River Revival : असे झाले होळणा नदीचे पुनरुज्जीवन

केज आणि अंबाजोगाई या तालुक्यातून वाहणारी होळणा नदी ही मांजरा नदीची उपनदी असून, तिचे उगमस्थान मुलेगाव येथे असून, ती मांजरा नदीला देवला येथे मिळते. छोट्या नदीची यशोगाथा पाहणे खूप महत्त्वपूर्ण ठरते.
Holna River
Holna River Agrowon

डॉ. सुमंत पांडे

केज आणि अंबाजोगाई या तालुक्यातून वाहणारी होळणा नदी (Holna River) ही मांजरा नदीची (Manjra River) उपनदी असून, तिचे उगमस्थान मुलेगाव येथे असून, ती मांजरा नदीला देवला येथे मिळते. छोट्या नदीची यशोगाथा पाहणे खूप महत्त्वपूर्ण ठरते. नदीची लांबी (River Revival) आणि त्या काठी वसलेल्या लोकसंख्या त्यांचे जीवनमान यांच्यात नाते असते. या छोट्या नद्या अनेक मुखातून येऊन मोठ्या नद्या बनतात आणि ही मोठी नदी प्रवाहित होत अनेकांचे जीवन समृद्ध करते. वस्तुतः गेल्या काही वर्षांपासून या छोट्या नद्या आणि ओढे हे सातत्याने दुर्लक्षित झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे आपल्या नद्या क्षीण झालेल्या दिसतात.

Holna River
River Pollution : आता प्रदूषणविरहित नद्यांसाठी ‘रोडमॅप’

नद्या संपन्न करणारे ओढे

होळणा नदीसाठी महिला स्वयंसाह्यता गट आणि महिलांच्या प्रश्नांसाठी बैठक होती. यामध्ये होळणा नदी आणि तिच्या परिसरातील पाणीटंचाईबाबत गांभीर्याने चर्चा झाली. या चर्चेमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत्या. ९ ऑगस्ट २०१५ रोजी पहिली बैठक संपन्न झाली. त्यानंतर १८, १९ ऑगस्ट आणि २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. यातून नदीचे पुनरुज्जीवन आणि मूळ स्वरूप देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २०१५ च्या पूर्वी सुमारे पाच ते आठ वर्षांपासून होळणा नदी कोरडीच होती तथापि या नदीला काम करण्यासाठी सर्वांनी निश्चय केला आणि काम सुरू केले.

अभ्यासासाठी एक गट तयार करण्यात आला. गटाने नदीचे प्रभाव क्षेत्र आणि दोन्ही तटांवरील प्रत्येक गावातून माहिती घेतली. प्रत्येक ठिकाणची नदीची खोली, रुंदी ही पाहण्यात आली. तिच्या परिसरात असणाऱ्या विहिरींची नोंद घेण्यात आली. २८ किलोमीटर नदीच्या परिसरात सुमारे १७५ विहिरी आहेत. १९७२ च्या दुष्काळात आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये अनेक पाझर तलाव आणि इतर जलसंधारणाची कामे घेण्यात आली आहेत.

Holna River
River Conservation : असा घडला साखरपा पॅटर्न

नदीच्या उगम क्षेत्रामध्ये म्हणजेच मुलेगाव आणि होळ या गावांमध्ये दोन पाझर तलाव आहेत; तथापि ते दोन्ही तलावात गाळाने भरल्यामुळे त्यांची साठवण क्षमता आणि पाझरक्षमता या दोन्हींवर परिणाम झाला. अभ्यासामध्ये नदीच्या तटांवरील माहिती तेथील एकूण भौगोलिक क्षेत्रफळ, जमिनीचे क्षेत्रफळ, सिंचनाखाली क्षेत्र इत्यादींची माहिती घेण्यात आली. या नदीच्या प्रभावक्षेत्रात सुमारे ११ हजार ६९७ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी दहा हजार ७७४ हेक्टर एवढे लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे १,८६९ हेक्टर केवळ सिंचनाखाली क्षेत्र आहे. या बाबींवरून आपल्याला एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे दहा ते बारा टक्के क्षेत्र सिंचनाखाली असल्याचे जाणवते.

होळणा नदीस मिळणारे ओढे

अभ्यासामध्ये होळणा नदीच्या दोन्ही तटांवरील बारा गावांमधून ३८ ओढे वहातात. या ३८ ओढ्यांची लांबी सुमारे ५८ किलोमीटर अशी येते. म्हणजे सरासरी प्रत्येक ओढा सुमारे एक किलोमीटर ते दोन किलोमीटर एवढ्या लांबीचे आहेत. यावरून सिद्ध होते, की नदीची प्रवाह क्षमता पाणीवहन क्षमता ही तिला मिळणाऱ्या छोट्या नद्या आणि त्या छोट्या नदीला मिळणारे ओढे यावर अवलंबून असते.

