Amravati News : कोरडवाहू पट्ट्यातील मुख्य पीक असलेल्या कापसाचे क्षेत्र यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ हजार हेक्टरने कमी झाले आहे. खुल्या बाजारात अपेक्षित दर व नफाही पदरात येत नसताना सोयाबीनच्याच पेरणीस शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सर्वाधिक ३८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कापूस उत्पादक जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र ३३ टक्के आहे. तर गत हंगामात उचांकी दर मिळवून देणाऱ्या तुरीचे क्षेत्र १६ टक्क्यांच्या आसपास आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या आहेत. सरासरी ६ लाख ८१ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३१ हजार २७६ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असली, तरी गतवर्षीच्या तुलनेत ती दीड हजार हेक्टरने कमीच आहे. तर कापसाचे क्षेत्र ३५ हजार ८०० हेक्टरने कमी झाले आहे. गत हंगामात तुरीला मिळालेल्या उचांकी दराचा परिणाम पेरणीक्षेत्रावर होण्याचा अंदाज होता. मात्र तो फारसा वास्तवात उतरला नसून केवळ चार हजार हेक्टरची भर पेरणी क्षेत्रात पडली आहे. मूग व उडदाचे क्षेत्र संपुष्टात येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी पेरणी क्षेत्र २० हजार ६०० हेक्टरने कमी आहे. यंदाच्या ६ लाख ८१ हजार ७७९ हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ६ लाख ३१ हजार २७६ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. पेरणीचे प्रमाण ९२ टक्के आहे. सोयाबीनची २ लाख ५० हजार ९०७ हेक्टर मध्ये पेरणी झाली असून, सरासरी क्षेत्राच्या ती ३८ टक्के आहे. तर कापसाची पेरणी २ लाख २५ हजार ६५१ (३३ टक्के) व तुरीची पेरणी १ लाख ११ हजार ७ हेक्टरमध्ये झाली आहे. कापसाचे क्षेत्र यंदा ४५ हजार हेक्टरने घसरले आहे.
पीकनिहाय क्षेत्र (हेक्टर)
सोयाबीन २,५०,९०७
तूर १,११,०७२
कापूस २,२५,५६१
मूग ९७१
उडीद ७०२
ज्वारी ५९८४
मका २४,६६८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.