Indian Agriculture : प्रत्यक्ष काम करणारे होऊयात...

निसर्गायनमध्ये लिहिता-लिहिता एक वर्ष पूर्ण झाले. आजचा या सदरातील शेवटचा लेख. वर्षभरात अनेक वाचकांनी लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया, त्याबद्दलचे त्यांचे अनुभव लिहून कळवले. जे शेतकरी, गावकरी निसर्गाच्या जास्त जवळ राहतात, त्या अनेकांनी हे लिखाण वाचून आनंद घेतला. मला समजलेला निसर्ग हलक्या-फुलक्या शब्दांत सांगता यावा आणि माणूस म्हणून असलेली आपली जबाबदारी व त्याची जाणीव आम्हाला यावी, असा हा प्रयत्न होता. निसर्गाच्या अनेक पैलूंपैकी शेती व अन्न याला धरून जे काही अनुभवले, ते येथे काही प्रमाणात व्यक्त केले.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

मागच्या आठवड्यात एका कार्यक्रमात काही महिलांनी प्रश्‍न विचारला, “ताई, तुम्ही केलेली ज्वारीची शेव कशी बनवायची ते आम्हाला सांगाल? आम्हीही तसेच करण्याचा प्रयत्न करू.” त्यावर मी त्यांना म्हटले, “मी जे केले ते व तसेच तुम्ही करायला जाल तर ते यशस्वी नाही होणार कदाचित. पण यावरून तुम्ही तुम्हाला काय छान करता येते, याचा शोध घ्या. कदाचित आमच्यापेक्षा जास्त छान तुम्हाला करता येत असेल, ते शोधा आणि त्यावर काम करा.”

सांगायचा मुद्दा हा, की निसर्ग व त्याची होणारी हानी यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण त्यासाठी काय ‘बेस्ट’ करू शकतो, यासाठी प्रयत्न करावा. अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात. असाच अमित भेटला अहमदनगरमध्ये. शाळेपासूनच त्याला झाडांबद्दल प्रेम निर्माण झाले. कुमारवयात मुलींचे आकर्षण वाटण्याऐवजी याचे प्रेम जडले झाडांवर आणि त्यावर येणाऱ्या पाखरांवर. जवळच असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी काही झाडे दाटीवाटीने लावलेली होती. शाळा आणि नंतर कॉलेज संपले, की अमित दररोज इथे पोहोचायचा आणि अनेक पक्ष्यांचे व झाडांचे निरीक्षण तेथे येऊन करायचा. असे अनेक वर्षे सुरू होते.

Indian Agriculture
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

तो बारावीत असताना रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ती सर्व झाडे एका दिवसात तोडली गेली. आता तिथे पक्षी नव्हते, झाडे नव्हती फक्त सुनसान रखरख होती. याने व्यथित झालेल्या अमितला झाडे लावावीत असे वाटू लागले. झाडे लावण्यासाठी जागा हवी म्हणून त्याने ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. स्वतः झाडांच्या बिया गोळा केल्या, उत्तम नर्सरी बनवली. त्यासाठी देशी-विदेशी वृक्षांचा सखोल अभ्यास केला.

एक झाड म्हणजे एक परिसंस्था कशी असते, अर्जुन सादड्याची साल कधी काढावी, कोणत्या झाडाचा उपयोग कसा करावा, बियांची रुजवण कशी करावी असा अनेक अंगाने त्याने अभ्यास त्याने केला. हे सर्व ज्ञान नर्सरी बनवण्यासाठी, बिया जमा करण्यासाठी त्याला उपयोगी पडले. सुरुवातीला त्याने पाच रुपयांमध्ये दर्जेदार रोपे ग्रामपंचायतींना दिले. आता शिक्षण पूर्ण करून अमित पूर्णवेळ नर्सरी चालवत आहे. त्यासाठी लागणाऱ्या बिया तो स्वतः जंगलात फिरून गोळा करत आहे.

