Environmental Pollution : प्रदूषणातून उद्‍भवताहेत आरोग्याच्या गंभीर समस्या

Pollution Problems : कॅन्सरचे रुग्ण इतक्या प्रमाणात असण्याचे कारण आहे प्रदूषित पाणी! या प्रदेशातील पाण्याच्या प्रदूषणातील मुख्य घटक आहेत ती शेतीत वापरली जाणारी रसायने.
Pollution
PollutionAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Pollution : भारतात कर्करोगाचे प्रमाण इतक्या वेगाने वाढत आहे, की पंजाबमधील भटिंडा ते राजस्थानातील बिकानेरपर्यंत धावणाऱ्या रेल्वेला ‘कॅन्सर एक्स्प्रेस’ या नावानेच ओळखले जाते. अर्थात, हे नाव काही सरकारने ठेवलेले नाही, तर लोकांनी ठेवलेले आहे.

कारण या ट्रेनमध्ये ७० टक्के प्रवासी हे कॅन्सर (कर्करोगाचे) रुग्ण असतात. कॅन्सरचे रुग्ण इतक्या प्रमाणात असण्याचे कारण आहे प्रदूषित पाणी! या प्रदेशातील पाण्याच्या प्रदूषणातील मुख्य घटक आहेत ती शेतीत वापरली जाणारी रसायने.

जी येतात शेतामध्ये वारेमाप प्रमाणात वापरली जाणारी खते, कीटकनाशके आणि तणनाशकातून! शेतीतील रासायनिक घटकांच्या वापरामुळे केवळ पंजाब, राजस्थानच नव्हे, तर भारतासह सर्व जगभरामध्ये कर्करोगाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. कर्करोग हा काही संसर्गजन्य रोग नाही, मग

इतक्या प्रमाणात रुग्ण का वाढत आहेत? थोडा विचार केला तर त्याचे उत्तर किंवा कारण मिळते, ते म्हणजे आपल्या आहारात वाढत चाललेले विषारी अन्न आणि पाणी.

रसायनांचा यकृतावर परिणाम

यकृत हे अन्य महत्त्वाच्या कार्याबरोबरच चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या अनेक विषारी घटकांसाठी आवश्यक असणारा नत्र वायूचा पुरवठा बंद करण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे ते विष निरुपद्रवी किंवा निर्विष केले जाते.शरीराच्या संरक्षणाची धुरा सांभाळणारे यकृतच जर रसायनांच्या आक्रमणामुळे कमकुवत झाले असल्यास समस्यांमध्ये वाढ होते. यकृताची अन्य महत्त्वाची कामेही बाधित होतात.

Pollution
Pollution Control : प्रदूषण नियंत्रणात जैवप्लॅस्टिक मोलाची भूमिका बजावेल

प्रदूषकांचा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम

मुख्य परिणाम लहान मेंदूच्या भागावर होतो. ठराविक मात्रांमध्ये या रसायनाचा संपर्क आला तर काटा टोचल्यासारखे दुखत राहणे, जळजळणे, चुरचुरणे, खाजणे, शरीराला कंप सुटणे, आकडी येणे अशी लक्षणे दिसायला लागतात. शरीरातील ऊर्जा निर्मिती यंत्रणेवर या रसायनांचा हल्ला होताच ती कमकुवत होत जातात.

शरीराचा जडपणा, प्रचंड थकवा, हातापायांचे दुखणे, चिडचिड, मरगळ, काहीही करू नये असे वाटणे, पायामध्ये पेटके येणे, बौद्धिक कामे करण्यातील अडचणी, पर्यायाने आत्मविश्वासाचा अभाव अशा अनेक समस्यांची यादी कीटकनाशकांच्या अगदी अल्पमात्रांनीही होते.

कीटकनाशकांबद्दलची संवेदनशीलता स्त्रिया व बालके यांच्यात जास्त असते. काही कीटकनाशकांमुळे स्मरणशक्तीचा ऱ्हास, निद्रानाश, स्वप्नांचा अनुभव, डोक्यावर परिणाम होणे इ. मानसिक परिणाम होतात. मानसिक संतुलन बिघडणे, गोंधळलेली मनःस्थिती, स्किझोफ्रेनिया, मॅनिया इथपर्यंत दुष्परिणामांची यादी वाढत जाते.

बहुतांशी कीटकनाशके किंवा रसायनांमध्ये काय असते?

तर शिसे, तांबे, मॅंगेनीज, जस्त यांसारख्या नैसर्गिक खनिजे, तसेच आर्सेनिक आणि काही वनस्पतिजन्य पदार्थ. हे सर्व घटक एका विशिष्ट टप्प्यापर्यंत (काही पीपीएम ते मिलिग्रॅम) वनस्पतींसाठी आणि सजीवांसाठी उपयुक्त असली तरी त्यांचा सततचा वापर मात्र हानिकारक ठरतो.

