Orchard Plantation : फळबाग लागवडीचे नियोजन
भूषण यादगीरवार, डॉ. महेश बाबर
फळबाग लागवडीचे नियोजन करण्यापूर्वी जमिनीची निवड, मातीची तपासणी करावी. तसेच लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व गोष्टींचे नियोजन करावे.
आंबा
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आंबा कलमांची छाटणी आणि वळण देण्याचे नियोजन केले असेल तर सघन पद्धतीने ५ मीटर × ५ मीटरवर लागवड करणे फायदेशीर आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी झाडांची संख्या वाढते. पारंपरिक पद्धतीने लागवड केल्याने अधिक जमीन अडकून राहून कलमांची एकरी संख्या कमी बसते. सुरुवातीची अनेक वर्षे विस्तार कमी असल्याने उत्पादन कमी मिळते. नंतर कलमे वाळली किंवा रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादन कमी येते.
अधिक अंतरावरील कलमे १५ वर्षांनी विस्तारित होतात, त्यामुळे मोहराचे रक्षण करणे आणि फळे उतरवणे अवघड होते. यासाठी सघन पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे. कलमांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ मिळते. जमीन (पोत, प्रत, खोली, उतार) आणि निवडलेली जात यांचा विचार करूनच अंतर ठरवावे. आंबा बागेत एकाच जातीची कलमे लावल्यास ४० ते ५० टक्के संयुक्त फुलांचे परागीकरण होत नाही. परिणामी गळ होते. आंबा लागवड करताना १० टक्के इतर जातींची कलमे लावणे महत्त्वाचे ठरते.
तोतापुरी ः चवीला कमी गोड असते. फळांची साल जाड असल्याने जास्त हाताळले तरी खराब होत नाहीत. नियमित उत्पादन मिळते.
केसर ः फळाला उत्तम स्वाद,टिकाऊपणा आहे. नियमित फळधारणा होते.
हापूस ः आंबट, गोड चवीचा योग्य मिलाप असतो. दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते.
दशहरी ः फळे जून, जुलै महिन्यात बाजारात येतात.उत्तर भारतात वर्षाआड अनियमित फळधारणा होते.फळे घोसाने येतात. स्वाद आणि टिकाऊपणा चांगला आहे.
आम्रपाली ः ही जात नीलम आणि दशहरी यांच्या संकरीकरणातून तयार झाली आहे. अति घन लागवडीसाठी उपयुक्त.
फुले अभिरुची ः ही जात लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे. कोईचा लहान आकार, फळांतील आम्लता ३ ते ३.३० टक्के असते.
डाळिंब
हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्या प्रकारे घेता येते. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत अंतराचा अवलंब न करता झाडे जवळ लावल्यास पुढील काळात तेलकट डाग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
लागवड ४.५ मी × ३ मीटर अंतरावर लागवड करावी. खड्डे भरताना शेणखत
२० किलो, गांडूळ खत २ किलो,
निंबोळी पेंड ३ किलो, ट्रायकोडर्मा प्लस २५ ग्रॅम, ॲझोटोबॅक्टर १५ ग्रॅम, स्फुरद जिवाणू संवर्धक १५ ग्रॅम मातीमध्ये मिसळावे.
भगवा ः फळांचा मोठा आकार, जाड साल असलेली फळे दूरवरच्या बाजारपेठांसाठी उपयुक्त. इतर जातीच्या तुलनेत काळा ठिपका रोग तसेच फुलकिडीस कमी बळी पडणारी जात आहे.
फुले भगवा सुपर : फळे मध्यम आकाराची, फळांवर चकाकी, आकर्षक गर्द रंगाची. जाड साल, गर्द लाल व आकर्षक दाणे, निर्यातीसाठी तसेच देशातील बाजारपेठेसाठी उपयुक्त.
लिंबू
लागवड करण्यासाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी, उदासीन सामू असणारी जमीन उपयुक्त ठरते. चुनखडी १० टक्क्यांपेक्षा कमी असलेली जमीन लागवडीसाठी उपयुक्त असते. लागवडीसाठी साई शरबती, फुले शरबती इत्यादी सुधारित जातींची निवड करावी. लागवड ६ मीटर बाय ६ मीटर अंतरावर करावी.
साई शरबती
चौथ्या वर्षी प्रथम फुलोरा.
स्थानिक आणि प्रचलित जातींपेक्षा फळांचे उत्पादन जास्त.
फळे किंचित लंबगोलाकार व सरासरी ५० ग्रॅम वजन, पातळ साल, रसदार, कमी बी असलेली व चमकदार पिवळा रंग.
खैऱ्या रोग आणि ट्रिस्टाझा या विषाणूजन्य रोगांस सहनशील.
फुले शरबती
तिसऱ्या वर्षी प्रथम फुलोरा.
फळ धारणा दिवस १५०-१७०.
वाढ जोमाने, लवकर फळधारणा, उन्हाळ्यात जास्त फळे.
कीड व रोगास कमी बळी पडणारी जात.
- डॉ. महेश बाबर, ९८५०६८७२५३
(कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.