
Washim News: प्रशासनाने केलेली एखादी सुविधा नागरिकांच्या दृष्टीने किती फायदेशीर ठरू शकते हे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृतीतून दिसून आले आहे. या बाजार समितीने मागील दोन हंगामापासून हळद खरेदीचा निर्णय घेत अंमलबजावणी केली आहे. याचा फायदा तालुक्यातील व इतर भागांतील हळद उत्पादकांना होत असून गेल्या वर्षात या बाजारात सुमारे दीड लाख क्विंटलपर्यंत हळदीची उलाढाल झाली. यंदाचा हंगाम सध्या सुरू असून बाजाराच्या दिवशी येथे आठ ते दहा हजार क्विंटलची आवक होत असते, यातच वरील निर्णयाची योग्यता स्पष्ट होते.
वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत हळदीचे उत्पादन घेतले जाते. रिसोड हा तालुका त्यातही आघाडीवर आहे. शेतकऱ्यांना पिकवलेली हळद विक्रीसाठी हिंगोली, वसमत, सांगली अशा बाजार समित्यांत जावे लागायचे. पण स्थानिक गरज पाहून येथील बाजार समितीने हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले. आता रिसोड बाजार समितीत हळदीची विक्री व्यवस्था सुरू झाल्याने जिल्ह्यासह बाहेरच्या शेतकऱ्यांचीही येथे गर्दी होत आहे.
शेतकऱ्यांनी नगदी पिकाच्या दृष्टीने हळदीकडे पसंती वळवली आहे. सिंचनाच्या सोयींमुळे प्रत्येक शेतकरी किमान एक ते दोन एकर हळदीची लागवड करीत असून, काहीजण आठ ते दहा एकरापर्यंतही पेरणी करतात. यंदा हळदीला सुरुवातीपासूनच १४ हजारांपर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. गुरुवारी (ता. २४) बाजारात १३,६७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. वाढत्या मागणीमुळे बाजार समितीने आठवड्यातून दोन दिवस (रविवारी व गुरुवारी) हळद खरेदी सुरू केली आहे.
बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांपासून हळदीला पर्यायी पीक म्हणून प्रोत्साहन दिले आणि हळद परिषदांच्या आयोजनातून शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान मिळवून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा हळदीकडे कल वाढला. आता रिसोड बाजार समितीतच खरेदी-विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेले आहे.’’ बाजार समितीचे सचिव विजयराव देशमुख म्हणाले, ‘‘वाढत्या आवकेमुळे शेतकऱ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून पुरेशा सोयी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याबाहेरूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत. शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठी बाजार समिती प्रशासन कायम दक्ष असते.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.