मग ही रसायने केवळ अपेक्षित कीड मारूनच थांबत नाहीत, तर प्राणिमात्रांच्या शरीरातील पेशींमध्ये शिरतात. पेशींच्या अंतर्भागात पुन्हा कधीही दुरुस्त करता येणार नाहीत, असे बदल घडवतात. शरीराच्या संरक्षणासाठी कार्यरत विविध घटकांना (उदा. एंझाइम्स) नष्ट करतात. जगभरात कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची जी कारणे आहेत, त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे आर्सेनिक. हा अनेक खते व कीटकनाशकांमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

आपण पिकांसाठी व फळबागांसाठी जमिनीत वापरलेली रासायनिक खते कधीही संपूर्णपणे शोषली जात नाहीत. काही प्रमाणात ती जमिनीत शिल्लक राहतात. फवारणी करतेवेळी, उपकरणे धुतेवेळी ही कीटकनाशके जमिनीवर आणि पाण्यात पसरतात. पिकाला देत असलेले पाणी किंवा पावसाचे पाणी यासोबत ती खोल भूजलात जातात किंवा वाहून ओढ्या नाल्याद्वारे नदीत येतात. हे पाणी आपण पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरतो. म्हणजे ती रसायनेही थेट आपल्या पोटात पोहोचतात.

फवारणीमधून किंवा पाण्यासोबत पिकांमध्ये शिरतात. ती झाडांची मुळे, खोडे, पाने, फुले किंवा फळे यात ही गोळा होतात. थोड्या थोड्या प्रमाणात विविध अवयवांत साठत जाण्याच्या या प्रक्रियेला ‘बायोॲक्युमिलेशन’ असे म्हणतात. झाडाचे हे अवयव म्हणजे माणसांसह सर्व सजीवांचे अन्न आहे.

अशा प्रकारे अन्नसाखळीतून अगदी पाण्यातील एकपेशीय जिवापासून मोठ्या मोठ्या प्राण्यांच्या शरीरापर्यंत त्यांचा प्रवास होत राहतो. उदा. पाण्यातील एकपेशीय प्राणी, त्यावर जगणारे छोटे मासे, कालवे, त्यांच्यावर जगणारे मोठे जलचर किंवा पक्षी अशा अन्नसाखळीमध्ये त्यांचा शिरकाव होतो. जमिनीवर झाडांच्या अवयवातून इतर सजीवाच्या शरीरात शिरतात.

अगदी शाकाहारी किंवा मांसाहारी दोन्ही प्रकारच्या माणसांच्या आहारातून ही विषारी रसायने शरीरात पोचत असतात. पचन संस्थेमार्फत ती शोषली जातात. वेगवेगळ्या ग्रंथी, यकृत, मूत्रपिंडे, शरीरातील चरबी यामध्ये त्यांचा साठा वाढत जातो. त्यातही गंभीर बाब म्हणजे आपल्या चरबीत विरघळलेल्या या विषारी घटकांचे प्रमाण शरीरातील चयापचय क्रियेमुळे वाढत जाते.

Pollution
Water Pollution : थोड्या बदलातून होऊ शकतात प्रवाह प्रदूषणमुक्त

यालाच ‘बायोमॅग्निफिकेशन’ असे म्हणतात. आपल्या चरबीत प्रत्यक्षात शोषलेल्या प्रदूषकाच्या प्रमाणापेक्षा साठलेले प्रमाण दहा ते पंधरा पटीने अधिक असू शकते. म्हणून या विषाचे शरीरातून संपूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी वर्षानुवर्षे लागू शकतात. मात्र दुर्दैवाने कर्करोगाच्या बहुतांश केसेसमध्ये शरीरातील महत्त्वाचे अवयव लवकर निकामी होत जातात. त्यामुळे उपचारावर मर्यादा येतात. काही कीटकनाशकांचे परिणाम इतके दाहक असतात की या रुग्णांना तपासतानाही डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते.

वंश वाढीलाच ब्रेक

कुठल्याही सजीवाच्या वंशवाढीचा सर्वांत मूलभूत टप्पा असतो पेशी विभाजन. कोणत्याही जिवाची सुरुवात ही दोन पेशींचे मिलन, त्यांचे एकमेकांत सामावून जाणे व नंतर पेशी विभाजन अशा क्रमाने होते. पण सर्वांत भयानक बाब म्हणजे या पेशी विभाजनावरच विषारी रसायनांचा परिणाम होतो. त्यामुळे सजीवात आनुवंशिक बदल, पेशी विभाजनाला ब्रेक, गुणसूत्र नाश पावणे आणि जनुकांमध्ये परिवर्तन इ. बाबी घडताना दिसतात. थोडक्यात, कृत्रिम रसायनांचा अतिरेक हा मानवी संस्कृतीला सगळ्यात मोठा धोका ठरत आहे.

