
डॉ. संतोष यादव, प्रीतम पाटील, डॉ. महानंद माने
महाराष्ट्रामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र तापमानवाढ, उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस आणि दुष्काळ यांसारखी हवामानविषयक आव्हाने निर्माण होत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्याधारित शेतीक्षेत्रेवर या बदलांचे विपरीत परिणाम होत आहेत. तापमान वाढीमुळे विशेषतः मृदापोषक तत्त्वांची कमतरता, पाण्याची टंचाई, किडी-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे पिकांचे उत्पादन घटत आहे.
मागील वर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. त्यामुळे माणसे तीव्र उष्णतेमुळे त्रस्त झालीच, पण पिकांवरही विपरीत परिणाम झाले. विशेषतः कापूस, सोयाबीन, कडधान्ये, ऊस आणि ज्वारी यासारखी मुख्य पिके उन्हाळ्यातील प्रतिकूल हवामानामुळे सर्वाधिक प्रभावित झाली.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
उष्णतेच्या लाटा म्हणजे विशिष्ट प्रदेशातील नेहमीच्या सरासरी तापमानाच्या तुलनेत अचानक व असामान्यरीत्या वाढलेले तापमान.
प्रत्येक प्रदेशानुसार त्या भागाच्या हवामानशास्त्रीय इतिहासावर (क्लायमेटोलॉजी) उष्णतेच्या लाटेचे प्रमाण वेगवेगळे असते. उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढविणाऱ्या हवामानविषयक घटकांमध्ये उच्च आर्द्रता, कमी वा अधिक वाऱ्याचा वेग आणि उष्णतेच्या लाटेचा कालावधी यांचा समावेश होतो.
भारतीय हवामान विभागाच्या निकषानुसार उष्णतेची लाटेचे निर्देशांक पुढील प्रमाणे...
समतल भागात : जर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असेल.
डोंगराळ भागात : जर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असेल.
उष्णतेच्या लाटेचे प्रकार
अ) तापमानाच्या सरासरीपेक्षा वाढीवर आधारित
सामान्य उष्णतेची लाट : तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ते ६.४ अंश सेल्सिअस अधिक.
तीव्र उष्णतेची लाट : तापमान सरासरीपेक्षा ६.४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढलेले.
ब) प्रत्यक्ष कमाल तापमानावर आधारित
सामान्य उष्णतेची लाट : कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक.
तीव्र उष्णतेची लाट : कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक.
क) अतिरिक्त उष्णतेचे घटक
यामध्ये दोन महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात.
अतिरिक्त उष्णता : दिवसभराचे तापमान अधिक आणि रात्री पुरेशी गारवा न मिळाल्यास वातावरणात उष्णतेचा जास्त साठा होतो.
उष्णतेचा ताण : जर तापमान सातत्याने जास्त राहिले, तर शरीरावर उष्णतेचा अधिक ताण पडतो. हे तीन दिवसांच्या सरासरी तापमानाची मागील ३० दिवसांच्या सरासरी तापमानाशी तुलना करून ठरवले जाते.
उष्ण रात्र म्हणजे काय?
उष्ण रात्र म्हणजे किमान तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असलेली रात्र. यामुळे रात्रीच्या वेळेस अपेक्षित थंडावा मिळत नाही आणि उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवतो.
त्याच्या श्रेणी अशा...
उष्ण रात्र : किमान तापमान ४.५ अंश सेल्सिअस ते ६.४ अंश सेल्सिअस दरम्यान वाढलेले असते.
अत्यंत उष्ण रात्र : किमान तापमान ६.४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढलेले असते.
उष्णतेच्या लाटांची सूचना कधी आणि कोण देते?
राष्ट्रीय हवामान पूर्तता केंद्र (NWFC) आणि भारत हवामान विभाग (IMD), दिल्ली हे अखिल भारतीय हवामान अंदाज पत्रिका (All India Weather Forecast Bulletin) मधून पुढील ५ दिवसांसाठी दिवसातून चार वेळा (IST - ०५:३०, ०८:३०, १४:३० आणि १७:३०) उष्णतेच्या लाटांविषयी सूचना प्रसिद्ध करते.
विशेष उष्णतेची लाट असल्यास सकाळी ८ वाजता पुढील २४ तासांसाठी आणि संध्याकाळी ४ वाजता पुढील ५ दिवसांसाठी उष्णतेच्या लाटांची माहिती देणारी स्वतंत्र पत्रिका काढली जाते.
तापमानातील अचानक वाढीच्या काळातील व्यवस्थापन
अचानक वाढणारे तापमान आणि येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. मात्र या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी काही उपाययोजना नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.
