Relationship in Life : नातीगोती आणि गुंता

Relationship : आज आपण एका जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपल्या आयुष्यातली नाती – कुटुंबातली, उद्योगातली आणि सामाजिक नाती.
Relationship
RelationshipAgrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Human Feelings of Relationship : मागील आठवड्यात आपण उन्नत भावना पेरायच्या आणि जोपासायाच्या कशा, या भावनांचा सराव कसा करायचा हे जाणून घेतलं. आज आपण एका जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपल्या आयुष्यातली नाती – कुटुंबातली, उद्योगातली आणि सामाजिक नाती.

आदिम काळापासून माणसाच्या मनात दोन जन्मजात प्रेरणा अस्तित्वात होत्या. एक होती स्वायत्ततेची, जी ‘मी’ किंवा ‘अहम्’शी निगडीत होती, पण त्याच वेळेस हे भान होतं की मला इतरांबरोबर जोडूनही घ्यावे लागेल. ही दुसरी प्रेरणा जोडणारी होती. म्हणजेच कधी एकटं, स्वतंत्र असावं असं वाटणं तर कधी माणसांच्या गोतावळ्यात असावं असं वाटणं. थोडक्यात, एका बाजूला ‘मी’, तर दुसऱ्या बाजूला ‘आम्ही’ होतं. या दोघांची सांगड घालताना नाती निर्माण झाली.

एखाद्या रोपाला त्याची मुळं म्हणजेच जारवा सगळी रसद पुरवत असतात. व्यक्तीसाठी, त्याच्या भोवतालची म्हणजे समाजातली, कुटुंबातली सगळी नातीगोती, हा समूह जो त्याच्या पाठीशी उभा असतो, तीच पाळंमुळं. ही नाती बनतात कशी आणि ती कशी जपायची, त्यांचं कसं संवर्धन करायचं, ते जाणून घेऊया.

दोन माणसं भेटतात, जुजबी ओळख होते. त्या ओळखीतून गुणाचं, रूपाचं, बुद्धीचं, असं कसलंही एक आकर्षण निर्माण होतं. त्यातून स्नेहबंध निर्माण होतात, संवाद सुरू होतो. त्या व्यक्तींना विचार, भावना, वर्तन, ध्येय यातली काही समानता सापडते. पुढे सहवास घडतो, साहचर्य वाढतं आणि टप्प्याटप्प्याने नातं निर्माण होतं.

मात्र नात्यातल्या प्रेमामध्ये ज्या वेळेस सत्ता येते, हक्क येतो त्या वेळेस स्वीकाराची भावना कमी होते. नातं टिकायचं असेल तर स्वीकाराची भावना खूप आवश्यक! एकमेकांच्या गुणदोषांचा स्वीकार असतो अशीच नाती टिकतात.

म्हणजे बघा, नात्यामधील दोन्ही व्यक्ती आग्रही/ निर्धारी ट्रॅकवर असतील तर ते नातं फळतं, फुलतं. दोन्ही व्यक्ती आक्रमक असतील तर विसंवादाला सुरुवात होते. एक व्यक्ती आक्रमक असेल आणि दुसरी तटस्थ असेल तर असंवाद असतो. नात्यामध्ये कधी हक्क निर्माण होतो (मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं आहे तर तू माझ्यावर निदान एवढं तरी प्रेम करायलाच हवं).

कधी सत्ता निर्माण होते तर कधी हारजीत घुसते. काही वेळा नात्यांमधील एका किंवा दोन्ही व्यक्तींमधील आग्रही आत्मस्वीकाराची शक्ती कमी होत जाते. म्हणजेच पॅटर्न ३ वर न राहता, इतर पॅटर्न वापरून नात्यात संभाषण किंवा अपेक्षा / हट्ट यायला लागतात, तसातसा नात्यातला गुंता वाढत जातो. कधी दोन व्यक्तींच्या जीवनशैलीत असणाऱ्या तफावतीमुळे ताठरपणा वाढतो. अशा वेळी मग नात्यात विसंवाद, असंवाद निर्माण होतो.

Relationship
Human Psychology : भावनाओंको समझो

नात्यांमधील गुंता नाजूकपणे हाताळावा लागतो. तो सोडविण्यासाठी घाई करून चालत नाही. दोन्ही व्यक्तींना विचार करावा लागतो की या नात्याचं माझ्या जीवनामधलं नेमकं भावनिक महत्त्व काय? त्यासाठी एक परिणामकारक मॉडेल वापरता येईल, त्याचं नाव आहे भावनिक कक्षा.

या मॉडेलमध्ये आपण सूर्य आणि आपली नाती म्हणजे आपली सूर्यमाला. सूर्यमालेत जसे सगळे ग्रह त्यांच्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात तसं आपण केंद्रस्थानी आणि बाकी व्यक्ती आपल्या कक्षांमध्ये.

भावनिकदृष्ट्या ज्या व्यक्ती अगदी जवळच्या आहेत त्यांना आपण जवळच्या पहिल्या कक्षेत ठेवू. उदा. कुटुंबातील जवळची माणसे (पती/ पत्नी, मुले, आई – वडील), दुसऱ्या कक्षेत जवळचे मित्र असतील, तिसऱ्या कक्षेत कामावरचे सहकारी तर चौथ्या कक्षेत आजूबाजूची ओळखीची मंडळी असू शकतील.

आपली काही वेळा गडबड अशी होते की जी माणसं आपल्यासाठी त्रासदायक असतात, भावनिकदृष्ट्या खरं तर फार जवळची नसतात, त्यांना लांबच्या कक्षेत ठेवण्याऐवजी आपल्या विचारात आपण त्यांना अगदी जवळच्या कक्षेत आणून बसवतो. आपण (भले नकारात्मक पद्धतीचा असेल) सतत त्यांचाच विचार करत राहतो, त्यांना महत्त्व आणि प्राधान्य देतो.

