Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Article by Maharudra Mangnale : खूप दिवसांपासून असं सारखं वाटत होतं की, मला कोणाशी तरी खूप काही बोलायचंय. पण कोणाशी बोलावं? ज्याच्याशी बोलायचं, त्याला माझं बोलणं कळायला तर हवं. त्याची ते ऐकून घेण्याची तयारी तरी हवी.
Shetkari Sanghtana Office
Shetkari Sanghtana OfficeAgrowon

महारुद्र मंगनाळे

खूप दिवसांपासून असं सारखं वाटत होतं की, मला कोणाशी तरी खूप काही बोलायचंय. पण कोणाशी बोलावं? ज्याच्याशी बोलायचं, त्याला माझं बोलणं कळायला तर हवं. त्याची ते ऐकून घेण्याची तयारी तरी हवी. तो नुसताच हो.. हो म्हणून ऐकूनही घेईल. पण मी जे बोलेन ते त्याला कळेल याची खात्री काय? शब्द कळतील ,पण शब्दांमागचा माझा आशय, भावना त्याला कशी कळेल? ती कळावी अशी मी अपेक्षा तरी का करावी? फार तर त्याला ज्या विषयात रस आहे, तेवढं तो ऐकून घेईल. बाकीच्या विषयांचं काय? मला तर खूप बोलायचं होतं. काय काय साठलं होतं मनात? हे योग्य की अयोग्य, चांगलं की वाईट, समृद्ध जगणं म्हणजे काय? त्याचे निकष काय? असे काही व्यावहारिक, काही तत्वज्ञानात्मक, काही निरर्थक वाटणारे, काही गुढ वाटणारे असे अनेक प्रश्न. या प्रश्नांनी गुदमरून टाकलं होतं. मला मोकळं व्हायचं होतं. आमचा मुलगा आनंद इथं असता तर कदाचित त्याच्याशी बोललो असतो. फोनवर हे सगळे विषय बोलणं शक्यचं नव्हतं.

कोणाशी बोलून मोकळं व्हावं? कोण आहे असा की, ज्याच्यासमोर मला मुक्तपणे मोकळं होता येईल. बरीच नाव समोर आली. गेली. काहीच सुचत नव्हतं. तीन आठवड्यांपासून मनात हा कल्लोळ सुरू होता. ही अस्वस्थता कोणाला सांगण्यासारखी नव्हती. तरीही चुकून एखाद्या फेसबुक नोंदीतून ती सुचकपणे व्यक्त होत होती. पण माझ्या अस्वस्थतेची कारणं त्यातून कळत नसल्याने मित्रांचाही गोंधळ वाढला. अनेकांनी मला नैराश्य आलयं, असा निष्कर्ष काढला. तेव्हा ठरवलं, हे योग्य नाही. हा काही सार्वजनिक विषय नाही. माझा व्यक्तीगत विषय आहे तर तो माझ्या पातळीवरच सोडवायला हवा. पण कोणाशी बोलावं हे काही ठरत नव्हतं.

प्रा.सुरेशचंद्र म्हात्रे सर हे नाव चळवळीतील, शेतकरी संघटनेतील सगळ्या कार्यकर्त्यांना माहित आहेच. माझंही ते आवडतं व्यक्तीमत्व आहे. चार वर्षांपूर्वी सुधाकर जाधव सरांच्या मुक्तरंग प्रकाशनने काढलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात झाला होता. तेव्हा म्हात्रे सरांची भेट झाली होती. नंतर फोनवर दोनवेळा बोलणं. पण प्रत्यक्ष भेट नव्हती. ते माझ्या फेसबुक नोंदी नियमित पाहतात. क्वचित प्रतिक्रिया नोंदवतात. सर,माझ्या रुद्रा हट जीवनशैलीचे चाहते आहेत. त्यांना आवडलेल्या बाबी ते क्वचित मला व्हाट्सएपवर पाठवतात. गेल्या आठवड्यात सरांनी माझ्या एका मित्राच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया नोंदवली. आणि माझ्या समोर अचानक नाव आलं, सुरेशचंद्र म्हात्रे सर.

