Matheran News : रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये तीन महिन्यांत ५०१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. माथेरान टापू आणि परिसरात सुमारे ७०० हेक्टरवर घनदाट जंगल असल्यामुळे येथे जोरदार पाऊस पडतो. या वर्षीदेखील येथे चांगला पाऊस झाला आहे.
मागील ९४ दिवसांत तब्बल ५०१८ मिलिमीटर पाऊस झाला असून, माथेरानच्या डोंगर पायथ्याशी असलेली तिन्ही धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. माथेरानला दरवर्षी चार महिन्यांत सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो.
या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत २०० मिलिमीटर पाऊस जास्त झाला आहे. २ सप्टेंबर २०२३ मध्ये ४८१५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, तर या वर्षी २ सप्टेंबर २०२४ पर्यंत ५०१८ मिलिमीटर पाऊस बरसला आहे, मात्र या वर्षी सलग पाऊस न पडता सरासरी असा पाऊस झाला.
या वर्षी २४ तासांत ३०० मिलिमीटर पावसाची एक दिवसही नोंद झाली नाही. ४ ऑगस्ट २०२४ या दिवशी २९३ मिलिमीटर पाऊस झाला होता. या वर्षीची ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे, तर मागील वर्षी २४ तासांत दोन वेळा ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला होता. तरीदेखील यंदा मागील वर्षीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चार महिन्यांत पर्यटनात वृद्धी
यंदा पावसाची नोंद मोठ्या प्रमाणात झाली असून पर्यटनात देखील वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यात तीन लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी माथेरानला भेट दिली आहे. सरीवर पडणारा पाऊस अनुभवण्यसाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.
रिमझिम पावसात भिजत धमाल करताना अनेक पर्यटक दिसून आले. शारलोट तलाव, धबधब्यावर पर्यटकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली. यावर्षी जून महिन्यापासून पावसाळी पर्यटन बहरल्याने मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.