
Chh. Sambhajinagar News : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात ३१ मार्च २०२४ पर्यंत वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३ लाख २३ हजार ५५५ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे ५७१ कोटी ६३ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी या ग्राहकांची पडताळणी करण्याची मोहीम सुरू असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, थकबाकी वसुलीसाठी या ग्राहकांची पडताळणी करण्याची मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत एखाद्या जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने थकविलेल्या वीजबिलाची थकबाकी नंतरच्या नवीन मालक किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, ज्या कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित (पी. डी.) ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी आहे, त्यांना महावितरणकडून अभय योजनेत व्याज व दंड माफ करून वीजबिल भरण्याची संधी देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या योजनेचा लाभ घेऊन संबंधितांनी बिले भरावीत आणि पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
एखाद्या जागेचे वीजबिल थकित असेल आणि जागेचा विक्री व्यवहार झाला असेल, तर नवीन मालक वीजजोडणीसाठी नव्याने अर्ज करतात. त्यामुळे त्या जागेवरील पूर्वीच्या बिलाची थकबाकी प्रलंबित राहून वीजवितरण कंपनीचे नुकसान होते. त्यामुळे जागेच्या वीजबिलाची थकबाकी वसूल केल्याशिवाय नवीन वीजजोडणी देण्यास नकार देण्याचे अधिकार वीजवितरण कंपनीला आहेत.
त्याविरोधात वीजबिलाची थकबाकी असलेली जागा खरेदी केलेल्या नव्या मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. महाराष्ट्रासह काही राज्यांतून अशा प्रकारची १९ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना, जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसूली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळेच जुनी जागा, फ्लॅट, घर घेताना सावध राहा. त्याचे वीजबिल तपासा. कारण, पूर्वीच्या मालकाने थकविलेले वीजबिल नंतरच्या नवीन मालकाकडून वसूल करण्याचे आदेश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.