
Healthy Food : आज संपूर्ण जगासमोर पौष्टिक आणि सुरक्षित अन्न हा गंभीर प्रश्न उभा आहे. मनुष्यामध्ये कोणत्याही आजाराचा शिरकाव हा मुख्यत्वे हवा, पाणी आणि अन्न या मार्गाने होतो. वाहनांची वाढती संख्या, कारखान्यांतून बाहेर पडणारे धुराचे लोट आणि वाढते धुळीचे कण यामुळे हवा प्रदूषित होत आहे.
या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. शहर आणि कारखान्यांमधील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय नद्यांमधून वहात आहे; जमिनीमध्ये मुरत आहे. तसेच शेतकरी नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा रासायनिक खतांच्या स्वरूपात अतिरेकी वापर करीत आहेत. या कारणामुळे आज पाणी प्रदूषित झाले आहे.
अन्नाच्या प्रदूषणास रासायनिक शेतीपद्धती जबाबदार आहे. शेतामध्ये पिकांवर कीड दिसताच अनियंत्रित प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते. ही कीटकनाशके अन्नधान्य,फळे, भाज्यांमधून आपल्या आहारात येत आहेत. त्यामुळे आज अन्नही सुरक्षित नाही.
१९९९ मध्ये ‘एआयसीआरपी’ने देशभरातील अन्नधान्याचे नमुने गोळा करून ते तपासले. ज्यामध्ये कीटकनाशकांचे अंश, मान्यतेपेक्षा जास्त आढळले. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश येथील भाजी मार्केटमधील अनेक भाज्यांमध्ये मान्यता पातळीपेक्षा कीटकनाशके जास्त प्रमाणात आढळली. हा अतिरिक्त वापर आपल्या शेती उत्पादनाला अडचणीचा ठरू शकतो.
सर्व समाजाचे आरोग्य चांगले राखायचे तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आज एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच रसायन अवशेषमुक्त शेतीच्या दृष्टीने सुरुवात करणे गरजेचे आहे.
अतिरिक्त रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर न करता गरजेप्रमाणे संतुलित प्रमाणात पर्यावरणास बाधा न होता आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने विचार करावा. याकरिता उत्तम प्रकारची वनस्पतिजन्य कीटकनाशके, जैविक कीटकनाशके आणि ज्या रासायनिक कीटकनाशकांचा अंश आपण उत्पादित करत असलेल्या फळ, भाज्यांमध्ये राहणार नाही अशा कीटकनाशकांच्या शिफारशीनुसार योग्य वापराकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हाच शाश्वत शेतीकडे जाण्याचा उत्तम मार्ग आहे. आपली भारतीय शेती परंपरा आपल्या वसुंधरेचे शोषण न करता संवर्धन करायला शिकवते.
रसायन अवशेष रहित पौष्टिक अन्न समाजाला देणारा, सेंद्रिय शेती करणारा शेतकरीच खरा अन्नदाता ठरेल. आज आपल्या देशात हजारोंच्या संख्येने शेतकरी या पद्धतीकडे वळले आहेत. आपल्या जमिनीची, पर्यावरणाची आणि अन्नाद्वारे समाजाची काळजी घेण्याचे काम करीत आहेत. ग्राहकांनी जागरूक होऊन आपल्या दैनंदिन आहारामध्ये जास्तीत जास्त भाग सेंद्रिय शेतीपद्धतीतून मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
बाटलीबंद शीतपेयांमध्येही मोठ्या प्रमाणात कीडनाशकांचे अंश आढळत आहेत. शासकीय प्रयोगशाळांतून यांचे पृथक्करण होऊन यावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु आपल्या उत्तम आरोग्यासाठी शीतपेये पूर्णतः टाळणे हाच शाश्वत उपाय आहे. आपले आरोग्यही सुरक्षित राखले पाहिजे. आपला आहार जर शुद्ध असेल तरच आपले आचार, विचार, व्यवहार शुद्ध होईल, त्यातून एका सुदृढ समाजाची निर्मिती होईल.
- जयदेव बर्वे, ९०११०१९९७६
(लेखक सेंद्रिय शेतीचे अभ्यासक आणि नेचर केअर फर्टिलायझर्स, प्रा. लि (विटा, जि. सांगली) या कंपनीचे संस्थापक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.