Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Agriculture Safety Tips: शेतीकाम करताना शेतकऱ्यांना अनेकदा साप, उंदीर, विंचू, गोम यांसारख्या जीवांचा सामना करावा लागतो. पाणी देणे, खुरपणी, वसतिस्थान अशा वेळी या प्राण्यांचा अचानक हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा धोक्यांपासून बचावासाठी योग्य प्रकारचे सुरक्षा उपाय वापरणे गरजेचे आहे.
Scorpion
ScorpionAgrowon
Published on
Updated on

डॉ. अंगद गरडे, डॉ. शिवाजी शिंदे

Wildlife Risks Farmers Advice: शेतीत सतत विविध कामांसाठी शेतकऱ्यांना राहावे लागते. शेतामध्ये काम करताना किंवा वसतीला राहताना त्यांचा सामना विविध प्राण्यांशी होत असतो. त्यात रानटी किंवा वन्यजीवांसोबतच नियमित दिसणारे उंदीर, साप, विंचू, गोम यांचा समावेश असतो. पाणी देतेवेळी त्यांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने ते अचानक बाहेर येऊन हल्ला करण्याची भीती असते.

काही वेळा पिकाच्या सावलीला शीतलतेसाठी किंवा उष्णतेसाठी बसलेले असतात. खुरपणीवेळी ते चावा घेऊ शकतात. त्यामुळे पिकामध्ये विविध कामे करताना विविध प्रकारची काळजी घेणे आवश्यक असते. उदा. हातांमध्ये जाड प्लॅस्टिकचे होतमोजे वापरणे, पायांमध्ये लांबट आकाराचे बूट (गमबूट) वापरणे इ.

खुरपणी करताना घ्यावयाची काळजी

शक्यतो पारंपरिक पद्धतीने खुरपणी करताना ओणवे बसून काम केले जाते. त्या वेळी कमरेवर ताण येणार नाही, अशा पद्धतीने बसावे. पाय योग्य स्थितीत असल्यास रक्त प्रवाह सुरळीत राहील. गवत जास्त उंच असल्यास काठीने गवतावर मारावे किंवा माती फेकावी. त्यामुळे प्राणी किंवा सजीव यांची उपस्थिती समजते. ते माणसांच्या चाहुलीने दूर जातील.

कामांसाठी असलेली अवजारांना योग्य धार असावी. अवजारे वेळोवेळी स्वच्छ करावीत. खुरपणी करताना थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घ्यावी. खुरपणी झाल्यावर हात- पायांना गरम पाणी आणि मिठाच्या पाण्याने शेकल्यास स्नायूंना आराम मिळतो. पिकाच्या दोन ओळींमध्ये सुरक्षित अंतर असल्यास अशी कामे करणाऱ्या व्यक्तींना चालताना किंवा वाकताना अडचण येत नाही. खुरपणी करताना हलके किंवा सैल कपडे घालावे. लांब बाह्यांचा जाड कापडाचा जुना शर्टही चालू शकतो. नसेल तर अॅप्रन वापरावा. पावसाळ्यात रेनकोट घालावा. दर काही काळानंतर शरीराला ऊर्जा आणि स्निग्धता देण्यासाठी पाणी पित राहावे.

Scorpion
Indian Agriculture: ग्राहकांच्या आवडीनुसार ठरवा पीकपद्धती

फवारणीवेळी घ्यावयाची काळजी

फवारणी करताना हातमोजे, मास्क, चष्मा, गमबूट आणि संरक्षणात्मक कपड्यांचा वापर करावा. कीटकनाशक किंवा तणनाशक वापरण्यापूर्वी त्याच्या लेबलवरील सूचना आणि इशारे व्यवस्थित वाचावेत. त्यानुसार कृती करा. शिफारस केलेली मात्रा व प्रमाण फवारणीसाठी वापरावे. जोरदार वारा किंवा पाऊस असताना फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचे असल्यास हवेच्या विरुद्ध फवारणी करू नये. उंच वाढलेल्या पिकामध्ये उदा. सोयाबीनमध्ये फवारणी करतेवेळी एक व्यक्ती लांब काठीने पुढील पीक हलवत जाईल किंवा माती फेकत जाईल, असे पाहावे. तणनाशक व कीटकनाशक फवारणीसाठी शक्यतो वेगळे पंप असावे.