मला पहिल्यांदा माझा स्वत:चाच राग आला की, हे नाव कसं काय सुचलं नाही. होतं असं कधी कधी म्हणून मनाची समजूत काढली. ठरवलं म्हात्रे सरांकडं आंबेठाणला जायचं. दुसऱ्या दिवशी सरांना फोन केला.तब्येतीची चौकशी केली आणि भेटायला येण्याची इच्छा आहे, येऊ का? असं विचारलं.सर बोलले, 'या'. मी म्हटलं, "तीन दिवसात मी निघेन. फोन किंवा मेसेज करतो."

Shetkari Sanghtana Office
Maharudra Mangnale : माझ्या जगण्याची प्रेरणा शेतीच!

खरं तर,लगेच निघावं,असं वाटत होतं. पण दोन दिवस इथं थोडी कामं होती. १८ तारखेला सकाळी १० वाजता बागेतील झाडांना पाणी देण्याचा फेरा संपला. पटकन तयार होऊन, ११ वाजता बसस्थानकावर पोचलो. लगेच लातूरची बस मिळाली. लातूरला सव्वा बारा वाजता उतरलो तर लातूर-पुणे बस लागलेली. लगेच त्या बसमध्ये बसलो. बस ६०च्या स्पीडला लॉक केलेली होती. दिवसभर ऊन एन्जॉय करीत, रात्री १०-३० वाजता हडपसरला उतरलो. पत्रकार मित्र प्रमोद गिरीला कल्पना दिली होती. प्रमोदपेक्षा त्याच्या आईला भेटण्याची तीव्र इच्छा होती. २००२ते २००५ या काळात पुण्यात आल्यानंतर आईच्या हातचं अनेकदा खाल्लं होतं. अकरा वाजता घरी पोचलो. भात, वरण खाऊन आई, वहिनी, गौरव यांच्याशी गप्पा मारून झोपलो. पहाटे पाचला उठून तयार झालो. काळा चहा पिऊन सहा वाजता बाहेर पडलो. हडपसर ते नाशिक फाटा बस, तिथून भोसरी रिक्षा, तिथून चाकणचा आंबेठाण चौक रिक्षा, पुन्हा वेगळ्या रिक्षाने आंबेठाण, असं करीत पावणेनऊ वाजता अंगारमळ्यात पोचलो.

म्हात्रे सर वाटेत उभेच होते.बोलतच मुक्कामी पोचलो. मला जे जे काही सांगायचंय ते मी सलगपणे बोलत होतो. सर शांतपणे ऐकत होते. आवश्यक तो प्रतिसादही देत होते. मी बोलून बोलून मोकळा होऊन गेलो.

वाटलं झालं बोलून. दुपारी बबनरावांच्या पत्नींनी भाकरी, भाज्या, लोणचं, भात, वरण, तळलेले पापड असं रूचकर जेवण आणून दिलं. मी पोटभर जेवण केलं. सर दुपारी जेवत नाहीत. तरी माझ्यासोबत चपाती खाल्ली. प्रवासाचा थकवा होताच. तासभर मी आत पलंगावर डुलक्या खाल्ल्या. वातावरणात प्रचंड उकाडा होता. बाहेर आलो.पाणी पिऊन पुन्हा चर्चा सुरू झाल्या. मला जे जाणून घ्यायचं होतं, त्यासंदर्भात सरांना प्रश्न विचारत होतो. सर त्याची उत्तरं देत होते. अनेक जुन्या गोष्टी, आठवणी असं बरच काही सुरू होतं.

मधेच सरांनी भाजलेल्या तंबाखूची पुड आणून ती दातांना लावली. मिश्री लावणं असं याला म्हणतात. याचेही कितीतरी किस्से सरांनी सांगितले. इतक्या वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध असतानाही, सरांची कौटुंबिक पार्श्वभूमी मला माहित नव्हती. ती सरांनी सांगितली. गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांना आलेले अनुभव, ते शेतकरी संघटनेशी, शरद जोशींशी कसे जोडले गेले, हेही सांगितलं.

