Indian Politics : भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४च्या लोकसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला होता. राजीव गांधी यांच्यानंतर प्रथमच देशात एखाद्या पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले होते. विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षाला ५० जागा देखील मिळाल्या नव्हत्या. निवडणुकीच्या आधी अनेक मोठे नेते भाजप सोबत गेले.
निकालानंतर भाजप आणि मोदींच्या निर्णयांची घोडदौड सुरूच होती. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात चक्क एका खासदाराने बंड केले. हा खासदार अन्य कोणी नाही तर भाजपचा होता. राष्ट्रीय पातळीवर मोदींविरोधात, त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठवण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे गेले. मोदींच्या विरोधात थेट टीका करून लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे अन्य कोणी नाही तर महाराष्ट्रातील आक्रमक नेते नाना पटोले होते.
नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या तिकिटावर विजय मिळून नाना लोकसभेवर गेले. मात्र भाजपची कार्यपद्धती ही शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत शेतकरी आणि ओबीसींचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाताने इशारा करत त्यांना खाली बसण्यास भाग पाडले होते. मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, असा आरोप करून नाना पटोलेंनी त्यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे टीकास्त्र सोडले.
मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात अपयशी ठरले आहे. मी लोकसभेत खुर्च्या उबवायला आलो नाही. जनतेची कामे होत नसतील तर पदावर राहण्यात काय अर्थ आहे? असा सवाल नानांनी उपस्थित केला होता. सरकार ऐकत नाही तर सोबत राहून काम करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा जनतेत जाऊन काम केले पाहिजे आणि म्हणून आपण राजीनामा दिल्याचे नानांनी स्पष्ट केले. सरकार आपले आहे म्हणून त्याच्या चुकीच्या निर्णयांचे मी कधीच समर्थन करणार नाही. मी जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो असून कोण्या नेत्याच्या उपकाराने नाही, असा टोला नानांनी मोदींचे नाव न घेता मारला होता.
भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देताना केला होता. लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपला कायमचा रामराम केल्यानंतर नानांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
नानांनी राजीनामा दिल्यानंतर आठ दिवसांनी राहुल गांधी यांनी त्यांना फोन करुन भेटण्यास बोलावले. या भेटीत राहुल गांधी आणि नाना यांच्यात विस्तृत चर्चा झाली. भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या हुकूमशाही पद्धतीबद्दल नानांनी सांगितले. राहुल गांधींनी त्यांना विचारले ‘ये कैसे किया आपने?’ कारण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यानंतर त्याविरोधात बंड करून भाजपची खासदारकी त्यागणारे नाना पटोले हे पहिले खासदार होते. राहुल गांधींच्या या प्रश्नावर पटोले स्पष्टच म्हणाले, “या लोकांनी नोटबंदी आणली, जीएसटी आणले, अजून ओबीसी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. या मुद्द्यांवर माझे मोदींसोबत भांडण झाले. मला खुर्चीची हौस नाही, त्यामुळे मी राजीनामा दिला.”
नाना पटोलेंच्या या उत्तरावर राहुल गांधींनी त्यांना आमच्यासोबत सामील व्हा. राज्यसभा किंवा विधानसभेचे सदस्य करू असे सांगितले. त्यावर नाना म्हणाले, “मला पद नको मी कुटुंबाचा सदस्य म्हणून काम करेन. माझी लढाई खुर्चीसाठी नाही.”
शेतकरी, ओबीसी तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी, ओबीसींसाठी मंत्रालय, मुलांची शिष्यवृत्ती अशा गोष्टींसाठी नानांना सरकारमधून प्रचंड विरोध झाल्याचा अनुभव आला. यामुळेच भाजपच्या २८२ खासदारांपैकी मोदींच्या विरोधात कोणी आवाज उठवला नाही तो नाना पटोलेंनी उठवला. नानांनी मोदींना चॅलेंज केले. काँग्रेस प्रवेशानंतर नाना पटोले आणि काँग्रेस तसेच राहुल गांधी यांचे नाते अधिक घट्ट झाले. काँग्रेस नेतृत्वाने २०१८ साली त्यांची किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर २०२१ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष झाले.
आज भाजपविरोधातील देशातील आघाडीच्या नेत्यांमध्ये नाना पटोलेंचा समावेश होतो. केंद्रात मोदी आणि राज्यातील सरकारविरोधात त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळेच राज्यात काँग्रेस पक्षाचा ओबीसी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता अशी नाना पटोले यांची ओळख आहे. त्यांनी मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धती, चुकीच्या निर्णयांवर घेतलेली विद्रोही भूमिका यामुळेच राहुल गांधी नाना पटोलांचा उल्लेख ‘महाराष्ट्र काँग्रेसचा लढवय्या व महाराष्ट्राचा मास लीडर’ असा करतात.
Facebook link Nana Patole
https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL
Instagram link Nana Patole
https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==
Twitter link Nana Patole
https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09
YouTube link Nana Patole
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.