शक्य नसल्यास त्यांची स्वच्छता चांगल्या प्रकारे केली पाहिजे. तणनाशक फवारणीवेळी हुडचा वापर करावा. द्रावण बनवताना हाताने ढवळू नये. त्यासाठी लाकडी काठीचा वापर करावा. कीड-रोगाचा प्रादुर्भाव तपासून आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर असल्यास फवारणीचा निर्णय घ्यावा. त्यापेक्षा कमी प्रादुर्भाव असल्यास निंबोळी अर्क किंवा वनस्पतिजन्य कीडनाशकांचा प्राधान्य द्यावे. रासायनिक कीडनाशक निवडतानाही त्याच्या विषारीपणाच्या ग्रेड (हिरवा ते लाल) पाहून कमी विषारीपासून सुरुवात करावी. कीटकनाशकांचे डबे खोलताना ते चेहऱ्यापासून दूर असावे. फवारणी करतेवेळी काही खाणे, पिणे किंवा चेहऱ्याला हात लावणे टाळावे. उदा. जेवण, धूम्रपान, तंबाखू इ. बाबी टाळाव्यात. फवारणीनंतर साबणाने हात दोन वेळा स्वच्छ धुवावेत. त्यानंतर अन्य कामांना प्रारंभ करावा.

कीडनाशकांच्या फवारणीमुळे त्वचेवर चट्टे, पुरळ इ. बाबी दिसत असल्यास असा भाग प्रथम साबणाने स्वच्छ करा. त्वचा जास्त चोळू किंवा खाजवू नये. प्रभावित भागाला थंड किंवा गरम पाण्याने शेक देऊ नका. अँटिफंगल क्रीम किंवा औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. अशा वेळी तुमचे टॉवेल, कपडे व इतर साहित्य इतरांसोबत वापरू नये. संसर्ग वाढू नये यासाठी जंतुनाशकाच्या द्रावणाने तो भाग पुसून घ्यावा.

वापरलेले कपडेही निर्जंतुकाच्या द्रावणे धुवून घ्यावेत. विषबाधेची कोणतीही लक्षणे दिसल्यास ज्या रसायनाची फवारणी करत आहोत, त्याचे लेबल घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांना दाखवावे. त्याच्या विषबाधेसाठी करावयाचा उपाययोजनांची त्यात माहिती असते. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनाही उपाययोजना त्वरित करता येतात. अशा व्यक्ती प्रथम सावलीत न्यावे. त्याला भरपूर पाणी पिण्यास द्यावे. अस्वस्थता कमी झाल्यास विश्रांती घेऊ द्यावी.

विषारी प्राण्यांपासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी

शेतकऱ्यांनी साप, विंचू, गोम व उंदीर यांसारख्या प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी व चावू नयेत म्हणून पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी.

कामावेळी लांब पॅन्ट, उंच गम बूट आणि हातमोजे घालावेत.

खड्डे, ढिगारे किंवा उंच गवतामध्ये जाणे टाळावे किंवा काळजी घेऊन जावे.

साप किंवा अशा प्राण्यांना दालचिनी, लवंग व अन्य मसाल्याचे पदार्थ किंवा व्हिनेगर यासारखे उग्र वास आवडत नाहीत.

कोणताही प्राणी दिसल्यास शक्यतो त्यापासून दूर व्हावे. त्रास देऊ नये.

Scorpion
Agriculture Advice : एकरी उत्पादकता वाढीवर लक्ष द्या

साप चावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

साप चावल्यास घाबरून जाऊ नका व शांत राहा. आपल्याकडे आढळणारे मोजके पाच ते सहा जातीचे साप विषारी आहेत. ते वगळता अन्य बिनविषारी सापांपासून फारसा धोका नसतो. त्यामुळे फार धावपळ किंवा पळापळ टाळावी. त्यामुळे रक्तप्रवाह वगाने वाहून विष पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्य असल्यास चालणे टाळून स्थिर राहावे. तुमच्याकडे प्रेशर इमोबिलायझेशन पट्टी असेल तर ती किंवा एखादे कापड चावलेल्या भागाच्या वरील बाजूस बांधावे. ही पट्टी खूप घट्ट बांधू नये. शक्य असल्यास चावलेला भाग हृदयापेक्षा अधिक उंचावर ठेवावे. विष शरीरात लवकर पसरणार नाही.

आरोग्य केंद्रांमध्ये जाण्यासाठी योग्य अवधी मिळू शकेल. त्वरित मोफत रुग्णवाहिकेसाठीच्या संपर्क क्रमांकावर (१०८ किंवा १०२) संपर्क करावा. आपल्याकडे गाडीची सुविधा असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जावे. साप ओळखण्याचा प्रयत्न करा (उदा. विषारी की बिनविषारी). यामुळे डॉक्टरांना लवकरात लवकर उपचार करण्यास मदत होईल. सर्पदंशासंदर्भातील लस एक तासाच्या आत घ्यावी. साप चावल्यावर काहीही लावू नका (लेप, औषध, गार किंवा गरम). पारंपरिक गोष्टी करू नका. चावलेल्या भागावर स्वतःहून काप घेणे किंवा अन्य इलाज करत बसू नका. जोपर्यंत डॉक्टर परवानगी देत नाहीत, तोपर्यंत काही खाऊ अथवा पाणी पिऊ नका.

