Results of Court Case : गुणनियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई

Agriculture Department : निकाल विरोधात जाण्यास गुणनियंत्रण निरीक्षकांच्या चुका कारणीभूत आहेत. यापुढे निरीक्षकांवरच कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी आयुक्तालयाने दिला आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Pune News : अप्रमाणित बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होत असताना दुसऱ्या बाजूला न्यायालयातील खटल्यांचे निकाल शासनाच्या विरोधात लागण्याचे प्रमाण वाढले आहे. निकाल विरोधात जाण्यास गुणनियंत्रण निरीक्षकांच्या चुका कारणीभूत आहेत. यापुढे निरीक्षकांवरच कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

एका वरिष्ठ कृषी सहसंचालकाने सांगितले की, खते आणि बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांमध्ये कायम भीती असते. अप्रमाणित खते, बियाण्यांचा पुरवठा होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कडक कायदे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्नदेखील निविष्ठा लॉबीने हाणून पाडला आहे. त्यामुळे आता उपलब्ध कायद्यांच्या आधारे शेतकऱ्यांना निविष्ठांबाबत सुरक्षितता मिळवून देणे हाच पर्याय कृषी विभागाच्या हाती आहे.

Agriculture Department
Agriculture Products Export : दुबईला थेट करा शेतीमाल निर्यात

‘‘सध्याच्या कायद्यांमध्येही शिक्षेच्या तरतुदी आहेत. परंतु, गुणनियंत्रण निरीक्षक फारसे गांभिर्याने कामे करीत नाहीत. विशेषतः बियाणे तपासणीत गंभीर त्रुटी निरीक्षकांकडूनच ठेवल्या जातात. परिणामी, प्रत्यक्ष न्यायालयीन लढाईत कच्चे पुरावे समोर ठेवले जात असल्याने अप्रमाणित बियाण्यांबाबत भरलेले खटले सरकारच्या बाजूने लागत नाहीत. मुळात बियाणे नमुने घेताना निरीक्षक व्यवस्थित पंचनामादेखील करीत नाहीत. न्यायालयात दावे सादर करताना सोबत पुराव्यांची कागदपत्रे पुरेशी जोडली जात नाहीत. न्यायालयीन साक्ष, सुनावण्यांना बियाणे विश्लेषक चक्क दांड्या मारतात. त्यात भर म्हणजे सरकारी पक्षाच्या वतीने गुणनियंत्रण निरीक्षक आणि त्यांचे वकीलदेखील अनेकदा न्यायालयात गैरहजर राहतात,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Agriculture Department
Agriculture Seeds and Input Scarcity : बियाणे, खते, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई

कामात सुधारणा करण्याची ताकीद

कृषी आयुक्तालयाने गुणनियंत्रण निरीक्षकांच्या कामकाज पध्दतीचा व न्यायालयीन खटल्यांच्या अभ्यास केला आहे. त्यातून निरीक्षकांना कामात सुधारणा करण्याबाबत ताकीद देण्यात आली आहे. बियाणे तपासणीच्या वेळी नमुने घेतल्यानंतर काळजीपूर्वक मोहोरबंद करावा, विश्लेषणासाठी पाठविल्या जाणाऱ्या बियाणे नमुन्यांच्या पार्सलवरील चिठ्ठीवर नियमाप्रमाणे नोंदी कराव्यात, बियाणे नमुना स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीला नमुना सहामध्ये नोटीस द्यावी, नमुने घेताना ज्ञापनावर किमान दोन व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या घेतल्याच पाहिजे, अशा सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत.

निरीक्षक असा करतात सावळागोंधळ

- बियाणे नमुना काढतात; पण तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवतच नाहीत
- बियाण्यांचा वैधता कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी न्यायालयात दावा दाखल केला जात नाही
- बियाणे विश्लेषक साक्षीकरिता न्यायालयात जात नाहीत
- बियाणे निरीक्षकांकडून आरोपींना समन्स जाण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत
- बियाणे नमुने डाक नोंदणीने पाठविण्याच्या नियमांचा वारंवार भंग केला जातो
- कायद्यांमधील तरतुदींचा अभ्यास न करता, नियमांबाबत गाफिल राहून कारवाई करणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com