Sangli News : देशात यंदाच्या हंगामात अंदाजे ३ लाख हेक्टर इतकी हळदीची लागवड झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ७८ हजार ३०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. सध्या पीक जोमात आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत ५ हजार हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राने दिली.
महाराष्ट्रातील सांगली, सातारा, हिंगोली आणि वाशीम या जिल्ह्यांत अतिपावसामुळे सुमारे २० टक्के कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अतिपावसामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रमुख राज्यांत हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. या राज्यांबरोबर ओडिशा, पश्चिम बंगाल, मिझोराम, गुजरात, आसाम या राज्यांतील हळदीचे क्षेत्र पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. गतवर्षी देशात हळदीचे ३ लाख ५ हजार १८२ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती.
यंदाच्या हंगामात हळदीची अंदाजे ३ लाख हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५ हजार हेक्टरने लागवड घटण्याचा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. दरम्यान, देशातील हळद लागवडीचे चित्र सप्टेंबर महिन्यात स्पष्ट होईल, त्याचवेळी देशात हळदीचे क्षेत्र वाढले की, घटले याचा अंदाज समोर येईल.
सध्या हळद लागवड करुन तीन महिने पूर्ण झाले आहेत. कंद वाढीचा काळ असून आता शेतकरी भरणी करण्याचे नियोजन करत आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव नसून पीक चांगले जोमात आहे. हळदीची वाढ आणि फुटवेही अपेक्षित आहेत. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
राज्यात कंद कुज रोगाचा प्रादुर्भाव
राज्यातील सांगली, सातारा, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत जुलै महिन्यात अतिपाऊस झाला. या पावसाचा फटका हळद पिकाला बसला आहे. यामुळे कंदकूज या रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला असून आतापर्यंत २० टक्के कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मुळांचे कार्य थांबल्याने हळदी वाढ खुंटली जाते.
कंदकूज रोगावर उपाययोजना...
पाण्याचा निचरा करावा, ट्रायकोड्रर्मा या बुरशीनाशकाचा वापरावे, ज्याठिकाणी कंदकूज दिसून येते त्याठिकाणी बुरशीनाशकाची आळवणी घालावी, पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांची पानांवर फवारणी करावी. त्यामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येतो, असे कसबे डिग्रज येथील हळद संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.