
Agriculture Success Story : अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील सालोडा खुर्द हे मूळ गाव असलेल्या पंडित चव्हाण यांना लहानपणीच आई-वडिलांचे छत्र गमवावे लागण्याची दुर्दैवी वेळ आली. मग याच जिल्ह्यातील मांजरी मसला (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील आत्याने त्यांना आपल्या गावी आणून त्यांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली.
आत्याची आर्थिक परिस्थितीही फारशी बरी नव्हती. त्यामुळे पंडितरावांनी वाहन वयातच परिस्थितीची जाण ठेवत एका मोठ्या कुटुंबाकडे शेतमजुरी सुरू केली. ८० रुपये महिना व पोट भरण्यापुरती ज्वारी असा मेहनताना त्यांना मिळायचा.
खडतर संघर्ष
हाताला काम मिळाले असले तरी निवारा नव्हता. मग गावातील एका कुटुंबाकडील मिळालेली रिकामी, पडीक जागा साफ करून तिथे तुराट्यांपासून झोपडी बांधत पंडितरावांनी राहण्यास सुरुवात केली. भरपूर कष्ट केले. मालकाचा विश्वास संपादित केला. गाठीशी असलेल्या पैशांमधून टप्प्याटप्प्याने तेथेच पक्का निवारा तयार करण्याची सोय झाली. आता शेतीही खरेदी करू असा विचार पंडितराव करू लागले.
त्यानुसार त्यांनी पाच एकर शेती खरेदीही केली. अर्थात, संबंधित मालकाने त्यासाठी आर्थिक मदत केली. शेतीचे पैसे फिटेपर्यंत त्या शेतीतून एक बैलगाडी कापूस दरवर्षी देण्याचा करार झाला. सहा वर्षे अशाप्रकारे कापूस देत हा व्यवहार पंडितरावांनी अखेर पूर्ण केला. टप्प्याट्पप्याने विस्तार करीत आज चव्हाण कुटुंबाची शेती नऊ एकरांपर्यंत गेली आहे. पंचायत समितीच्या अनुदानात्मक योजनेतून विहिरीद्वारे सिंचनाची सोय केली आहे. पंडितरावांचा मुलगा गणेश आज शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतो आहे.
रेशीम शेतीत गवसली संधी
पूर्वी कपाशी, तूर, सोयाबीन अशा हंगामी पिकांवर कुटुंबाची भिस्त होती. गणेश यांनी २०१२-१३ च्या दरम्यान भाजीपाला पीक पद्धतीचा स्वीकार केला. चार वर्षे त्यात सातत्य ठेवले. पुढे कोरोना तसेच अन्य संकटांमुळे ही पीक पद्धती खर्चिक झाली. मग गणेश यांनी पर्यायी शोध सुरू केला. त्या काळात मसला गावातून तालुक्याचे ठिकाण असलेल्या नांदगावकडे ये-जा करताना सातरगाव येथील सचिन चौधरी यांचे रेशीम शेड सातत्याने दृष्टीस पडायचे.
त्यातून या शेतीविषयी उत्सुकता निर्माण झाली. केली. त्यांच्याशी मैत्री वाढविली. त्यातून रेशीम शेतीचे बारकावे लक्षात आले. त्यानंतर २०१९ मध्ये या शेतीची कास धरली. दरम्यान, गणेश यांनी स्थानिकसह बुलडाण्यापर्यंत जाऊन यशस्वी रेशीम उत्पादकांकडे प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांच्या अनुभवांचा अभ्यास केला. शास्त्र जाणून घेतले. मसला येथील शिरीष ढेपे यांचीही त्यामध्ये मदत झाली.
रेशीम शेतीची वाटचाल
सन २०१९ मध्ये एक एकर तुती लागवडीपासून झालेली सुरुवात पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण वाटचालीतून दोन एकरांपर्यंत पोहोचली आहे. मनरेगा अंतर्गत दोन लाख ८८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. रेशीम संचलनालयाच्या शिफारशीनुसार पाच बाय दोन फूट लागवड अंतर व तीन फुटी पट्टा पद्धत अशी तुतीची लागवड केली होती.
मात्र खेळती हवा, अपेक्षित सूर्यप्रकाश व प्रकाश संश्लेषण क्रिया यांचा विचार करून दोन ओळींत सहा फूट, तर दोन झाडांत तीन फूट अंतराने लागवड केली आहे. आता पाल्याचा दर्जा सुधारला असून उत्पादकताही वाढली आहे.
त्याचा अळ्यांना चांगला फायदा होत आहे. सुमारे ५० बाय २० फूट क्षेत्राचे रेशीम शेड असून टीन पत्र्याचे छप्पर आहे. सध्या हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण म्हणून ताडपत्रीचा वापर केला आहे. उन्हाळ्यात पत्र्यावर मक्याचा पालापाचोळा, फॉगर्स व ओल्या बारदानाचा वापर केला जातो.
उत्पादन व विक्री व्यवस्था
वर्षभरात सुमारे सात ते आठ बॅचेसमध्ये घेतात उत्पादन.
प्रति १५० व १०० अंडीपुंज असे एक आड एक पद्धतीने बॅचचे उत्पादन.
प्रति १०० अंडीपुंजांमागे ७० ते ८० किलो तर १५० अंडीपुंजांमागे १२० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन.
जालना मार्केटला होते विक्री. किलोला ४००, ५५० ते कमाल दर ६३० रुपयांपर्यंत मिळाला आहे.
रेशीम शेतीने मोठे केले
सुरुवातीच्या काळात एका बॅचमध्ये सुमारे २८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या वेळी झालेला आनंद शब्दात सांगता येणार नाही असे गणेश सांगतात. त्यातूनच व्यवसायात अजून हुरूप वाढला. सुमारे ३५ किलोमीटरवरून चॉकी खरेदी करावी लागते. मात्र आता स्वतःच त्याचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. आज वर्षभरातील सात- आठ बॅचेसमधील उत्पादनातून काही लाखांची अर्थप्राप्ती होत असल्याचे समाधान गणेश व्यक्त करतात. त्यातूनच दैनंदिन खर्च भागवले जातात.
सुमारे १५ लाखांचा प्लॉट खरेदी केला आहे. दारात चारचाकी आहे. गणेश व आई जमुनाबाई रेशीम शेतीची सारी जबाबदारी सांभाळतात. वडील पंडितराव शेती व जनावरांचा सांभाळ करतात. पत्नी कांचन घर व्यवस्थापन पाहतात. मुले वेदिका व तनिष शाळेत शिकतात.
अशा प्रकारे आमचे कुटुंब रेशीम शेतीवरच मुख्यतः उभे आहे. एकेकाळी खडतर संघर्ष पाहिलेल्या या कुटुंबाला शेतीने व त्यातही रेशीम व्यवसायाने घडविल्याचे गणेश सांगतात. घरी चार देशी गायी आहेत. त्यांच्यासाठी अर्धा एकरात नेपियर आहे. अडीच एकरांत संत्रा लागवड केली आहे.
गावातील शेतकऱ्यांना प्रेरणा
पूर्वी गावात गणेश एकमेव रेशीम उत्पादक होते. आता त्यांच्याच प्रेरणेतून गावातील चार शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली आहे. त्या माध्यमातून तुती लागवड क्षेत्र सात एकरांवर पोहोचले आहे. या चार शेतकऱ्यांनाही चांगली अर्थप्राप्ती होत आहे. सर्व शेतकरी मिळून जालना येथे कोष घेऊन जात असल्याने सर्वांच्याच वाहतुकीवरील खर्चात बचत झाली आहे.
गणेश चव्हाण ८२७५८०५२६०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.