Book Review : वाचन प्रक्रियेचा सर्वांगीण आढावा

Vachan Book : आपल्याला साधारण शब्दांची ओळख ही लहानपणी बडबड गीतांतून होते. त्यातील गेयता, शब्दांची सतत होणारी पुनरुक्ती यामुळे ती गाणी पाठ होऊन जातात. हळूहळू त्यातून लिखित स्वरूपाच्या एकेका अक्षराची ओळख करून देतानाच ती आपल्याकडून गिरवून घेतली जातात.
Vachan Book
Vachan BookAgrowon
Published on
Updated on

Book Update :

पुस्तकाचे नाव : वाचन

लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे

प्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

पाने : १८०

मूल्य : २०० रुपये

आपल्याला साधारण शब्दांची ओळख ही लहानपणी बडबड गीतांतून होते. त्यातील गेयता, शब्दांची सतत होणारी पुनरुक्ती यामुळे ती गाणी पाठ होऊन जातात. हळूहळू त्यातून लिखित स्वरूपाच्या एकेका अक्षराची ओळख करून देतानाच ती आपल्याकडून गिरवून घेतली जातात. पूर्वी कित्ता गिरवणे हा प्रकार होता. आता त्या प्रकारची प्लॅस्टिकची स्टेन्सिल्स उपलब्ध झाली आहेत. अक्षराची, शब्दांची ओळख झाल्यानंतर लहान मूल वाचायला सुरुवात करते.

Vachan Book
Book Review : जगणं नव्याने जगताना...

अभ्यास म्हणून सुरू झालेल्या या प्रवासात प्रत्येक शब्द आणि वाक्यातून उलगडणारे अर्थ गळाभेटीला येतात. त्यातून मिळणाऱ्या आनंदामुळे, ज्ञानामुळे त्याला वाचनाचा छंद जडतो. आनंद देणारे, माहिती देणारे, ज्ञान देणारी पुस्तके हळूहळू त्याच्या आयुष्याचा भाग बनू लागतात. तो खऱ्या अर्थाने वाचक बनतो. आता साक्षर असणे (वाचता येणे) ते चोखंदळ, साक्षेपी वाचक या दरम्यानचा एक मोठा पल्ला असतो, तो प्रत्येक जणच गाठेल असे नाही.

प्रत्येक व्यक्तीच्या वाचनाच्या तऱ्हाही वेगवेगळ्या असतात. एखादे अत्यंत महत्त्वाचे वैचारिक असे पुस्तक शांतपणे, अगदी रवंथ करत सावकाश वाचले जाते. तर एखाद्या डिटेक्टिव्ह कादंबरीत कथानकाचा वेगच इतका प्रचंड असतो, की एका दिवसात फडशा पाडूनच बाजूला ठेवले जाते. त्यात अलीकडे पुस्तकांचा नुसता फडशा पाडण्याच्या उद्देशाने वेगाने वाचणे (रॅपिड रीडिंग) हा प्रकार फार फोफावला आहे. मात्र त्यातून किती ज्ञानार्जन होते, हा भाग अलहिदा!

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे वनमानवाला व्यक्त होण्याची गरज भासल्यानंतर पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजातून ती गरज भागवली गेली असेल. ऐकीव आणि मौखिक स्वरूपातून ती पुढील पिढ्यांकडे सोपवली जाऊ लागली. त्यानंतर चित्रातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झाला. संवाद, संपर्काला प्रारंभ होत गेला. त्यातून प्रत्येक आवाज, उच्चारासाठी चित्रातूनच एकेक अक्षर आणि त्यातून त्याची लिपी तयार होत गेली.

Vachan Book
Book Review : मातीच्या कवितेचे पसायदान

या लिखित साहित्यापूर्वी असलेल्या याच बोली साहित्याला किंवा वाङ्‍मयाला लोकसाहित्य म्हणून संबोधले जाते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये त्याला श्रुतिस्मृती म्हणून मोलाचे स्थान दिले जाते. सहज, स्वाभाविक आणि नैसर्गिक रचना हे त्याचे वैशिष्ट्य. इसवी सन पूर्वी ३१०० लिखित साहित्याला प्रारंभ झाल्याचे मानले जाते. म्हणजेच या पाच हजार वर्षांच्या इतिहासामध्ये सुरुवातीच्या काळात गुरुमुखातून शिकणे ते जुने ग्रंथ हाताने नकलून काढणे यामुळे प्रसाराचा वेग मर्यादितच होता.

मात्र गुटेनबर्गने छापखान्याद्वारे पुस्तकाची छपाई सोपी केली आणि पुस्तकाच्या प्रसाराचा वेग प्रचंड वाढला. त्याला गुटेनबर्ग क्रांती म्हणूनही ओळखली जाते. वनस्पतीच्या पानावरील लिखाई, कागदावरील छपाई आता डिजिटल ई बुक स्वरूपामध्ये विसावली आहे. तंत्रज्ञान इतके पुढे जात आहे की आता पुस्तके ही वाचण्याची गोष्ट न राहता ऐकण्याची बाब (ऑडिओ बुक) बनू लागली आहे. आपण वाचनाविषयी इतके बोलत असताना त्या मागील व्यवहार, प्रक्रिया आणि स्वरूप पद्धती यांचा विचार होतोच असे नाही.

वाचनाच्या विविध पद्धतीचा विकास कशा प्रकारे होत गेला, याचा इतिहास माहीत असतोच असे नाही. शब्द किंवा अक्षरधन ही माणसाच्या व्यक्त होण्याचीच मूलभूत गरज आहे. त्याचे वाचन म्हणजे त्या माणसाला जाणून घेणे. वाचनाच्या या प्रक्रियेचा सांगोपांग विचार आपल्याला वाचन या डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या पुस्तकातून समजण्यास मदत होते.

या पुस्तकामध्ये लोकसाहित्य, लेखनाचा विकास, ग्रंथ निर्मिती आणि ग्रंथालयांचा विकास या पूर्वटप्प्यांचाही विचार केला आहे. त्या पुढे जात लेखक वाचनाचे स्वरूप आणि व्याप्ती, वाचनाची कौशल्ये, सृजनात्मक वाचन, अध्ययन, अध्यापन, वाचनाचा वेग, आवाका याविषयीही माहिती देतात. वाचन दोषांची मांडणी करतात. परिशिष्टांमध्ये वाचकांचे हक्क, ग्रंथ सनद, सुभाषित संग्रह यांचाही समावेश केलेला आहे. वाचन या प्रक्रियेचाच सर्वांगीण विचार मांडणारे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com