Book Review : ग्रामीण कथा जीवनाचा कोलाज

Rural Story : शेतीप्रधान भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक स्तरांवर बदल झाले. जगभरात शेतीत झालेले प्रयोग भारतानेही आत्मसात केले आणि सत्तरच्या दशकानंतर अन्नधान्याच्या बाबतीत आपण बव्हंशी स्वयंपूर्ण झालो.
Book Review
Book ReviewAgrowon
Published on
Updated on

Pandurang Kranti Book :

पुस्तकाचे नाव : पांडुरंग कांती

लेखक : र. वा. दिघे

प्रकाशक : श्री लेखन भांडार पुणे

किंमत : ३० रुपये

शेतीप्रधान भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक स्तरांवर बदल झाले. जगभरात शेतीत झालेले प्रयोग भारतानेही आत्मसात केले आणि सत्तरच्या दशकानंतर अन्नधान्याच्या बाबतीत आपण बव्हंशी स्वयंपूर्ण झालो. हे बदल साहित्यात टिपण्याचे प्रयोगही झाले. र. वा. दिघे हे गेल्या शतकातील महत्त्वाचे मराठी लेखक. आजच्या तरुण पिढीला हे नाव फारसे ठाऊक नाही, मात्र त्यांच्या साहित्यातील कसदारपणा हा त्यांनी केलेल्या शेतीइतकाच अस्सल होता.

पाणकळा, हिरवा सण, पांडुरंग कांती, सोनकी, पड रे पाण्या अशा त्यांच्या साहित्यकृतीतून १९४० ते १९६५ या काळातील ग्रामीण, कृषी मराठी जीवनाचे दर्शन घडते. काळाचा हा पट सामाजिक बदलांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. शेतीबरोबरच समाजातल्या अनेक अंगांमध्ये झपाट्याने बदल होत होते. पांडुरंग कांती या कथासंग्रहातील कथा वाचताना या बदलांचे दर्शन घडते.

Book Review
Book Review : कासरा : जमिनीशी नाळ जोडलेली कविता

‘पांडुरंग कांती’ या पहिल्या कथेत विज्ञानाची सफर आहे. एक हजार वर्षांनंतरचा काळ यात कल्पित आहे. भारताने वैज्ञानिक, अवकाश क्षेत्रात घेतलेली भरारी आणि बाह्य अवकाश न्याहाळत असताना ज्ञानेश्वरी आणि गीतेतील वचनांची त्यांना आठवण होते. ‘गरिबी हटाव’ या कथेत शिक्षणाअभावी एक हरकाम्या मनुष्य कसा अधिकाधिक गरीब होत जातो व प्रत्येक स्तरावर त्याची पिळवणूक कशी होते याचे चित्रण दिसते.

‘सुरंगीची वेणी’ या कथेत कोकणात ग्रामीण भागात गेलेला ध्येयवादी शिक्षक हा कमी पैशातही निसर्गाच्या सान्निध्यात मजेत राहतो मात्र, जास्त पैशाच्या हावेने शहरी भागात कारखान्यात कामाला लागलेल्या मित्राला मात्र ते समाधान लाभत नाही, हे लेखकाने खेळकर शैलीत दाखवलं आहे. ‘दर्यातील झुंज’ ही दीर्घकथा, मच्छीमार समाजाच्या पार्श्‍वभूमीवर रेखाटलेली आहे. कथेतील सामान्य भाग वगळता त्या काळात मुंबई कशी वाढली व गुन्हेगारीचा शिरकाव त्यात कसा झाला हे लक्षात येते.

‘बहादूऱ्याची लेक’ व ‘येसू सुंदरा’ या कथांची पार्श्‍वभूमी घाटावरील ग्रामीण भागातील असून कथानक हेही गावातील श्रीमंत दुष्ट मनुष्य व गरीब लोक यांच्यातील संघर्ष यावर बेतलेले आहे. मात्र या कथांचे जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे आज मराठी भाषेतून जे शब्द वापरातून जवळपास लुप्त झाले आहेत, ते अनेक ग्रामीण शब्द यात वाचायला मिळतात, कित्येक शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा आधार घ्यावा लागतो.

Book Review
Book Review : वाचन प्रक्रियेचा सर्वांगीण आढावा

‘तू मेरी मैना’ ही मात्र विनोदी अंगाने लिहिलेली शहरी कथा आहे. पुस्तकातील किडा असलेला शास्त्री हा तरुण, मित्रांच्या आग्रहाने सैन्यात भरती होतो आणि मग जी धमाल उडते ती वाचण्याजोगी आहे. सैन्यात भरती झालेले रंगरूट करत असताना अनेक इंग्रजी गाणी म्हणतात, ती लेखकाने दिली आहेत. आजच्या काळात या गाण्याचा शोध घेतला असता बऱ्याच रंजक हकिकती आपणास समजू शकतात.

या सर्व कथा त्या काळातील वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे पुस्तक रूपाने त्या एकत्र येताना कोणत्याही एका सूत्राचा अभाव आपल्याला दिसून येतो; मात्र असे असले, तरीही स्वातंत्र्याच्या आगेमागे आपल्या मराठी समाजात जी महत्त्वाची स्थित्यंतरे झाली, ती समजण्यास आपल्याला याचा उपयोग होतो.

विज्ञान, शेती याबरोबरच सामाजिक समता आपल्यासाठी महत्वाची आहे आणि आजच्या आधुनिक युगातही आपण तो पल्ला पुरेसा गाठू शकलेलो नाही. हे सत्य आहे. यामागची कारणमीमांसा लेखकाला विचारप्रवृत्त करते. त्या काळात महात्मा फुले, गांधीजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या सामाजिक सुधारणांच्या पायावर अनेक सुधारक कार्य करीत होते. या कार्यात महाराष्ट्र मागे नव्हता.

मात्र आधुनिक शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष, अंधश्रद्धा, तसेच जातीपातीतील परस्परद्वेष यामुळे कुठेतरी या सुधारणेच्या कामास खीळ बसायची. तरीही र. वा. दिघे यांच्यासारखे एकांडे शिलेदार काम करत राहिले. त्यांच्या लेखनातील प्रेरणा समजून घेऊन आजच्या काळात हे पुस्तक वाचले तर पुढील पिढीस ते जास्त मार्गदर्शक ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com