तणनाशकांचा परिणाम

तणनाशक ही वनस्पती नाशकच आहेत. तणनाशकांमुळे जमिनीत, पिकात, नदीत पारा, विषारी क्षार आणि क्लोरोनेटसारखी रसायने मिसळली जातात. हेही कीटकनाशकांप्रमाणेच सजीवांच्या अनेक उतींवर (पेशींच्या समूहावर) वाईट परिणाम करतात. आर्सेनिक गटातील रसायने मातीला ही कायमस्वरूपी विषारी करून टाकतात. रासायनिक तणनाशकांचे वापराने वनस्पतींच्या रचनेत दूरगामी सूक्ष्म बदल होतात.

रसायनामुळे श्रीलंकेत वाढले होते आजारांचे प्रमाण

कदाचित पहिल्यांदाच हे दुष्परिणाम वाचणाऱ्या लोकांना अतिशयोक्तीच मांडत असल्याचा भास होईल. पण श्रीलंका देशामध्ये त्याची अधिकृत आकडेवारी सरकारी पातळीवरून जाहीर करण्यात आली. उत्तर- मध्य श्रीलंका हा भाग भाताचे आगार आहे. मात्र १९९० पासून तेथील शेतकऱ्यांत गंभीर स्वरूपाचे किडनीचे आजार आढळून येऊ लागले.

या छोट्या देशात हजारो लोक किडनी विकाराने मृत्यू पावले. या गंभीर आजाराने ग्रस्त लोकांमध्ये ४० ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांचे प्रमाण जास्त होते. गरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गंभीर आजार आणि मृत्यूमुळे सरकार एकदम खडबडून जागे झाले. २००९ मध्ये श्रीलंका सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी अभ्यास सुरू केला. पहिल्या टप्प्यात जमीन, पाणी, रुग्णांचे रक्त- लघवीचे नमुने तपासले गेले.

पण त्याचे निष्कर्ष सुरुवातीला सरकारने घोषित करण्याचे टाळले. मात्र नंतर लोकांचा दबाव वाढल्यावर निष्कर्ष घोषित करावेच लागले. लोकांच्या अन्नातील कॅडमियम आणि आर्सेनिक या विषारी रसायनामुळेच आरोग्याच्या या समस्या उद्‍भवत असल्याचे समोर आले. पण ही विषारी रसायने अन्नात कोठून येतात, याचा काहीही निश्‍चित पुरावा नव्हता. २०१३ मध्ये बिगर सरकारी स्वतंत्र संस्थेने केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष निघाला, की रासायनिक खते आणि कीटकनाशकात आर्सेनिक व कॅडमियम सापडते.

२०१५ मध्ये श्रीलंकेतील संशोधक जयसुमाला यांच्या संशोधनाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. या अभ्यासात रासायनिक खतांचे २२६ आणि कीटकनाशकांचे २७३ नमुने विद्यापीठांच्या दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासले गेले. त्या सगळ्याच नमुन्यांमध्ये आर्सेनिकचे अंश सापडले. ट्रिपल सुपर फॉस्फेट या खतात त्याचे प्रमाण सर्वांत जास्त सापडले. प्रत्यक्ष आकडेवारीच समोर आल्यानंतर लोकांचा दबाव आणखी वाढला. मग मात्र श्रीलंका सरकार, जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि खते व कीटकनाशके बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ही विषारी रसायनाबाबत कबुली दिली.

आजार आणि मृत्यू वाढत असल्यामुळे जागरूक नागरिकांकडून सरकारवरील दबाव वाढतच चालला होता. यावर तिथल्या एका निदर्शकाची प्रतिक्रिया ही खूप बोलकी होती, ‘‘श्रीलंका रासायनिक खतामुळे श्रीमंत झाली नव्हती, त्यामुळे त्यांचा वापर थांबविल्याने ती गरीबही होणार नाही.’’ काही प्रमाणात हे खरेही होते. श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने पर्यटनावर आधारित होती.

त्यातच बहुतांश सर्व रसायने, खते ही आयात केली जात असल्याने परकीय चलनांचीही समस्या भेडसावत होती. त्यांची आयात संपूर्ण थांबवून संपूर्ण सेंद्रिय शेतीचा निर्णय तडकाफडकी घेतला गेला. अर्थात, इतके मूलगामी निर्णय हे पूर्ण विचारांती घ्यायचे असतात. ते अमलात आणण्यासाठी योग्य तो कालावधी द्यायचा असतो. त्याऐवजी सरकारी घिसाडघाई केली गेली. त्यातच ‘कोविड -१९’मुळे पर्यटन धोक्यात आले. यामुळे चांगला निर्णय असूनही पुढे श्रीलंकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com