वाणांची निवड
ज्या भागामध्ये सातत्याने अशा प्रकारे तापमानात वाढ होते किंवा उष्णतेच्या लाटा येतात, अशा ठिकाणी पिकांची निवड करताना उष्णता सहनशील वाणांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे. उदा. काही संकरित ज्वारी वाण व उष्णता सहनशील कापूस वाण उष्णतेचे अधिक प्रमाण सहन करू शकतात. जलद वाढून उष्णतेच्या कालावधीपूर्वी येणारी पिके किंवा वाण निवडावेत. उदा. सोयाबीनसारख्या पिकात काही कमी कालावधीचे वाण आहेत. ते आधीच निघून जात असल्याने अतिरिक्त उष्णतेचा परिणाम होण्याची शक्यताच कमी होते.
बदलत्या हवामानानुसार पेरणीच्या वेळेत बदल
पीक पेरणीचे योग्य वेळेत नियोजन करून उष्णतेचे परिणाम कमी करता येतात.
लवकर पेरणी
जास्त उष्णता असल्यास पेरणी लवकर करणे किंवा योग्य तो हंगाम निवडणे महत्त्वाचे आहे. उदा. सोयाबीनची पेरणी केल्यास फूलगळ होण्याची शक्यता कमी होते. परिणामी, पीक उत्पादकतेमध्ये वाढ होते.
बाष्परोधकांचा / परावर्तकांचा वापर
अवर्षणप्रवण कालावधीत सूर्याच्या उष्णतेमुळे पिकाच्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. ते कमी करण्यासाठी केओलीन, पांढरा रंग अगर खडू भुकटीचा एक थर फवाऱ्याद्वारे पानांवरद्यावा. त्यामुळे सूर्यप्रकाश पानावरून परावर्तित होऊन पिकांच्या अंतरंगातून होणारी बाष्पीभवन कमी करण्यास मदत होते. परिणामी, पाण्याची बचत होऊन पिकांना ताण सहन करण्यास मदत होते.
रोपांची संख्या कमी करणे
अवर्षण कालावधी वाढल्यास रोपांची जमिनीतील ओलावा, अन्नद्रव्ये इ. साठी जवळच्या दोन रोपांमध्ये किंवा तणांसोबत स्पर्धा वाढते. त्यातून ओलावा कमी पडून सर्व पिकांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी विशेषतः फुलोरा ते दाणे भरण्याच्या वेळी रोपांची संख्या अवर्षणाच्या तीव्रतेनुसार २५ ते ५० टक्क्यांनी कमी करावी.
ठिबक सिंचन आणि पाण्याचे व्यवस्थापन
उष्णतेच्या लाटेच्या काळात पाणी उपलब्धतेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. पाणी कमी असलेल्या काळात त्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचन पद्धत: ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाणी थेट मुळांपर्यंत पोचत असल्याने पाण्याचा वहनातील अपव्यय कमी होतो. पिकांची योग्य वाढ होण्यास मदत मिळते. सूक्ष्म तुषार (मायक्रोस्प्रिंकलर) आणि सूक्ष्मधार या पद्धती ठिबक सिंचनाला पर्याय म्हणून अवलंबता येतात.
पाण्याचा पुनर्वापर : पावसाळ्यात पाण्याच्या शेततळी, बांधबंदिस्ती आणि जलसंधारण प्रकल्प यांद्वारे साठवण करून त्याचा आत्यंतिक गरजेच्या वेळी पुनर्वापर किंवा संरक्षित सिंचनासाठी वापर शक्य आहे.
मृद्संधारण आणि सेंद्रिय खतांचा वापर
मातीची गुणवत्ता आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी मृद्संधारण आणि सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे. सेंद्रिय खत आणि हिरवळीची खत पिकांचा वापर करून मातीची पोषणतत्त्वे जपली जातात, त्यामुळे पिकांची मुळांची चांगली वाढ होते. पिकांचे संरक्षण होते.
आच्छादन तंत्रज्ञान
सेंद्रिय अवशेषांचा वापर करून किंवा प्लॅस्टिक मल्चिंगद्वारे माती आच्छादित करावी. त्यामुळे मुळांच्या परिसरातील माती थंड राहून ओलावा टिकण्यास मदते. उष्णतेचा परिणाम कमी होतो.
हवामानावर आधारित कृषी सल्ल्यांचा अवलंब
भारत हवामान विभाग आणि राज्य कृषी विद्यापीठांकडून हवामान आधारीत सल्ला नियमित काळाने दिला जातो. पुढील पाच दिवसांचा अंदाज घेत दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास शेती कामांचे योग्य नियोजन करता येते. त्याने संभाव्य धोके आधीच लक्षात येऊ शकतात.