Indian Agriculture
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांत नवजीवन ही संस्था काम करते. शाश्‍वत ग्रामीण विकास या संकल्पनेवर देवगाव येथे संस्थेचे काम सुरू आहे. वृक्षारोपण यातला महत्त्वाचा भाग. अमितच्या सर्वसमावेशक वृक्षारोपण संकल्पनेला साथ मिळाली नवजीवन संस्थेची. यातूनच वृक्षारोपणासाठी प्रयत्न सुरू झाले. गावातील तरुण व अनुभवी गावकऱ्यांची जोड घालून तेथे लोकसहभागातून देवराई उभी राहत आहे.

वृक्षारोपण करताना स्थानिक बाभळीचे, बिब्याचे झाड देखील येथे जपले जाते. त्यासोबत काही देशी वृक्षांची लागवड येथे होते. मात्र ग्लिरिसिडीयासारखी काही झाडे आवर्जून काढलीही जातात. झाडांना पाणी मिळावे म्हणून मोठाले आडवे चर, ड्रीप व शेततळे यांचीही सोय केली आहे. पाणी कमीच पडले तर गावातील प्रवीण, रोशनसारखी मुले डोक्यावर वाहून झाडांना पाणी देतात. २०१९-२० मध्ये उभी राहिलेली झाडे आज दिमाखात बहरत आहे. गावकरी आपली जनावरे चरण्यासाठी येथे आणत नाहीत. थोड्याच काळात ही देवराई दिमाखाने उभी राहील.

Indian Agriculture
Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

झाडांवर किंवा निसर्गावर फक्त प्रेम असून चालत नाही, तर त्यासाठी झिजण्याची तयारी देखील असायला हवी. मोठे पगार, आरामदायी जीवन सोडून रानावनात भटकंती करता आली पाहिजे. प्रसंगी त्यासाठी काहीतरी रचनात्मक काम उभे करता आले पाहिजे. निसर्गाशी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपली नाळ जोडलेली असते. निसर्गाच्या अद्‍भुत किमयेची जादू चराचरांत व्यापून उरलेली असते. प्रत्येक सजीव- निर्जीव गोष्टींचे पद्धतशीर असणे, हे जाणकाराला समजून येते. यामागे कोणती प्रेरणा आहे? यामागे कोण चित्रकार, किमयागार आहे? हे सांगणे अवघड आहे. माणूस म्हणून निसर्गात असणारी तत्वे जगण्यासाठी लावता येतील का, याचाच विचार केलेला बरा.

कोरोनानंतर लोकांचे जगणे बदलून गेले. लोक अनेक प्रकारे विचार करू लागले. कुणी म्हटले, आयुष्याचा काही भरोसा नाही, कशाला पैसे वाचवून ठेवायचे? आजचा दिवस आहे तो मजेत, आनंदात घालवूया. म्हणून गोड-धोड करून खाणारे जसे दिसले तसेच महागडे वाहन घेऊन हौस करणारेही दिसले. रस्त्यांवर कधी नव्हती अशी ट्रॅफिक वाढायला लागली. कुणी जमेल तसे, जमेल तेथे कुटुंबाला घेऊन फिरायला लागले. त्याच वेळेस माणूस माणसाचा विचार करेनासा झाला. अविश्‍वास वाढला. मेंदूंचे विस्थापन झाले. कुटुंब विखुरले गेले. हातात आलेल्या मोबाईलमुळे लहानग्यांना शिक्षणापेक्षा यू-ट्यूबमध्ये रस वाढला. मोठ्यांचाही ‘स्क्रीन टाइम’ वाढला. माणूस माणसापासून व निसर्गापासून दुरावत चालला. हे सर्व निसर्गास पूरक ठरणार का, हा खरा प्रश्‍न उरतो.

कळसूबाई डोंगरउतारावर वडिलोपार्जित शेती करणारा पोपट घोडे. पावसाळ्यात प्रचंड पाऊस आणि उन्हाळ्यात पिण्यासाठी थेंब-थेंब पाण्याची मारामार. आजूबाजूला सर्व शेतकरी काही प्रमाणत आधुनिक तर काही प्रमाणात पारंपरिक बियाण्यांची शेती करतात. भातशेती ही मुख्य. त्याबरोबर नाचणी, वरी व कडधान्य अशी त्यांची शेती. नैसर्गिक शेतीची उत्तम व्यवस्था या भागात आहे. बैलजोडीशिवाय इथली शेती पुरी होऊ शकत नाही. बैलांच्या जोडीला पोपटकडे गायींचा मोठा कळप आहे.

