Pune News : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून १५ ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५४ तक्रारींपैकी ९९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे. तर, तथ्य न आढळलेल्या उर्वरित ५७ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती तक्रार निवारण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वित आहे.
सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करू शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे.
अशा प्रकारे १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ९९७ तक्रारींवर कारवाई, तर उर्वरित ५७ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या. यापैकी ९४५ तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत कार्यवाही झाली असून त्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाइन करता येते.
या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आणि १८००२३३३३७२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी व कंसात कारवाई झालेल्या तक्रारी
आंबेगाव विधानसभा-२६ (२५), बारामती-३३ (२८), भोर-५ (२), भोसरी-७६ (७३), चिंचवड-१८ (१७), दौंड-१० (८), हडपसर-४९ (४५), इंदापूर-३८ (३७), जुन्नर-३४ (३३), कसबापेठ-१६० (१५२), खडकवासला-२१ (१७), खेड आळंदी-३ (१), कोथरूड-६ (४), मावळ-१२ (११), पर्वती-१२५ (१२५), पिंपरी-१३ (११), पुणे कॅन्टोन्मेंट-५८ (५६), पुरंदर-३ (१), शिरूर-२२ (९), शिवाजीनगर-४० (४०) व वडगाव शेरी - ३०२ (३०२)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.