Shetkari Sanghtana Office
Maharudra Mangnale: शेतातलं गाजरगवत काढतन अजूनही तारांबळ उडतेच!

ऊन कमी झाल्याने, मी परिसरात फिरू या ,असं म्हटलं. बाहेर पडलो. शरद जोशी खासदारकीची मुदत संपल्यानंतर इथं राहायला आले. त्यानंतर त्यांच्या जुन्या राहण्याच्या जागेचं नुतनीकरण करण्यात आलंय. ते ही साधंच आहे. ते संपूर्ण घर बघितलं. त्यांचं ग्रंथालय बघितलं की, त्यांचं वाचन किती अफाट होतं, ते लक्षात येतं. या घराच्या बाजुलाच शरद जोशींनी बागकाम सुरू केलं होतं. या बागेला त्यांनी,'शकूंतला बाग' असं नाव दिलं होतं, असं सर म्हणाले.

तिथल्या जमीनीत दिवंगत बबन शेलार यांच्या पत्नी बाजरीचं पिकं घेतात. ते बघितलं. शरद जोशी यांच्या अस्थी ज्या वडाच्या झाडाखाली पुरण्यात आल्यात, ते झाडंही सरांनी मला दाखवलं. ते बघून मी भावूक झालो. म्हात्रे सरांना मी म्हटलं, भाजपाच्या संपर्कात आलेले, त्यांच्या मदतीने खासदार बनलेले शरद जोशी मला फारसे आठवत नाहीत. मात्र शेतकऱ्यांचा देशव्यापी लढा उभारणारे, शेतकरी या नावाला वजन प्राप्त करून देणारे, शेतकऱ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणारे, त्यांना विचार करायला लावणारे शरद जोशी मला प्रिय आहेत. त्यांचं या संदर्भातील योगदान कोणीच नाकारू शकत नाही. ते जाऊन नऊ वर्षे होऊन गेलीत. त्यांचा वैचारिक वारसा जिवंत ठेवणारं स्मारक इथं उभं राहायला हवं. मी हे सहजच बोलून गेलो.

सर बोलले, अंगारमळ्याची ही सगळी जागा विकण्याचा ट्रस्टने मागेच निर्णय घेतलाय. यावर याआधी भरपूर चर्चा होऊन निर्णय झालाय. त्याची तयारी सुरू आहे. सगळ्यांना याची कल्पना आहे. तुम्हाला माहित नाही, याचंच मला नवल वाटलं.

मला सरांचं हे बोलणं ऐकून धक्काच बसला. सगळी जागा विकणार म्हणजे, इथलं शरद जोशी हे नावच पुसलं जाणार. ज्या भूमीत राहून शरद जोशींनी कोरडवाहू शेतीचे प्रयोग केले. शेतीचं अर्थशास्त्र मांडलं. सतत दहा वर्षे राज्यकर्त्यांच्या मनात धडकी भरवणारी आंदोलनं केली, प्रत्येक शेतकऱ्याला त्याची ओळख पटवून दिली, हजारो शेतकऱ्यांना, विचार कसा करावा, याचं प्रशिक्षण दिलं, आंबेठाण हे गाव जगाच्या नकाशावर आणलं, ते सगळं पुसून काढणार. शरद जोशी यांचं कसलंच अस्तित्व इथं शिल्लक राहणार नाही. माझं डोकं भणाणून गेलं. सरांना काय बोलावं ते मला सुचेना. दोघेही बराच वेळ शांत होतो. मी थोडंस जोरातच सरांना म्हटलं, तुम्ही पण ट्रस्टी आहात ना सर

