११) चांदवड येथील चांदवड आग्रा रोड चौफुली येथे सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाचे नेतृत्व खुद्द शरद पवार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप
यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात उरल्यासुरल्या पिकांचे मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसान झाले. त्यात शेतकऱ्यांनी कसेबसे कांद्याच्या पिकाला जगवले. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
यातच निर्यातबंदी केल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधात असल्याचा आरोप या वेळी जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी केला. या वेळी शहराध्यक्ष गजानन शेलार, दिंडोरी कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हा नेते गोकुळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले, लक्ष्मण मंडाले, राजेंद्र भोसले, वसंत ठाकरे, भास्कर भगरे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, शैला उफाडे, जिल्हा सरचिटणीस मुन्ना अन्सारी, अॅड. तुषार जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.