Organic Farming Experiments : राहुरीच्या कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेतीचे प्रयोग

Mahatma Phule Agricultural University : राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती व प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली आहे. सेंद्रिय शेतीला राज्यात चालना मिळावी व शेतकऱ्यांना या शेती पद्धती मार्गदर्शक ठराव्यात हा त्यातील मुख्य उद्देश आहे.
Organic Farming Experiments
Organic Farming ExperimentsAgrowon

Organic Farming : रासायनिक निविष्ठांच्या असंतुलित वापराचे माती, शेती, पर्यावरण आदींवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. रासायनिक निविष्ठांच्या किमतीही वाढल्या आहेत. साहजिकच अलीकडील काळात सेंद्रिय शेती व अन्नाचे महत्त्व वाढले आहे.

काळाची गरज लक्षात घेऊन राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही २०१८ मध्ये सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. विद्यापीठ प्रक्षेत्रात १८ हेक्टर २० गुंठे क्षेत्रावर त्याची व्याप्ती आहे.

कुलगुरु डाॅ. प्रशांतकुमार पाटील, संशोधक संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व कृषी विद्या विभागाचे प्रमुख डाॅ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे प्रकल्प सहसमन्वयक म्हणून डाॅ. उल्हास सुर्वे जबाबदारी सांभाळत आहेत. सेंद्रिय शेती सुरू करून तीन वर्षे पूर्ण झाली असून, एका प्रमाणीकरण संस्थेकडून प्रमाणीकरणही झाले आहे.

केंद्रातील प्रयोग

- दहा ते वीस गुंठ्यांवर काही प्रयोग. काही क्षेत्रावर सघन पद्धतीने मिश्र फळबाग पद्धत घेतली आहे. त्यात सावलीत येणारी हळद, आले यांसारखी पिके घेतली आहेत.

- सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, कांदा, ऊस, आवळा, शेवगा तसेच फळपिकांमध्ये केळी, आंबा, अंजीर, डाळिंब, बोर, द्राक्ष, मोसंबी, पपई आदींची लागवड. पेरू (सरदार) व सीताफळ (फुले पुरंदर व बाळानगर) प्रत्येकी पाच एकरांवर.

-खरिपात वीस गुंठ्यांवर ताग, धैंचा आदी हिरवळीच्या पिकांची लागवड व जमिनीत ते गाडल्यानंतर रब्बीची पिके घेतली.

-तीन वर्षांच्या प्रयोगात ऊस, मका व गहू ही पिके वगळता अन्य पिकांच्या उत्पादनात १२ ते १५ टक्के वाढ दिसून आली आहे. मातीतील जिवाणूंची संख्या वाढली आहे.

Organic Farming Experiments
Organic Farming : सेंद्रिय शेती गोसंवर्धन काळाची गरज

केसर आंब्याची विक्री

एक हेक्टरवर केसर आंब्याची सुमारे २६० झाडे लावली आहेत. मागील वर्षी व्यापाऱ्यांनी ६५ हजारांना बाग घेण्याची मागणी केली. मात्र सेंद्रिय उत्पादन असल्याने टिकवणक्षमता, स्वाद यांचा दर्जा चांगला होता.

त्यामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रात तसेच शिर्डी-नगर रस्त्यावर थेट ग्राहकांना विक्री केली. त्यातून सव्वातीन लाख रुपयांचे उत्पन्न विद्यापीठाला मिळाले. शिवाय ग्राहक बाजारपेठ तयार झाली.

बीजोत्पादन

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीत दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे असा केंद्राचा प्रयत्न आहे.
त्यातूनच दरवर्षी एकूण क्षेत्रातून सोयाबीनचे ७६ क्विंटल, हरभरा ५६ क्विं., हळद ५ क्विं. व आले ३ टन याप्रमाणे बीजोत्पादन घेण्यात आले आहे. एका वर्षी कांद्याचे बीजोत्पादनही घेण्यात आले.

सेंद्रिय निविष्ठा उत्पादन

सेंद्रिय खतांचा वापरातून उत्पादन व जमीन सुपीकतेत वाढ हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्यासाठी सेंद्रिय निविष्ठा उत्पादन असा कक्ष आहे. त्यादृष्टीने गांडूळ खताचे ११ बेड्‍स आहेत.

व्हर्मिव्हॉश युनिट, सेंद्रिय द्रावणे, दर्शपर्णी अर्क, जिवामृत फिल्टर आदी सुविधा केल्या आहेत.
गोमूत्र, शेणखत, गांडूळ खत, ह्युमिक ॲसिड, वेस्ट डी कंपोजर, तसेच अन्य सेंद्रिय निविष्ठांचा
स्वतंत्र तसेच एकत्रित असे प्रयोग केले जात आहेत. विविध पद्धतींबाबत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा व प्रशिक्षणे घेण्यात येतात.

जनावरे संगोपन व सेंद्रिय खत

विविध खतांची उपलब्धता होण्यासाठी देशी गोपालन, शेळी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, हिरवळीची आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. उत्पादन खर्च कमी करता येईल अशी एकात्मिक सेंद्रिय शेती प्रणाली विकलित केली आहे.

प्रत्येकी दोन साहिवाल, राठी, थारपार अशा देशी गायींचा गोठा आहे. दहा शेळ्या, तर शंभर कोंबड्याचे पालन केले आहे. पूरक व्यवसायाला बळकटी मिळावी म्हणून शेततळ्यातील मत्स्यपालनही केले आहे. शेणांपासून अगरबत्ती, धूपबत्ती, पणत्या, कुंड्या, गवऱ्या, गोमूत्र अर्क निर्मिती केली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रे खरेदी केली आहेत. पशुखाद्य म्हणून अझोला माॅडेलही तयार केले आहे.

Organic Farming Experiments
Organic Farming : राहुल रसाळ यांना ‘रोमीफ’चा ‘सेंद्रिय शेती’पुरस्कार’

बलून पद्धतीची बायोगॅस निर्मिती

एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेता येणे शक्य अशी बलून पद्धतीची २० बाय १२ फूट क्षेत्रात बायोगॅस निर्मिती केली आहे. दररोज ४० किलो शेण व ८० लिटर पाण्याची गरज भासते. दिवसाला अडीच ते तीन तासांसाठी वापरण्याजोगी इंधननिर्मिती त्याद्वारे केली जाते.

तयार होणाऱ्या स्लरीचा पिकांसाठी वापर होतो. युनिटमधील गायींपासून वर्षभरात काही टन शेणखत, कोबड्यांपासून तीन टनांपर्यंत कोंबडीखत तर शेळ्यांपासून पाच ते सहा टन लेंडीखत मिळते.

संपर्क - डाॅ. उल्हास सुर्वे, ९८२२६०६५११

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com