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन (IPM)
उष्णतेच्या लाटेच्या काळात किडींचा प्रादुर्भाव वाढतो, म्हणून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा. आर्द्रता आणि ओलावा याचा विचार करून आवश्यक तिथे जैविक नियंत्रण पद्धती वापराव्यात. त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी करता येतो. पर्यावरणावरील विपरीत परिणाम टाळता येतात. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी राखण्यासाठी पीक फेरपालट महत्त्वाचा असतो.
जलसंधारण आणि गटशेती
ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येत पाणलोट व जलसंधारण संदर्भात प्रकल्पात अवश्य भाग घ्यावा. गटशेतीतून एकत्रित नियोजनावर भरा दिल्यास उष्णतेच्या लाटेपासून बचाव करता येतो.
राज्य व जिल्हास्तरीय माहिती
राज्य स्तरीय हवामान केंद्रे आणि भारतीय हवामान विभागाची प्रादेशिक हवामान केंद्रे जिल्हानिहाय उष्णतेच्या लाटांविषयी सूचना जाहीर करतात. त्यांच्याकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या प्रभाव-आधारित उष्णतेच्या लाटांच्या इशाऱ्यांचे रंग कोड व त्यावर आधारित सूचनांचे विवरण पुढील तक्त्यात दिले आहे.
उन्हाळ्यातील तीव्र हवामानाचे मुख्य पिकांवरील परिणाम
ज्वारी (मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र)
ज्वारी उष्णतेसाठी संवेदनशील पीक असून, उष्णतेच्या लाटेमुळे फुलांची गळ होते आणि धान्य भरत नाही.
वाढलेल्या तापमानामुळे आवश्यक आर्द्रतेचा तुटवडा निर्माण होतो, परिणामी उत्पादन घटते.
उष्णतेमुळे धान्याची परिपक्वता विलंबित होऊन उत्पादन कमी होते.
कापूस (विदर्भ आणि मराठवाडा)
उष्णतेमुळे बोंड गळ होण्याचे प्रमाण वाढते.
बोंड अळी आणि पांढऱ्या माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
उच्च तापमानामुळे कापसाच्या गुणवत्तेत घट होते आणि उत्पादन कमी होते.
सोयाबीन (विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश)
फुलगळ होण्याची शक्यता वाढते, परिणामी शेंगा कमी धरण्याची समस्या निर्माण होते.
अवेळी पाऊस झाल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे उत्पादन घटते.
दीर्घकाळ उष्णतेमुळे सोयाबीनच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो.
तूर, हरभरा, मूग, उडीद (मराठवाडा आणि खानदेश)
तीव्र उन्हाळ्यामुळे झाडांची फुलगळ मोठ्या प्रमाणात होते.
उष्णतेच्या लाटेमुळे पाण्याची कमतरता निर्माण होते, परिणामी झाडांची वाढ खुंटते.
काही भागांमध्ये गारपिटीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
ऊस (पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा)
वाढलेल्या तापमानामुळे ऊसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
पाणीटंचाईमुळे साखरेचे प्रमाण घटते, परिणामी उसाचे गाळपाचे प्रमाण कमी होते.
दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास उसाच्या गुणवत्तेत घट होते.
भाजीपाला पिकांवरील परिणाम
भाजीपाला पिके उष्णतेसाठी अत्यंत संवेदनशील असतात.
उष्णतेमुळे पाने जळतात, पिकाची वाढ मंदावते आणि उत्पादन घटते.
पाणीटंचाईमुळे टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी यांसारख्या पिकांवर मोठा परिणाम होतो.
उष्णतेमुळे पानांवर काळे डाग पडतात आणि फुलगळ होते.
फळबागांवरील परिणाम
अ) आंबा
उष्णतेच्या लाटेमुळे फुलगळ वाढते, परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
तापमान जास्त असल्यास फळांचा आकार आणि गुणवत्ता कमी होते.
ब) संत्रा
तापमानवाढीमुळे फुलगळ आणि उत्पादन घट होते.
पाणीटंचाईमुळे संत्र्यांचे आकार लहान राहतात.
क) केळी
उच्च तापमानामुळे पाण्याचा ताण वाढतो, परिणामी केळीच्या झाडांची वाढ मंदावते.
फळांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा घटतो.
ड) द्राक्ष
उष्णतेच्या लाटेमुळे द्राक्षाच्या वेलींची वाढ मंदावते.
उच्च तापमानामुळे फळांची गळ होते, परिणामी उत्पादन घटते.
जास्त तापमानामुळे शर्करेचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे फळांचा स्वाद प्रभावित होतो.
महाराष्ट्रातील वाढत्या उष्णतेमुळे विविध पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांनी जलसंधारण, पीक संरक्षण, उष्णतारोधक तंत्रज्ञान आणि हवामान-ताण व्यवस्थापनाच्या उपाययोजना अवलंबणे गरजेचे आहे.
- डॉ. संतोष यादव, ९४०४७४३३२०
(कृषी हवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.