म्हात्रे सर शांतपणे बोलू लागले, महारुद्र तुम्ही एवढं भावनिक होऊ नका. ट्रस्ट शरद जोशी यांच्या हयातीतच निर्माण झालाय. ट्रस्टीही त्यांनीच निवडलेले आहेत. त्यांनी निर्णय घेतला. मी तटस्थ राहिलो. माझा या निर्णयाला ना पाठिंबा आहे, ना विरोध. मी तसं लेखी नोंदवलयं. मी म्हटलं, असं कसं सर. तुम्ही विरोध करायला हवा होता. सर हसून बोलू लागले, महारुद्र मी काय म्हणून विरोध करू? या वयात ते स्मारक उभारण्याची जबाबदारी मी घेऊ. ते शक्य नाही. शिवाय बहुमताचा निर्णय, हाच निर्णय असतो. शरद जोशी यांचे एवढे निष्ठावान भक्त, चाहते आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी पुढे येऊन या कामाची जबाबदारी घ्यायला हवी होती. का कोणी पुढं आलं नाही? पण त्यांनाही आषाढी-कार्तिकी एकादशी सारखं दर्शनाला यायचं असतं.

शरद जोशींना जाऊन नऊ वर्षे झाली. मी इथंच आहे अजून. मी ८० वर्षांचा झालोय. ट्रस्टी मला यातून कधी मोकळं करतात, याची मी वाट बघतोय. मी म्हटलं, माफ करा सर. सहज विषय निघाला आणि माझ्या भावना मला आवरता आल्या नाहीत, बोलून गेलो. मला यावर काही बोलण्याचा अधिकारही नाही. मी विषय बदलला. मी रुद्रा हट मधील माझ्या जगण्याबद्दल बरचं काही बोललो. पण अंगारमळ्याचंअस्तित्व राहणार नाही, हे काही डोक्यातून जात नव्हतं.

मी मनातल्या मनात म्हटलं, शरद जोशींसारख्या एका लढवय्या नेत्याबाबत असं काही घडू शकतं, तर आपलं काय खरं आहे? मी सरांना म्हटलं, माझ्या पश्चातही रुद्रा हट कोणालाच विकता येणार नाही, अशी तरतूद मला करावी लागेल. सर बोलले, विचार चांगला आहे. बघा कसा अंमलात आणता ते!

सरांनी बबन शेलार यांच्या दोन्ही मुलांची ओळख करून दिली. मोठा मुलगा अभिमन्यू हा व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणानिमित्त पुण्यात असतो. योगायोगाने तो आला होता. मी ,रुद्रा हटच्या फेसबुक नोंदी, हे पुस्तक त्याला भेट दिलं. त्याच्याशी छान गप्पा मारल्या. छोटा मुलगा बळीराजा दोनवेळा चहा देऊन गेला. सायंकाळी पुन्हा बाहेर फिरून आलो. रात्री भात वरण असं साधंच जेवण घेतलं. साडे अकरा वाजेपर्यंत इतर विषयांवर चर्चा करीत राहिलो. साडेअकरा वाजता झोपलो. पण झोप आलीच नाही. तीन वाजताच उठून बाहेर येऊन बसलो. चार वाजता सर उठले. मी ग्लासभर काळा चहा केला. सर मिश्री लावत माझ्याशी बोलत राहिले. पहाटेच आंघोळ केली. सहा वाजता निघालो. सरांचा निरोप घेताना गलबलून आलं. बळीराजाने मला चाकणपर्यंत सोडलं. तिथून १३ व्या तासाला रुद्रा हटला पोचलो.

मी हे जे नोंदवतोय ते सरांना आवडणार नाही असं वाटतयं. पण माझं मन मला सांगतयं. नोंदव. यात खोटं, चुकीचं काहीच नाही. मी माझ्या फक्त भावना नोंदवतोय. मला या निर्णयाचं मनापासून वाईट वाटतं एवढंच. आणि हे लिहिल्याने वास्तवही बदलणार नाही. तर माझं लिहिण्याचं समाधान तरी मी का गमावू?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com