
शंकर बहिरट
चाकणच्या मजूर नाक्यावर शेतातल्या कामासाठी गडी शोधत होतो. गर्दीत एकाला हेरला गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध, डोक्यावर टोपी, पांढरा शर्ट आणि पायजमा.
माळकरी असल्याने तो नक्कीच टल्ली नसावा असा अंदाज बांधला कारण हातभट्टी किंवा देशी पिणारे लगेच ओळखू येतात.
नाक्यावरच्या प्रथे प्रमाणे त्याने माझा इंटरव्ह्यू घेतला. म्हणजे, राम कृष्ण हरी तुम्ही कोण कुठले? काम कुठे आहे? कसले काम आहे ? बरोबर मदतीला आणखी माणसे आहेत का? सकाळी नाष्टा केला नाही वडापाव मिळेल का? दुपारी जेवणाची सोय आहे का? संध्याकाळी पाच वाजता सुट्टी करणार. तुम्हाला पुन्हा मला इथे आणून सोडावे लागेल. राम कृष्ण हरी वगैरे वगैरे नियम अटी शर्ती रोजचा पगार सगळे मान्य केल्यानंतर तो माझ्याबरोबर यायला तयार झाला.
शेतात आल्यावर मात्र मी त्याचा इंटरव्ह्यू घेणारच हे क्रम प्राप्त होते. कोण कुठला वगैरे विचारून झाले. उर्वरित माहिती त्याने न विचारताच दिली.
"राम कृष्ण हरी मी असले काम करत नाही पण आज टाईमपास म्हणून आलोय. कंपनीत कामाला होतो मालकाला पंधरा दिवसाची सुट्टी मागितली तर त्याने नकार दिला मग काय, मारली नोकरीवर लाथ!"
"अरे पण इतक्या पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन तू काय करणार आहेस?"
"राम कृष्ण हरी काय करणार म्हणजे? माझ्या माऊलीच्या पालखी बरोबर दरवर्षी जात असतोय रविवारी प्रस्थान आहे म्हणून म्हटलं दोन दिवस नाक्यावर उभं रहावं वारी पुढं असल्या छप्पन नोकऱ्या कोलतो मी "
" पंधरा दिवस कामाचे नुकसान होणार नाही का तुझे?"
" राम कृष्ण हरी नुकसान कसले सगळी माझ्या माउलीला काळजी. मस्त पैकी हरिनाम घेत चालत रहायचे. गावोगावचे लोक कुणी केळी देतात कुणी लाडू, जिलेबी, बालुशाही कुणी कुणी तर आग्रहाने जेवण देतात. पंधरा दिवस म्हणजे आनंदाचा सोहळा असतो.हा सुख सोहळा स्वर्गी नाही. राम कृष्ण हरी.
माऊली, बरं संध्याकाळी जाताना तेव्हढ हजारेक रुपये उसने द्या माऊलीच्या वारकऱ्याला. वारी वरून आलो की पहिले तुमच्याकडेच येणार कामाला, राम कृष्ण हरी" "महाराज, गप्पा बास करा,आता जरा कामाचे बघा. बारा वाजत आलेत" " बरं जेवणाचा डबा आणलाय ना? मला जरा लवकर भूक लागते,राम कृष्ण हरी"
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.