डांगी जनावर हे या भागासाठी खास असतात. गायीच्या दुधापासून पेढे वगैरे बनवून कळसूबाईच्या शिखरावर त्याची विक्री होते. गायींपासून शेताला व रानालाही शेणखत, मूत्र मिळते. १० वर्षांपूर्वी इथे रासायनिक खते व संकरित बियाणे लोक वापरू लागले. पोपट आमच्या संपर्कात आला, तेव्हा त्याला पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व पटले. सेंद्रिय निविष्ठा वापरून तेव्हापासून सातत्याने पारंपरिक बियाण्यांची शेती तो करत आहे. ही शेती करताना निसर्गाने अनेक धोके दिले तरी याच्या शेतीवर फारसा परिणाम झाला नाही.

चार वर्षांपूर्वी पोळ्याच्या सणानंतर म्हणजे साधारणतः भाद्रपद महिन्यापासून पाऊस गेला. पहिल्यांदाच असे विपरीत घडले. आजूबाजूच्या भातशेतीने पाण्यावाचून मान टाकली. उभी पिके शेतात करपून गेली. दुष्काळात फाटलेल्या भुईचा फोटो पाहतो अगदी तशीच शेतजमिनीला भेगा पडल्या. आणि त्याही स्थितीत पोपटच्या पारंपरिक भातपिकाने लोंब्या धरल्या. थोडे कमी उत्पादन आले पण पीक हाती लागले. शून्य पाण्यात. आजूबाजूचे तोपर्यंत त्याला मानत नव्हते, पण आता हा अनुभव खूप दांडगा होता. हा सूर्य, हा जयद्रथ अशी स्थिती होती. आता इतर लोकदेखील पारंपरिक बियाण्यांकडे वळले आहेत.

पोपटच्या प्रयत्नांना कळसूबाई मिलेट उत्पादक शेतकरी कंपनीची साथ मिळाली. त्याने पिकवलेला भात व इतर भरडधान्ये विकण्याची जबाबदारी कंपनीने घेतली. सुवासिक काळभात १३००० रुपये क्विंटल दराने विकला जाऊ लागला. इतर भातांपेक्षा दुप्पट भाव मिळून उत्पन्न वाढले. रासायनिक शेतीचा खर्च वाचला. पर्यावरणाचे नुकसान टळले. आधी स्वतःपासून सुरुवात करा मग इतरांना सांगा, हे खूप महत्त्वाचे असते. अमित, पोपट यांनी तेच करून दाखवले आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी त्यांनी निवडलेला हाच रस्ता इतरांना पथदर्शी ठरणार आहे. लोकांनी ठरवले तर कोणतेच काम अशक्य नाही, हे देवगावच्या माध्यमातून समोर येते. सगळीकडे आग लागलेली असताना, चिमणी तिच्या चोचीत पाणी आणून ती विझवण्याचा प्रयत्न करत असते, हे पाहून कुणीतरी तिला विचारते, “तुझ्या असे करण्याने आग विझेल का?” त्यावर चिमणी म्हणते, ‘‘जेव्हा हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझे नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल.”

अशीच आज निसर्गाची हानी होत असताना आपण फक्त हातावर हात धरून, मी काय करू शकणार, अशी भूमिका घेऊ नये. तुम्ही विद्यार्थी असा, शेतकरी असा, अभ्यासक असा की सामान्य नागरिक... आपणच खूप काही करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि निसर्गावरच्या प्रेमासाठी फक्त बोलणारे किंवा लिहिणारे होण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणारे होऊयात, ही येणाऱ्या नवीन वर्षासाठी सदिच्छा बाळगते.

- ranvanvala@gmail.com,

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com