Indian Politics : रिश्ते नये, सोच वही !

Politics Update : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज आमूलाग्र बदलला आहे. अनेक राजकीय समीकरणे नव्याने साकारली आहेत. तरीदेखील मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेच्या बाबतीतील मानसिकता मात्र तीच असल्याचे दिसून येते.
Politics
PoliticsAgrowon
Published on
Updated on

सुनील चावके

Maharashtra Assembly Election 2024 : पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि बहुमताने सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष उफाळून आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन झालेल्या रस्सीखेचीमुळे कोणी कल्पनाही केली नव्हती, अशी राज्याच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. यंदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पुन्हा फडणवीस आणि ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पण पाच वर्षांपूर्वी ध्यानीमनी नसलेले चेहरे आज त्यांचे स्पर्धक बनले आहेत.

महाराष्ट्रात सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीला सारखाच छळतो आहे. मविआचा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसला तर मुख्यमंत्रिपदावरुन निवडणूकपूर्व उतावळेपणा करण्याचा तर शापच लागलेला आहे. पाच वर्षांपूर्वी सत्तेच्या आसपासही फिरकण्याची शक्यता नसल्यामुळे काँग्रेसचे नेते गप्प होते. पण राज्यात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे काँग्रेसचा ‘खळखळाट’ वाढला आहे. महायुती सोडून मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी महाविकास आघाडीत सामील झालेले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी राहुल गांधी यांचे लाडके नाना पटोले यांच्या दावेदारीचा सामना करावा लागत आहे.

Politics
Indian Politics : ‘कुरुक्षेत्रा’वरील महाभारत

हरियानाच्या अपेक्षाभंग करणाऱ्या निकालामुळे काँग्रेसच्या आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह लागले असताना उद्‍भवलेला हा वाद सत्ताधारी महायुतीच्या पथ्यावर पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याइतपत राज्यात एकतर्फी निकाल लागण्यासारखे वातावरण नाही, याची कल्पना असूनही नाना पटोले आणि ठाकरे गटात कलगीतुरा सुरुच आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरे यांना आश्वस्त केल्याची वदंता आहे. त्या स्थितीत त्यांनी नाना पटोले यांना शांत राहण्यास सांगायला हवे. पण तसे काही झालेले नाही. शिवाय सत्ता आल्यास मविआचा मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरविण्याचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना अद्याप तरी कोणी दिलेले नाहीत. तो निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशा स्थितीत लढाई होण्याआधीच डोक्यावर मुकूट चढविण्याच्या स्पर्धेत मविआतील मुंगेरीलाल व्यग्र झालेले दिसतात.

लोकप्रियतेचा आलेख

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्वात जास्त स्ट्राईक रेटसह सर्वशक्तिमान भाजपच्या जवळजवळ बरोबरीत पोहोचल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपची काँग्रेसविरुद्ध देशातील सर्वात मोठी हार होत असताना शिंदेंच्या शिवसेनेने सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊ राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रोखले. त्यापाठोपाठ ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावत चालला आहे. उबाठा वगळता अन्य कोणत्याही विरोधी पक्षावर कडवट टीका करीत नसल्यामुळेही मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा सौम्य आणि सकारात्मक भासते आहे. या आभासाचा दिल्लीतील भाजपश्रेष्ठींवरही प्रभाव पडल्याचे चित्र आहे.

Politics
Indian Politics : डाव केजरीवालांचा, कसोटी राहुल गांधींची

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये भाजपची विश्वासार्हता घटल्यामुळे पीछेहाट होण्याची चिन्हे असल्याचे निदर्शनास आणून देत अशा स्थितीत महायुतीला होणारे नुकसान भरुन काढण्याची क्षमता शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत असल्यामुळे महाविकास आघाडीला रोखण्यासाठी आम्हाला १२० जागांवर लढू द्या, असा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनेची ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळलेली नाही. पण ती मान्यही करण्यास राजी नसल्याचे स्पष्ट केले. याचे कारण शिवसेनेला जास्तीच्या जागा सोडल्यास भाजप बॅकफूटवर गेल्याचे चित्र तयार होईल. भाजपचा मुख्यमंत्री करण्याच्या स्थितीत असतानाही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद देताना त्याग केला. आता तुम्ही आम्हाला झुकते माप द्या, असे सर्वशक्तिमान भाजपच्या वतीने अमित शहा यांनी शिंदे यांना काहीशा नरमाईच्या सुरात आवाहन करणे यातच शिवसेनेचे वाढते वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

शिवसेनेला १२० जागा द्या आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी गळ भाजपश्रेष्ठींना घातली जात आहे. दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून हे साध्य होऊ शकेल, याची कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटपाची घोषणा होईपर्यंत मुंबईपेक्षा दिल्लीतील कूटनीतीला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. ल्युटेन्स दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांची पोस्टर लक्ष वेधून घेत आहेत. १२० जागा मिळाल्यास शिवसेना शंभर जागा जिंकेल आणि महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देईल, असा दावा शिंदेंचे निकटस्थ दिल्लीच्या राजकीय वर्तुळात करताना दिसत आहेत. दिल्लीतील उच्चपदस्थ नेतेही सध्या शिंदेंचीच चर्चा करताना दिसत आहे. खरे तर भाजपश्रेष्ठींपुढे निर्माण झालेला हा पेच मविआतील काँग्रेस-उबाठा दरम्यानच्या कुरघोडीपेक्षा अधिक गंभीर आहे. पण महायुतीत कुठलेही मतभेद नसल्याचे भासवून या पेचप्रसंगाला सामोपचाराने हाताळण्याची भूमिका भाजपश्रेष्ठींनी घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या वाट्याच्या जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घेण्याची संयमी भूमिका घेतली आहे.

वाद कायम

पाच वर्षांपूर्वी ज्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि जागावाटपाच्या मुद्यांवरुन भाजप आणि शिवसेनेत निवडणूक होण्याआधी आणि नंतर वाद होता तो त्यांच्यात संबंधविच्छेद होऊनही तसाच कायम राहिला आहे. बदलले आहेत फक्त चेहरे. २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांविरुद्ध मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरुन उभे ठाकले होते. पाच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदासाठी आपली गाठ दोन भलत्याच चेहऱ्यांशी पडेल, याची तेव्हा त्यांनी कल्पनाही केली नसेल. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावेदारीला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांच्याऐवजी नाना पटोले आव्हान देत आहेत.

खरे तर बहुमत मिळाल्यास मविआमधील तिन्ही पक्षांचे मिळून मुख्यमंत्रिपदासाठी पाच ते सहा स्पर्धक असतील. काँग्रेसकडून पटोलेंव्यतिरिक्त बाळासाहेब थोरात, शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील, सुप्रिया सुळे तर तिकडे उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास आदित्य ठाकरेही सज्ज झाले आहेत. त्यामानाने महायुतीमध्ये प्रामुख्याने शिंदे-फडणवीस अशीच स्पर्धा आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे निकाल लागल्यानंतर उद्‍भवणारी राजकीय समीकरणे आणि संख्याबळाच्या आधारावर ठरणार आहे. त्याची सर्वच राजकीय पक्षांना जाणीव आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज आमूलाग्र बदलला आहे. तरीही मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन महायुती आणि महाविकास आघाडीची ‘रिश्ते नये, सोच वही’ ही स्थिती कायमच आहे.

(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्लीतील ब्यूरोचे प्रमुख आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com