
शेतकरी ः मोहन लाड
गाव ः मानवत, ता. मानवत, जि. परभणी
एकूण क्षेत्र ः ३९ एकर
तुती लागवड ः २ एकर
परभणी जिल्ह्यातील मानवत (ता. मानवत) येथील मोहन केशवराव लाड हे बंधू गुलाब लाड यांच्या मदतीने मागील सहा वर्षांपासून अखंडितपणे रेशीम शेती करत आहेत. तुती बागेला केवळ शेणखताचा वापर करण्यास लाड बंधू प्राधान्य देतात.
त्यामुळे रेशीम कीटकांना सकस दर्जेदार तुती पाने बागेतून उपलब्ध होण्यास मदत होते. त्याचा दर्जेदार कोष निर्मितीस फायदा होतो. तयार ए ग्रेडच्या कोषाला बाजारात तुलनेने अधिक दर मिळत असल्याचे मोहन लाड सांगतात.
मानवत शहरालगतच लाड यांची शेती आहे. शेतामध्ये कापूस, तूर, गहू या पिकांसोबत संत्र्याच्या ८०० झाडांची बाग आहे. शिवाय बैल, गाई, म्हशी मिळून गोठ्यातील पशुधनाची संख्या १५ एवढी आहे. सध्या मोहन आणि धाकटे गुलाब हे पारंपारिक शेती सोबत कृषिपूरक व्यवसाय म्हणून रेशीमशेती, दुग्ध व्यवसाय करतात.
बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील रेशीम उत्पादक शेतकरी राधेश्याम खुडे यांच्या मार्गदर्शनातून मोहन लाड हे रेशीम शेतीकडे वळले. सुरवातीला २०१८ मध्ये सव्वा एकर क्षेत्रावर तुती लागवड करत ५० अंडीपुंजाची बॅच घेतली.
हा रेशीम कोष उत्पादनाचा पहिलाच प्रयोग होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लाड यांनी रेशीम शेतीचा विस्तार केला. सध्या त्यांच्याकडे २५ फूट बाय ५० फूट आकाराचे दोन रेशीम कीटक संगोपनगृह आहेत. यावर्षी त्यांनी ३० गुंठ्यावर सुधारित पद्धतीने तुतीची लागवड केली आहे.
बॅच नियोजन
वर्षभरात रेशीम कोष उत्पादनाच्या ५ ते ६ बॅच घेतल्या जातात. दरवर्षी जून महिन्यापासून रेशीम कोष उत्पादनाचा हंगाम सुरू होतो. दोन बॅच मध्ये एक महिन्याचे अंतर असते.
जून ते डिसेंबर या कालावधीत ४ बॅच, तर जानेवारी ते मार्च या कालावधीत २ बॅच घेतल्या जातात. प्रत्येक बॅच २०० अंडीपुंजाची असते. त्यापासून सरासरी १९० ते २०० किलो कोष उत्पादन मिळते.
सुरवातीची काही वर्षे उत्पादित कोषाची सुरुवातीचे काही दिवस कर्नाटकातील रामनगरम येथील मार्केटमध्ये विक्री केली. सध्या बीड आणि जालना येथील रेशीम कोष मार्केटमध्ये कोष विक्री करतात.
व्यवस्थापनातील बाबी
काटेकोर व्यवस्थापन करून दर्जेदार रेशीम कोष उत्पादन श्री. लाड घेतात. ऋतुनिहाय व्यवस्थापन तंत्रामध्ये बदल करण्यास प्राधान्य दिले जाते.
थंडी, उन्ह, वारे यापासून संरक्षणासाठी निवाऱ्याभोवती तागाचे कापड लावले आहेत. त्यामुळे रेशीम कीटक संगोपनासाठी आवश्यक तापमान राखणे शक्य होते.
उन्हाळ्यात शेडभोवती ग्रीन नेट लावली जाते. संगोपनगृहावरील टीन पत्र्याच्या छतावर चारही बाजूंनी पाण्याच्या १६ एमएम लॅटरल लावलेल्या आहेत. त्यामुळे छतावर दिवसभर पाणी पडत राहते. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान योग्य राखले जाते.
रेशीम किटकांवरील उझी माशीच्या नियंत्रणासाठी दुहेरी मच्छरदाणीचा वापर केला जातो. ़
संगोपनगृहात स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आजवर रेशीम कोष उत्पादनाची एकदेखील बॅच अयशस्वी झालेली नाही. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार रेशीम कोष उत्पादन मिळते.
तुती लागवडीत शेणखताच्या वापरावर भर दिला जातो. रासायनिक खतांचा वापर टाळला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते, असे मोहन लाड यांनी सांगतात.
मागील कामकाज
डिसेंबर महिन्यात १०० अंडीपुजांची बॅच घेतली होती. या बॅचमधील कोष काढणी ४ जानेवारीच्या दरम्यान पूर्ण झाली. त्यापासून साधारणपणे ९७ किलो कोष उत्पादन मिळाले. उत्पादित कोषाची बीड येथील मार्केटमध्ये विक्री केली. त्यास प्रतिकिलो ५२० रुपये इतका दर मिळाला.
बॅच संपल्यानंतर रेशीम कीटक संगोपनगृहाची स्वच्छता केली. नवीन बॅच घेण्यासाठी जुन्या तुती बागेची छाटणी केली. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखताची मात्रा दिली. तुती बागेस प्रवाही पद्धतीने पाणी दिले.
आगामी नियोजन
नवीन बॅच १ मार्चपासून घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २०० बाल्यकीटक (चॉकी) आगाऊ मागणी नोंदविली केली आहे. त्यापासून २०० किलो रेशीम कोष उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या बॅचमधील रेशीम कीटकांना तुती पाला उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल.
संगोपनृहात योग्य तापमान राखण्यावर भर दिला जाईल. ही बॅच संपल्यानंतर एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विश्रांती दिली जाईल. त्यानंतर जून महिन्यात नवीन बॅच घेतली जाईल, असे मोहन लाड यांनी सांगितले.
तुती बाग व्यवस्थापन
२०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सव्वा एकरवर तुती लागवड करण्याचे ठरविले. त्यासाठी बारामती येथून तुतीच्या व्ही १ वाणाची रोपे विकत आणली. या रोपांची ५ बाय २ फूट अंतरावर लागवड केली. पूर्वमशागतीवेळी जमिनीत घरच्या गोठ्यातील शेणखताची वापर केला. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होत असल्याचे श्री. लाड सांगतात.
तुती बागेला प्रवाही पद्धतीने सिंचन करण्यात आले. त्यानंतर २०२४ मध्ये ३० गुंठे क्षेत्रावर सुधारित पद्धतीने तुती लागवड केली. लागवडीसाठी परतूर येथून १८०० रोपे विकत आणली. लागवड ३ फूट बाय ६ फूट अंतरावर केली आहे.
तुतीच्या खोडांना फुटलेले फुटवे काढून ट्री पद्धतीने वाढ करत आहेत. या पद्धतीने तुती लागवड केल्यामुळे दाटी कमी होतो. एका बुंध्यावर जमिनीपासून दोन फूट अंतरावर १० ते १५ फांद्या ठेवण्यात आल्या. त्यातून हिरव्या पानांचे दर्जेदार उत्पादन मिळत गेले.
- मोहन लाड ९०११७२१७२१
(शब्दांकन ः माणिक रासवे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.