Holna River
River In Maharashtra : नदीच्या वाहत राहण्याची गोष्ट

ही बाब बहुतांशी वेळेस दुर्लक्षित होते. प्रत्येक नदीच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे आणि नाले यांचा सूक्ष्मपणे अभ्यास होणे गरजेचे आहे. तेथील ज्येष्ठ नागरिकांना नदी आणि ओढ्यांची माहिती असते. ही माहिती तांत्रिक माहितीशी तपासून पाहिली असता योग्य मार्ग काढता येतो. त्याच्या उपचाराची आणि कृतीची दिशा निश्चित ठरवता येऊ शकते.

अभ्यासामध्ये बारा गावांमधील लोकसंख्या तसेच पशुधनाची संख्या नोंदविण्यात आली. सुमारे २६,१९४ एवढी लोकसंख्या या परिसरात आहे. या प्राथमिक अभ्यासानंतर एकूण कामाची व्याप्ती आणि उपचाराची स्वरूप ठरवण्यात आले. सुमारे ६० किलोमीटर वर काम करताना तेथील भूगर्भाचा विचार करण्यात आला. यावर उपचार ठरविण्यात आले.

ओढ्याचे पात्र खोल आणि रुंद करत असताना सुमारे ५० मीटर अंतरावर प्रत्येकी एक खोल खंदक करण्यात आला. त्यामध्ये पाणी साठत असे. याचा सर्वसाधारण आकार पाच मीटर लांबी आणि तीन मीटर रुंद, दोन मीटर खोल असा होता. प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्याची लांबी, रुंदी आणि खोली ठरविण्यात आली. प्रत्येक खड्ड्यांमध्ये सुमारे तीस हजार लिटर पाणी साठत असे.

मध्यम स्वरूपाचा पाऊस जरी झाला तरी हे खंदक पाच वेळा तरी भरतील असे गृहीत धरून क्षेत्रात सुमारे बाराशे खंदक करण्यात आले. यामुळे सुमारे अठरा कोटी लिटर पाणी उपलब्ध होणार होते. या पद्धतीच्या उपचारांमध्ये पाण्याची साठवणूक क्षमता वाढेल आणि गाळ आला तरी त्याच ठिकाणी राहील. हा गाळ शेतकऱ्याला काढणे सहज शक्य होऊ शकेल आणि पर्यायाने भूपृष्टजलाचे भूजलात रूपांतर होत असल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.

होळणा नदीच्या पात्रात सुमारे सहा कोल्हापुरी बंधारे आणि सिमेंट नाला बांध असे उपचार करण्यात आले होते. या प्रत्येक बंधाऱ्यात आणि सिमेंट नाला बांधामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याची साठवण आणि त्याचा आकार कमी झाला होता. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा त्या क्षेत्रातील अभ्यासानुसार उभारण्यात येतो. तो पूर्ण बांधून झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात येते. ज्या ठिकाणी असे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत.

अशा ठिकाणी पावसाळ्याच्या पूर्वी काढण्यात आलेली दारे पुन्हा लावण्यासाठी आणि काढण्यासाठी सातत्य आढळत नाही. परिणामी, गाळ साचून राहतो किंवा पाणी वाहून जाते. सिमेंट नाला बांधाची स्थिती देखील बिकट असते. काही ठिकाणी सांडव्याची दुरवस्था आहे. बऱ्याच ठिकाणी या सिमेंट नालबांधामध्ये गाळ साचलेला आहे.

अभ्यासामुळे उपचाराची दिशा स्पष्ट झाली आणि लोकसहभागाने हे काम हाती घेण्यात आले. हा सर्व अभ्यास आणि सर्वेक्षण मानवलोक या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. मानवलोक संस्थेचे द्वारकादास लोहिया यांनी या कामात पुढाकार घेतला होता. लोकांना या गोष्टी सातत्याने पटवून देऊन नदीचे पुनरुज्जीवन करण्याबाबत लोकांना प्रवृत्त करण्यात आले.

अशी आहे होळणा नदी

केज आणि अंबाजोगाई यांच्या सीमारेषेवर असलेल्या बारा गावांच्या परिसरातून होळणा नदी वाहते. या नदीचा उगम केज तालुक्यातील मुलेगाव परिसरातील देवीच्या मंदिरापासून झाला आहे. ही नदी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा या गावी मांजरा नदीला मिळते. या नदीची लांबी सुमारे २८ किलोमीटर आणि सरासरी रुंदी ही ३१ मीटर आहे. अनेक ठिकाणी तिची रुंदी भिन्न आहे. तथापि सरासरी रुंदी सुमारे ३१ मीटर आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com