Book Review : कासरा : जमिनीशी नाळ जोडलेली कविता

Kaasara Book : कवितेवर नितांत प्रेम करणारा अस्सल कवी म्हणून ऐश्‍वर्य पाटेकर यांच्याकडे पाहाता येते. शेती, माती, नाती आणि समाजाचं भान जपणारा, त्यांच्याप्रती निष्ठा जपणारा हा कवी कवितेतून आपल्या जगण्याला निश्‍चित आधार देतो.
Kaasara Book
Kaasara BookAgrowon
Published on
Updated on

धर्मवीर पाटील

कवितासंग्रह : कासरा

कवी : ऐश्‍वर्य पाटेकर

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

पाने : १२८

किंमत : ४०० रुपये

कवितेवर नितांत प्रेम करणारा अस्सल कवी म्हणून ऐश्‍वर्य पाटेकर यांच्याकडे पाहाता येते. शेती, माती, नाती आणि समाजाचं भान जपणारा, त्यांच्याप्रती निष्ठा जपणारा हा कवी कवितेतून आपल्या जगण्याला निश्‍चित आधार देतो, दिलासा देतो आणि सावध, सजगही करतो. ‘भुईशास्त्र’ या पहिल्या कवितासंग्रहाने आणि ‘जू’ या आत्मकथनाने मानवी संवेदनेला आणि प्रस्थापित व्यवस्थेला हादरे दिल्यानंतर बऱ्याच काळाने ‘कासरा’ हा कवितासंग्रह आला आहे.

संवेदनाविश्‍व पुन्हा तितक्याच ताकदीने ढवळून काढताना हा कवी ‘मातीच जर नष्ट झाली तर कविता लिहिण्याचं कारणच आपोआप संपुष्टात येईल’ असे म्हणतो. ‘स्वतःमध्ये अख्खं गाव घेऊन फिरणारा’ हा कवी ‘वर्तमानाला लागलेल्या वाळवीचं’ वर्तमान सांगतो.

Kaasara Book
Book Review : मातीच्या कवितेचे पसायदान

हिरव्या चैतन्याचा लसलसता कोंब

जळून खाक व्हायच्या आत

मला त्याचं शेवटचं चित्र शब्दात काढून ठेवायचं आहे.

जिला शेवटच नाही,

अशी शेवटची कविता लिहून ठेवायची आहे.

नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसाला आता कविताच वाचविणार आहे.

त्याच्या कवितांमध्ये येणाऱ्या स्त्रैण जाणिवांही अत्यंत सजग आहेत. ‘‘मातीतल्या बाया दिवसाला पदरात झाकून, दिवे लागणीला घरी परतताहेत. डालून घेताहेत घराच्या खुराड्यात. चुलीत जाळून घेताहेत स्वतःला; भाजून घेताहेत तव्यावर. मातीतल्या बाया भाकर होताहेत; तवा हसू लागलाय...’’ हे म्हणताना ‘मातीच्या लेकींचा शाप घेऊ नका’ असा इशाराही ते देतात.

जागतिकीकरणाच्या रेट्याने ग्रामजगताची झालेली वाताहतही कवीच्या नजरेतून निसटत नाही. ‘मारुतीचं देऊळ’, ‘वाळून गेलेलं नदीचं अंग’, ‘आजारी पडलेल्या पायवाटा’, ‘शेतीला झालेला कर्करोग’, ‘क्षयरोग ग्रस्त झालेला मुलुखच्या मुलुख’, ‘बैलगाडी’, ‘विहिरीची धाव’, ‘गोठ्यातले मुके खुटे’, ‘रडणाऱ्या साळुंक्या’, विहीर, गाय, बैल.... या सर्वांच्या वेदना लक्षात येतात. पण ‘‘यांचे डोळे पुसावेत, असे हात माझ्याकडे कुठे आहेत?

ते कधीच शहराने काढून घेतले खांद्यापासून...’’ अशी हतबलता व्यक्त करतो, तेव्हा आपणही हेलावून जातो. ग्रामजीवनाचं करुण, विदारक चित्र डोळ्यासमोर उभं करताना एकेक पात्र तितक्याच ताकदीने उभे करतो. थकलेल्या सूर्याचे पाय चेपणारी आई, विसा परसराम, दत्तू, आवडाई, मथुबाई संपत मोरे, वच्छी ही पात्रं कमी अधिक फरकानं, वेगळ्या नावांनी आपल्या आजूबाजूलाही आहेत.

Kaasara Book
Book Review : जगणं नव्याने जगताना...

कवीला मिळालेली ही दृष्टी नुसतीच आपणाला हलवून सोडत नाही, स्वतःबद्दल लाज वाटून घ्यायलाही भाग पाडते. शहर आणि गावातली दरी, कवीचं उसवत राहणारं मन, हुंदके देऊन अधोरेखित होणाऱ्या सीमारेषा शब्दाशब्दांतून ठसठसत राहतात. झाडाची आत्महत्या, माणसाच्या राक्षसानं भेदून टाकलेत तिन्ही लोक, ग्लोबल गाठोडं, कितीतरी वर्षांत मी जातो जेव्हा गावी, चिंधूचा बैल आणि दुष्काळ, वावराचं मृत्युपत्र, कसं मूळ धरू या मातीत?,

घरभर झालेला धूर, निकाली निघालेला प्रश्‍न, नांगर अशा कविता वाचकाला अंतर्बाह्य हलवून सोडतात. आपल्या आत डोकावायला भाग पाडतात. रिपोर्ताज स्वरूपाची ‘अर्थात दुष्काळाचा फोटो आलाच नाही...!’ ही कविता निर्लज्ज बनत चाललेल्या मीडियाची लक्तरं वेशीवर टांगते.

पुस्तकं हा तर अनेकांचा संवेदनशील विषय. पुस्तकाचे ‘बी’ नावाच्या कवितेत कवी म्हणतो,

माणूस पुस्तक वाचतो म्हणजे काय करतो?

तर तो पुस्तकाचं ‘बी’ घेऊन फिरत असतो

भेटेल त्याच्या मनात ते ‘बी’ टाकून देत असतो

पुस्तकाचं ‘बी’ पडून राहतं माणसांच्या पसाऱ्यात,

जिथे भुसभुशीत वाफसा झालेली माती त्यास गवसते

तिथं आपसूक मूळ धरून ‘बी’चं झाड होतं

ते पांगत पांगत मोठं मोठं होत विस्तारत राहतं...

म्हणूनच पुस्तकाला फुटल्या पाहिजेत फांद्या

डवरून आलं पाहिजे त्याचं झाड..."

‘मी माझ्यात अख्खं गाव घेऊन फिरतोय’, ‘वावराचं मृत्युपत्र’, ‘कसं मूळ धरू या मातीत..?’ आणि ‘मी माझी कविताच परत करू इच्छितोय’ अशा चार विभागात येणाऱ्या सर्व कविता वाचनीय आहेत. कवितेत स्वतःच्या संवेदनशील भावनेशी इमान राखतानाच शब्दांचं सौंदर्य कसं राखायचं, हे ‘कासरा’मधील कविता आपल्याला शिकवतात. ही जाणीव दीर्घकाळ आपल्यासोबत जपण्यासाठी बांधून घालण्यासाठी ‘कासरा’ हा कवितासंग्रह आपल्याकडे हवाच. चित्रकार संतोष घोंगडे यांचं मुखपृष्ठ कवितेच्या आशयाला ठसठशीत करतं.

धर्मवीर पाटील ७५८८५ ८६६७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com