Pune News : राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचा नवा संचालक नेमण्यावरून युती सरकारमध्ये घमासान सुरू आहे. या पदासाठी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री कार्यालयाकडून वेगवेगळ्या नावांची शिफारस झाल्याने पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे
‘गुणनियंत्रण’च्या संचालकपदावरून विकास पाटील सोमवारी (ता.३०) निवृत्त झाले. मात्र नव्या नियुक्तीबाबत महायुतीत बेबनाव असल्यामुळे नव्या संचालकाच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे मंगळवारी संचालकाविना गुणनियंत्रण विभाग चालू होता. ५० हजार कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या निविष्ठा उद्योगावर नियंत्रण ठेवणारा हा विभाग आहे. संचालकपद मिळवण्यासाठी कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. या अधिकाऱ्यांनी युतीमधील आपापले ‘गॉडफादर’ मैदानात उतरविल्यामुळे रंगत वाढली आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या पदासाठी रफिक नाईकवाडी इच्छुक होते. त्यांचे तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी निकटचे संबंध होते. परंतु नव्या बदलात सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे भुसे यांच्याकडे केवळ फलोत्पादन खात्याचे मंत्रिपद आहे. त्यामुळे या स्पर्धेत ते थेट हस्तक्षेप करू शकत नसल्यामुळे श्री. नाईकवाडी या स्पर्धेतून दूर झाले. ‘‘गुणनियंत्रण विभाग हाताळण्याचे कसब विनयकुमार आवटे, उदय देशमुख, सुभाष काटकर, किसन मुळे यांच्याकडे आहे. परंतु ते मंत्रालयातील मर्जीच्या वर्तुळात नसल्यामुळे ते स्पर्धेच्या बाहेर आहेत,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.
कृषिमंत्र्यांच्या वर्तुळात आता सुनील बोरकर यांचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालकपद हाताळणारे श्री. बोरकर हेच गुणनियंत्रण संचालक होतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु मधल्या काळात डॉ. मोते यांनी पुन्हा उचल घेत या पदासाठी जोरदार व्यूहरचना केली. कृषी आयुक्तालयात संचालकपदावर नियुक्ती होण्यासाठी अत्यावश्यक असलेली पात्रता व अनुभव सध्या केवळ माझ्याकडे असल्याचे डॉ. मोते यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले जात आहे.
डॉ. मोते हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा वर्ग १ मधील १९९१ मधील; तर श्री. बोरकर हे १९९३ च्या तुकडीचे आहेत. गुणनियंत्रण विभागात २०१९ ते २२ या कालावधीत मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून आपण उत्तम काम केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांच्या कार्यालयाचा कौल श्री. बोरकर यांच्या बाजूने आहे. मात्र, या स्पर्धेत आता तिसरे नाव आल्याने गुणनियंत्रण संचालकाची नियुक्ती लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्पर्धेवर ठेवला मुख्यमंत्र्यांनी ‘अंकुश’
ठाण्याचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी गुणनियंत्रण संचालकाची पदाची जबाबदारी आपण इतरांपेक्षा उत्तम सांभाळू शकतो, असा विश्वास सरकार दरबारी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने श्री. माने यांच्या निवडीची शिफारस करीत या स्पर्धेवर ‘अंकुश’ ठेवल्याचे चर्चिले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.