मनाला त्रास देणारी व्यक्ती भूतकाळातील एखादा जवळचा पण आता दुरावलेला मित्र असू शकेल किंवा दूरची एखादी नात्यातील व्यक्ती किंवा कामाच्या जागी टीममधला सहकारी. त्यांच्याबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल विचार करून आपण त्रस्त, दु:खी किंवा संतप्त होत असू तर हे नातं आपल्या भावनिक कक्षांमध्ये नक्की किती जवळच्या कक्षेत आहे? किती महत्त्वाचे आहे

नात्यांचा गुंता सोडविण्यासाठी भावनिक दृष्टीने या व्यक्तीला मी कोणत्या कक्षेत ठेवायला हवे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भावनिक कक्षा या बदलणाऱ्या असतात. म्हणजेच एखाद्या कालखंडात जवळच्या कक्षेत असणारी एखादी व्यक्ती काही काळानंतर अगदी लांबच्या कक्षेत जाऊ शकते.

त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीच्या कक्षेतील आपले स्थानदेखील असेच कायमस्वरूपी नसते हेही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. नात्यांचा गुंता सोडविण्यासाठी माझ्या ग्रहमालेतला सूर्य मी आहे, तसाच समोरच्या व्यक्तीच्या ग्रहमालेत, ती व्यक्ती स्वत:साठी सूर्य आहे हे लक्षात ठेवायला हवे. तरच आपल्या विचारांमध्ये लवचिकपणा येईल.

Relationship
Human Psychology : भावनांची इमारत

एखादं नातं भावनिक दृष्टीने महत्त्वाचं असावं असं वाटत असेल तर त्या व्यक्तीच्या वर्तनावर दोषारोप करत राहिल्याने गुंता वाढतच राहील. नातं एवढंच महत्त्वाचं असेल तर ते टिकवण्यासाठी, दरवेळी नात्यासाठी समोरच्या व्यक्तीने काय केलं (किंवा केलं नाही) याचा हिशेब न ठेवता मला काय करता येईल असा विचार करणं जास्त श्रेयस्कर ठरेल.

या जवळच्या व्यक्तीच्या वर्तनामुळे प्रसंगी वाईट वाटेल, दु:ख होईल, रागदेखील येईल. मात्र ‘मी बदलायचे असेल तर समोरच्या व्यक्तीने सुद्धा बदल करायला हवा!’ अशी पूर्वअट ठेवून चालणार नाही. स्वत:ला हे विचारावं लागेल की जर हे नातं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, तर ते टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी सगळ्या पातळ्यांवर मी काय करणार आहे?

नात्यांचा गुंता झालेला आहे, समोरची व्यक्ती बदलेल किंवा नाही, मात्र ते माझ्या नियंत्रणात नाही. हे वास्तव स्वीकारून मी माझ्या नियंत्रणात असलेल्या कुठल्या गोष्टी बदलणार आहे, त्याची योग्य दिशा आणि काळ लक्षात ठेवून मला प्रयत्न करायला हवेत.

उदाहरणार्थ, व्यसनमुक्ती केंदातून परतलेल्या व्यक्तीने जर अशी मागणी ठेवली, की इतर कुटुंबीयांनी मधल्या व्यसनाधीनतेच्या काळातील कटू अनुभव विसरून परत आपल्याशी असणारं नातं पूर्वीप्रमाणे निभवावं तर त्याची निराशा होऊ शकते. ते नातं पूर्वपदावर येण्यासाठी त्या व्यक्तीला स्वत:च्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करावं लागतं.

त्याच्यातील बदल वर्तनातून जेव्हा सातत्याने कुटुंबीयांना दिसेल तेव्हाच तो गुंता हळूहळू सुटायला मदत होईल. नात्यात गुंता होतो तेव्हा ते टिकवण्यासाठी लागणारं बळ स्वत:च स्वत:ला द्यावं लागतं. त्यासाठी सहनसिद्धी स्वतःमध्ये आणावी लागते, प्रयत्नांवर विश्वास ठेवावा लागतो, तो गुंता सुटण्यासाठी संयम ठेवावा लागतो.

नातं छान असेल, आलबेल चाललेलं असेल तेव्हाही त्याला बळ द्यावं लागतं. त्यासाठी समोरच्या व्यक्तीचं जग समजून घेणं, आयुष्याच्या त्या टप्प्यावर त्या व्यक्तीची उद्दिष्ट, त्याच्या काळज्या समजून घेणं आवश्यक आहे. एक साधं उदाहरण बघूया. वडिलांचा आवडता खेळ क्रिकेट आहे, पण त्यांच्या किशोरवयीन मुलाचा आवडता खेळ फुटबॉल आहे.

वडील त्याच्या फुटबॉलविषयी आस्था न दाखवता स्वत:च्या क्रिकेटवेडाची शिफारस करत राहिले, स्वत:ची आवड त्याच्यावर लादायला लागले तर गुंता निर्माण होईल! वडिलांनी मुलाचं जग समजून घेताना त्याच्या जगातील फुटबॉलचं महत्त्व जाणलं, त्याचा स्वीकार केला आणि त्यात रस दाखवला, फुटबॉलविषयीचं ज्ञान करून घेऊन त्यांनी मुलासोबत त्या विषयावर संवाद साधला तर त्याचा फायदा त्यांच्या नात्याला होईल.


(लेखक प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ व ‘आयपीएच’चे संस्थापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com