विंचू व गोम यांच्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी

घरामध्ये किंवा शेतामध्ये स्वच्छता ठेवा. खुरपणी झाल्या झाल्या पालापाचोळा किंवा गवताचे ढिगारे गोळा करून खड्ड्यामध्ये किंवा बांधावर टाकावेत. त्यात विंचू किंवा गोम लपण्याची शक्यता असते. रात्री काम करण्याची वेळ आल्यास योग्य प्रकाश असेल, याची खात्री करावी. कारण विंचू व गोम अंधारात जास्त सक्रिय असतात. त्यांचे वास्तव्य असण्याच्या जागा उदा. दगडांच्या भेगा, लाकडी ढिगारे इ. भागात हात घालताना किंवा काम करताना काळजीपूर्वक करावे.

विंचू चावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

विंचू चावल्यानंतर चावलेला भाग साबण लावून स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. त्यानंतर त्या भागावर थंड बर्फ लावा. यामुळे वेदना व सूज कमी होते. चावलेला भाग उंच ठेवावा. विंचवाचे काही प्रकार विषारी व अधिक धोकादायक ठरू शकतात. त्यांचे प्रकार जाणून घ्यावेत. उदा. भारतीय लाल विंचू.

काय करू नये?

चावलेल्या भागावर काहीही चोळू नका किंवा दाबू नका. जास्त प्रमाणात पाणी किंवा इतर द्रवरूप पदार्थाचे सेवन करू नका. विष काढण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःहून कोणतेही उपचार करत बसण्यापेक्षा आधी दवाखान्यात जावे.

लक्षणे

चावलेल्या जागी तीव्र वेदना होतात, सूज येते, लालसरपणा दिसतो, मुंग्या येतात.

काही वेळा जास्त घाम येतो. उलटी होऊ शकते.

श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.

अशक्तपणा जाणवतो.

गोम चावल्यास घ्यावयाची काळजी

चावलेला भाग साबणाने व स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते. बर्फ थेट त्वचेवर न ठेवता कापडात गुंडाळून चावलेल्या भागावर लावावा. यामुळे सूज व वेदना कमी होतात. कापडात गुंडाळलेल्या बर्फाचा पॅक दहा, दहा मिनिटाने बदला. वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळी घेऊ शकतात. ॲलर्जी किंवा संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.

उंदराचा वावर कमी करण्यासाठी...

शेतीतील पिके व घराचा परिसर स्वच्छ ठेवा. उंदीर जास्त गवत असलेल्या ठिकाणी घरे करतात. सतत अन्नाच्या शोधात असलेले उंदीर धान्य साठवणीच्या आसपास किंवा आहाराच्या आसपास येतात. उंदरांना पळून लावण्यासाठी लसणासारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. शेतघरामध्ये एक किंवा दोन मांजरे पाळलेली असल्यास उंदराचा वावर आपोआप कमी होतो.

उंदीर चावल्यास काय करावे?

जखम जंतुनाशक किंवा पू नाशक (अँटीबॅक्टेरियल किंवा अँटी सेप्टिक) द्रावणाने स्वच्छ करून घ्यावी. स्वच्छ कापडाने पुसून जखम कोरडी करावी. जखमेवर निओस्पोरिनसारखे अँटिबायोटिक मलम लावावे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

लक्षणे व उपचार : चावलेल्या ठिकाणी लालसरपणा दिसतो, सूज येते किंवा उंदीर चावल्यावर ताप येऊ शकतो. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला व उपचार घ्यावेत.

वन्य किंवा रानटी प्राण्यांपासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी

जंगल किंवा वने जवळ असल्यास रानडुक्कर, माकडे, नीलगाय, मादी बिबटे, ससे, हरणे इ. शेतातील पिकांचे नुकसान करता. शेताभोवती काटेरी झाडांचे कुंपण करावे किंवा काटेरी तार, जाळीची कुंपण करून घ्यावे. अलार्म / लाइट्स / मोशन सेंसर्स बसवणे

फायदेशीर ठरते. स्थानिक वनविभागाशी संपर्क ठेवून वेळोवेळी माहिती देणे. यामुळे तत्काळ  मदत  पोहोचविण्यासाठी मदत होईल.

काही भागात सिंथेटिक वाघ / सिंहाच्या आवाजांचे स्पीकर देखील वापरावे. वन्यप्राण्यांचा वावर अधिक असल्यास एकटेदुकटे फिरणे किंवा गस्त टाळावी. गटाने देखरेख केल्यास प्राणी शक्यतो हल्ला करत नाहीत.

डॉ. अंगद गरडे, ८४०८८३८४५०

- डॉ. गरडे हे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे सहायक प्राध्यापक आहेत, तर डॉ. शिवाजी शिंदे हे उद्यानविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्राध्यापक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com