
Animal Husbandry: आतापर्यंत या योजनेच्या माध्यामातून १३६० फार्म वेगवेगळ्या राज्यांत स्थापन झाले आहेत. त्यातील ४९९ कर्नाटकात, २५६ तेलंगणात, १९७ मध्य प्रदेशमध्ये आणि ८३ महाराष्ट्रात आहेत. परंतु अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून संबंधित क्षेत्राची सर्वांगीण प्रगती किती होते आणि आनुवंशिक सुधारणेसारखी उत्कृष्ट पण कष्टसाध्य उद्दिष्टे कितपत साध्य होतात, त्याची माहिती अजून तरी उपलब्ध नाही.
उस्मानाबादी शेळी संशोधन व विकास प्रकल्प
निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या (नारी) पशुसंवर्धन विभागातर्फे उस्मानाबादी शेळीचे मटण व दुधाच्या उत्पादकता वाढीसाठी एक संशोधन व विकास प्रकल्प गेली पंधरा वर्षे सुरू आहे. त्याला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मार्गदर्शन आणि अर्थसाह्य आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमधील प्रत्येकी दोन-तीन गावांमधील शेळ्यांचे दूध, त्यांच्या करडांची वजने आणि इतर नोंदी घेऊन जुळे जन्मलेले उत्कृष्ट वजनवाढीचे बोकड निवडून ते विकत घेतले जातात,
ते जोपासून परत प्रकल्पातील गावांमध्ये पैदाशीसाठी पाठवले जातात. आंतरप्रजनन टाळण्यासाठी दर वर्षी गावातील बोकड बदलले जातात. असे शंभरपेक्षा जास्त निवडक उस्मानाबादी बोकड पैदाशीसाठी पाठविण्यात आले आहेत. निवडक ७६ बोकडांचे वीर्य गोठवून आतापर्यंत साठ हजारांच्या आसपास रेतमात्रा कर्नाटक व महाराष्ट्र सरकार, माणदेशी फाउंडेशन व खासगी कृत्रिम रेतन व्यावसायिक व तंत्रज्ञांना पुरवण्यात आले आहेत. ‘नारी’ संस्थेमध्ये प्रशिक्षित ३२ शेळी सख्या माणदेशी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील एकूण २५० गावांत ‘शेळीपालकाच्या दारात कृत्रिम रेतन’ करून सुधारित बोकडांच्या उत्पादनक्षमतेचा लाभ त्यांना मिळवून देत आहेत.
अखिल भारतीय प्रकल्पातील अडथळे
जातिवंत बोकड निवडून पुरवण्याचा अखिल भारतीय प्रकल्प केरळातील मलबारीपासून उत्तराखंडातील हिमालयन शेळीपर्यंत आणि अंदमानातील शेळीपासून लडाखमधील चांगथांगी शेळीपर्यंत भारतातील १९ शेळ्यांच्या जातींमध्ये कार्यरत आहे. परंतु कृत्रिम रेतन सुविधा फार कमी ठिकाणी पुरवली जाते.
या प्रकल्पाची संकल्पना शास्त्रीयदृष्ट्या अचूक व महत्त्वाची आहे. परंतु तुटपुंजे व अनिश्चित अर्थसाह्य, भारंभार माहिती गोळा करणे, त्याच्या शास्त्रीय विश्लेषणावर अवास्तव भर, दरवर्षी भरपूर वजन वाढ, दूध वाढ ‘दाखविण्याचा’ दबाव आणि त्यामुळे काही वेळा काही केंद्रांकडून दिली जाणारी चुकीची आकडेवारी, गाव पातळीवर शेळीपालकांच्या संस्थात्मक उभारणीला दिलेले कमी महत्त्व, त्यासाठी न दिले जाणारे अर्थसाह्य, वेगवेगळ्या भागामधील उच्च उत्पादनक्षमतेच्या शेळ्या शोधायला दिले जाणारे अपुरे महत्त्व इत्यादी कारणांमुळे या प्रकल्पांचा आवाका मर्यादित राहिला आहे.
त्यामधून अपेक्षित सुधारणा दिसून येत नाही. परंतु प्रकल्पामुळे उस्मानाबादी शेळीची उच्च उत्पादनक्षमता सिद्ध झाली. आकार, वजन, दूध, व्यायल्यानंतर पुन्हा लवकर फळण्याचा गुणधर्म, होणाऱ्या करडांची संख्या, करडांचे वजन या सर्व उत्पादन क्षमतेच्या निकषांमध्ये उस्मानाबादी शेळी श्रेष्ठ आहे.
बिहारमधील ‘मेषा’ प्रकल्पाचे यश
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात आगा खान प्रतिष्ठान, दिल्ली यांच्या व्यवस्थापनाखाली राबवल्या जाणाऱ्या ‘सामूहिक शेळी पैदास प्रकल्प’ दिशादर्शक आहे. ‘मेषा’ हा प्रकल्प ‘गेट्स फाउंडेशन’च्या अर्थसाह्याने २०१६ मध्ये सुरू करण्यात आला. ‘शेळी उत्पादन व उत्पादकता वाढीतून महिला सक्षमीकरण’ हे प्रकल्पाचे उद्दिष्ट होते.
अठराविश्वे दारिद्र्य, रोजगाराच्या संधींची अनुपलब्धता, पुरामुळे दर वर्षी तीन-चार महिने होणारे विस्थापन अशा परिस्थितीत शेळीपालनातून थोडे उत्पन्न कमावणाऱ्या या महिला होत्या. मुजफ्फरपूर जिल्ह्याच्या १६ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांमधील ३०० गावांमधील सत्तर हजार महिला शेळी पालकांपर्यंत पोहोचण्याचे प्रकल्पाचे ध्येय होते.
बचत गटांमध्ये संघटित महिलांना या प्रकल्पाने स्थानिक ब्लॅक बेंगाल शेळी सुधारणेसाठी मदत केली. यामध्ये शेळ्यांचा आहार, लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना प्रशिक्षित पशूसखींच्या माध्यमातून सशुल्क सेवा म्हणून उपलब्ध करणे, कमी खर्चात शेळी निवाराघरे, शेळ्या, करडांची संघटित विक्री, महिला संघटनांची तळागाळातून उभारणी आणि शेळ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी त्यांची शास्त्रोक्त पैदास या सर्व बाबींचा समावेश होता. येथील पशुसखींबद्दल बिल गेट्स यांनी बनवून घेतलेला व्हिडिओ यू-ट्यूबवर उपलब्ध आहे. (https://www.youtube.com/watch?v=TQ९RZfjitSQ).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.