
Book Update :
पुस्तकाचे नाव : ज्वारीची कहाणी
लेखक : धनंजय सानप
प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे
पाने : १२५
किंमत : १५० रुपये
नैसर्गिक संसाधनांपासून विशेषत: पाण्यापासून वंचित कोरडवाहू शेतकऱ्यांना राजकीय आवाज नाही. त्यामुळे त्यांचा दबाव गट नाही. ते पिकवीत असणाऱ्या शेतीमालावर फारशी प्रक्रिया होत नाही, त्यामुळे तो कच्च्या मालाचा पुरवठादार नसल्यामुळे त्यांचा प्रभावसुद्धा फारसा नाही. याचा एक परिणाम म्हणजे त्यांच्यासाठी आखली जाणारी धोरणे सुद्धा कमी आणि त्यांच्या पिकावर होणारे संशोधन सुद्धा कमी. अशा दुर्लक्षित पिकांपैकी एक पीक म्हणजे ज्वारी. अशा पिकाचा इतिहास, संशोधन, धोरण, प्रक्रिया, राजकारण असा समग्र विचार मांडणारे एखादे पुस्तक प्रकाशित होणे ही गोष्ट कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल. तरुण लेखक धनंजय सानप यांनी ज्वारीची कहाणी हे पुस्तक लिहून एक चांगला प्रयत्न केला आहे.
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी १९८७ मध्ये ज्वारी परिषद घेतली होती. त्यानंतर सरकारी व्यवस्थेपर्यंत आवाज जाईल असे एकही आंदोलन ज्वारीसाठी झाले नाही, ही बाब चिंता वाढविणारी अशीच म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला मालदांडी हा ज्वारीचा वाण १९३७ मध्ये प्रसारित झाला. आज रब्बी ज्वारीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास निम्म्याहून जास्त क्षेत्र केवळ या एका वाणाखाली आहे. याचा अर्थ अनेक संशोधन संस्थांनी अनेक वाण प्रसारित करूनही आजही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मालदंडीच्या तोडीचा वाण निर्माण झाला नाही असे म्हणता येते.
ज्वारीची कहाणी हे पुस्तक एकाच वेळी विद्यार्थी, अभ्यासक, शेतकरी आणि धोरणकर्ते यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते आहे. कारण हे पुस्तक केवळ ज्वारी या पिकाची माहिती देत नाही, तर ज्वारीचे क्षेत्र कशा पद्धतीने कमी होते आहे हे सांगते, ज्वारीच्या संशोधनावर भाष्य करते, ज्वारीचे अर्थकारण या प्रकरणातून धोरण दुष्काळावर असूड ओढते आणि ज्वारी उत्पादकांचे वास्तव या प्रकरणातून शेतकऱ्यांची वेदना सुद्धा मांडते. त्याच बरोबर ज्वारीची पेरणी ते काढणी, ज्वारीपासून मद्यनिर्मिती, ज्वारी प्रक्रिया उद्योग यांसारख्या प्रकरणांतून नवीन शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर माहितीसुद्धा देत राहते.
ज्वारीखालील क्षेत्र कमी होणे, खिलार किंवा अन्य भारतीय वंशाचे पशुधन कमी होणे आणि जमिनीची सुपीकता कमी होणे यामध्ये मोठा परस्पर संबंध आहे. ज्वारी घेणे परवडत नाही, त्यामुळे देशी पशुपालनसुद्धा परवडत नाही, त्यामुळे जमिनीला शेणखत उपलब्ध होत नाही आणि म्हणून तिची सुपीकता टिकून राहत नाही. या सर्व विषयांचा थोडक्यात परिचय वाचकाला ‘कडबा : चारा की चिपाड’ या प्रकरणातून होतो.
ज्वारी हे पीक सर्वांकडून दुर्लक्षित होते आहे, अशी भूमिका मांडताना सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन संस्थांकडून काही एक प्रयत्न सुरू आहेत, याची नोंद ज्वारी संशोधन संस्थाची धडपड या प्रकरणातून घेतली आहे. त्यामुळे पुस्तकातील चर्चा ही दुसरी बाजू सांभाळणारी किंवा समतोल अशी झाली आहे.
कोरडवाहू शेतीमध्ये कडधान्य पिकांचे मोठे महत्त्व आहे. त्या पिकांचे अनेक वाण विकसित करणारे आणि कोरडवाहू शेतीला मुख्य चर्चाविश्वात आणणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख. त्यांची सविस्तर मुलाखत या पुस्तकामध्ये नवोदित लेखकाने केलेल्या चर्चेला वजन प्राप्त करून देणारी ठरली आहे.
‘अॅग्रोवन’ डिजिटलमध्ये कार्यरत असलेल्या धनंजय सानप यांचे हे पहिलेच पुस्तक. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. शेतकरी आणि संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून, अनेक संदर्भ मिळवून हे पुस्तक लिहिले असल्यामुळे तो शेती संदर्भ ग्रंथ नक्की ठरेल. त्याच बरोबर अशा पद्धतीचे उपक्रम इतर संस्थांनी तरुण लेखक अभ्यासकांसाठी आयोजित केले पाहिजेत असे सुचविणारे सुद्धा आहे. इतर पिकांबाबत सुद्धा अशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजे.
ज्वारी हे एक महत्त्वाचे पीक आहे. त्यासाठी अनेक प्रकरणे, अनेक विषय घेऊन केलेली मांडणी आणखी सविस्तर करता आली असती. काही प्रकरणांमध्ये खूप कमी, त्रोटक चर्चा केली आहे. विशेषतः ज्वारीचे अर्थकारण, हवामान बदलाचा ज्वारीला फटका या प्रकरणांमध्ये वाचकाला समृद्ध करणारी चर्चा झाली असती तर बरे झाले असते असे वाटत राहते. धनंजय सानप यांनी एका दुर्लक्षित विषयाला हात घालून केलेली मांडणी आश्वासक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.