Reading Movement : वाचन चळवळ : कृतियुक्त अनुभव

Education in Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आता शाळांमध्ये ‘आनंददायी वाचन चळवळ’ सुरू करण्याचा नव्याने फतवा जारी केलाय.
Reading
ReadingAgrowon

Department of School Education : महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आता शाळांमध्ये ‘आनंददायी वाचन चळवळ’ सुरू करण्याचा नव्याने फतवा जारी केलाय. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून श्रवण-भाषण-वाचन-लेखन या टप्प्यांतूनच शिक्षण पार पाडले जाते आणि हाच टप्पा शाश्‍वत असल्यामुळे तो कायम राहीलच!

‘वाचाल तर वाचाल’ हे वाचनाच्या बाबतीतले सपाटीकरण झालेले सर्वोमुखी वाक्य न वाचन करणारे अनेक जण इतरांना सांगतात. मुळातच स्वतः उत्तम वाचक असलेला वाचक अखंडपणे साधक होऊन वाचन करतो. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आता शाळांमध्ये ‘आनंददायी वाचन चळवळ’ सुरू करण्याचा नव्याने फतवा जारी केलाय.

शाळेला प्रयोगशाळा करताना असे फतवे आभासीपणा करत असतात. कारण शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून श्रवण-भाषण-वाचन-लेखन या टप्प्यांतूनच शिक्षण पार पाडले जाते आणि हाच टप्पा शाश्‍वत असल्यामुळे तो कायम राहीलच. अ पासून लृ पर्यंत आणि क पासून ज्ञ पर्यंत प्रत्येकाने शाळेत दाखल झाल्यानंतर केलेले श्रवण-भाषण-वाचन-लेखन सर्वांना ज्ञात असतेच.

आता नव्याने ॲ-ऑ ही आलेली अक्षर बाराखडीतील अक्षरे ऐकणे-उच्चारणे आणि लिहिणे या क्रमाने शिक्षण होत आहे, होत राहील. असा हा वाचन इतिहास माहीत असताना परत एकदा ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्वे’चा अहवाल सांगतो, की इयत्ता तिसरीमधील ३० आणि पाचवीपर्यंतच्या ४१ टक्के विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नाही, म्हणून शाळांमध्ये ‘आनंददायी वाचन चळवळ’ वाचनाचा ध्यास सातत्याने अबाधित राहण्यासाठी महत्त्वाची आणि परिणामकारक आहे.

प्रामुख्याने भाषा वाचनामध्ये आपण मराठी-हिंदी-इंग्रजी-संस्कृत-पाली-उर्दू या भाषांसोबत सामाजिक शास्त्रे आणि विज्ञानाचे वाचनही मूलभूत मानले पाहिजेच. गणितामध्येही संख्यावाचन आणि उदाहरणे व आकृतिवाचन तोलामोलाचेच आहे. त्यामुळे वाचन हे सर्व विषयांना स्पर्श करणारे आहे.

त्या त्या विषयाच्या अनुषंगाने वाचन होत असते आणि वाचन होणे कालातीत आहे. शिक्षण हे कार्यच बोलीचे आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया द्विध्रुवात्मक आहे. शिक्षकांच्या ‘आडात’ वाचन पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या ‘पोहऱ्यात’ते आले पाहिजे. ‘वाचन करा’ एवढ्या आज्ञेने वाचन कधीही होत नाही.

वाचकाच्या भूमिकेत शिक्षक आणि विद्यार्थी समपातळीवर असतील तरच वाचनप्रक्रिया होते. शिक्षक सुवाचक पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना सुवाचन येण्यासाठी सुवाचक सुलभकाची भूमिका नित्यनेमाने पाळणारे शिक्षक वाचक कृतिशील पाहिजेत.

Reading
Study Movement : अभ्यास चळवळ आणि मंडळं

अक्षरे-शब्द-वाक्ये-उतारे-पाठ-पाठ्यक्रम निर्दोष वाचन केल्यावरच त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन त्यांचे अचूक वाचन होते. अक्षरांना काना पुढे आणि मागेही द्यावा लागतो किंवा (:) हा विसर्ग आहे, तो दुःख, पुनः, प्रातःकाल, अंत:करण अशा अनेक शब्दांना द्यावा लागतो; त्याचे प्रथम वाचन आणि नंतर लेखनसराव करून परत सातत्यपूर्ण वाचन केले, तर वाचनाचा पाया अशा बारीकसारीक पायऱ्यांनी भक्कम होतो.

अनेकदा वाङ्‍मय उच्चार करताना ड. हे ‘ग’ असे उच्चारावे हे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक सांगितले पाहिजे. साध्या शब्दांपासून सुरू झालेला वाचनाचा प्रवास समग्रकविता किंवा धडा वाचताना श्‍वास प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून साध्य झाला पाहिजे. विरामचिन्हांची ओळख पाठ्यपुस्तकात दिलेली असते.

विद्यार्थ्यांना ती गांभीर्यपूर्वक करून दिलीच पाहिजे. शब्दांत आणि वाक्यांत स्वल्पविराम (,), मोठमोठ्या वाक्यांत दिलेला अर्धविराम (;), वाक्य पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारा पूर्णविराम (.), आणि एखादा महत्त्वाचा शब्द किंवा वाक्य लिहिताना दिलेले एकेरी अवतरण चिन्ह (‘...’), एखाद्या लेखकाचा किंवा कवीचा किंवा बोलणाऱ्याचा शब्द-वाक्य आणि ओळ जशीच्या तशी लिहिताना देण्यात येणारे दुहेरी अवतरण चिन्ह (‘‘...’’) याचा वाचन मथितार्थ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगणे अपेक्षित असते. शिक्षक हे सर्व सांगतात. विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारे लिहून घेतात. वारंवार ही कृती करून घेतल्यानंतर त्याचा प्रभाव आणि प्रत्यय येतो. तो अनेकदा दिसला पाहिजे.

दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगरेषा (-), बोलता-बोलता विचारमालिका तुटली, तर अपसारण चिन्ह (_), प्रश्‍नार्थक चिन्ह (?), उद्‍गारवाचक चिन्ह (!) याबाबतींतही शब्द आणि वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन शिक्षकांनी वाचन केल्यास विद्यार्थ्यांना त्यांचे आकलन होते आणि वाचनाचे निकष विद्यार्थी सहजपणे-आपोआप शिकतात.

उदाहरण म्हणून सांगतो, संजय ससाणे हे शिक्षणाधिकारी 'अध्ययन निष्पत्तीवर' फक्त आणि फक्त पायाभूत कार्य करतात. त्यांना एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडीदमई (ता. जि. परभणी-महाराष्ट्र) शाळेतील सहावीचा वर्ग तपासायला विनंती करण्यात आली. भ्रमणध्वनीवर दृश्यप्रणालीने ते वर्ग अध्यापन आणि अध्ययन निरीक्षण करत होते, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी.

शिक्षकाने आग्रह केल्यानंतर त्यांनी शांत आणि संयमाने मराठी विषयाची वर्ग तपासणी केली. ते म्हणाले, "बाळा, तुझे नाव काय आहे?" या प्रश्‍नावर ‘‘सर, नमस्कार... माझे नाव माउली नारायण तरवटे आहे.’’ हे उत्तर आले आणि पुढे जुगलबंदी रंगत गेली. ‘‘विषय कोणता शिकत आहेस? सर, पाठ कसा शिकवत आहेत?’’ विद्यार्थी म्हणाला, ‘‘मराठी विषयाचा धडा-९ वा... वारली चित्रकला, लेखक-गोविंद गारे’’, सरांनी आम्हाला सांगितले, ‘‘या पाठातून आपण वारली चित्रकला निरीक्षण करू आणि आनंद घेऊ.’’ ‘‘बरं, पाठ पायऱ्या सांगशील का?’’ विद्यार्थी बोलला, ‘‘हो सर, आमचे सर धड्याचे स्वतः वाचन करतात आणि त्यांच्यासारखेच आम्ही वाचतो.

महत्त्वाचे शब्द व वाक्ये अधोरेखित करतो. वाक्प्रचार किंवा शब्दसमूह, शब्दांचे अर्थ सर आम्हाला सांगतात आणि वाचन करून घेतात, आम्हीही वाचन करतो, लेखन करतो.’’ शिक्षणाधिकारी निष्णात असल्यामुळे ते अभ्यासूपणाने पण सहज बोलत होते. ‘‘बाळा, या पाठातील ‘नागरी’ या शब्दाचा अर्थ तुला कळला का?’’ विद्यार्थी म्हणाला, ‘‘हो सर, सरांनी सांगितलाय आणि लिहून दिलाय.’’ नागरी-शहरी असा शब्दार्थ विद्यार्थ्याने वाचन आणि लेखन केलेला पाहून ‘साहेब’ जरा बारीक हसले. एकदम समोरच्या बाकावर बसलेला विद्यार्थी ऑनलाइन पाहत त्यांनी त्यालाही बोलते केले. ‘‘बाळा, या पाठातील कोणतेही वाक्ये वाचन कर बरं.’’ घनश्याम कृष्णा लेवडे वाक्ये वाचू लागला, ‘‘हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते (वारली) चित्र रंगविण्यासाठी करतात.’’ हे वाक्य वाचल्यानंतर साहेबांनी श्‍यामूला विचारले, ‘‘या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत आणि कोणती?’’ अत्यंत मस्तपैकी श्याम सांगू लागला,’’ सर या वाक्यात स्वल्पविराम आणि पूर्णविराम ही दोन विरामचिन्हे आहेत.’’

या उत्तराने साहेब मनस्वी आनंदी झाले. लगेच श्रद्धा शिवराज काळे या विद्यार्थिनीला उठवत त्यांनी विचारले, ‘‘या पाठातील प्रश्‍न वाच बरं.’’ ‘‘वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात?’’ तिचा असा प्रश्‍न वाचून झाल्यानंतर ‘‘हा प्रश्‍न कशावरून?’’ असा त्यांनी प्रश्‍न केल्यानंतर ‘‘प्रश्‍नार्थक चिन्हावरून (?)’’, असे उत्तर आल्यावर ते म्हणाले, ‘‘वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिल्यानंतर वाक्य संपते. प्रश्‍नाच्या शेवटी प्रश्‍नार्थक चिन्ह दिल्यावर प्रश्‍न संपतो का?’’ मराठी विषय शिक्षक शांतपणे ही जुगलबंदी अनुभवत होते. श्रद्धा काही क्षण थांबून म्हणाली, ‘‘नाही.’’ ‘‘का?’’ ती विचारपूर्वक बोलली, ‘‘प्रश्‍नाचे उत्तर सांगितल्यावर तो पूर्ण होतो.’’

वाचनाचा हा कृती अनुभव घेतल्यानंतर अध्ययन निष्पत्तींचे काही उत्तरे साहेबांना सापडून गुरुजींना साहेब म्हणाले, ‘‘सर, तुमच्यासारख्या या बेटाचे आपण सार्वत्रिकीकरण करू.’’ महाराष्ट्रातील असे अनेक जण आहेत. तरीही सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी-शिक्षकांनी-विद्यार्थ्यांनी हे सर्व जाणून वाचन कृती करणे इष्ट आहे. शिक्षकांसाठी हे डी. एड.पासून वाचन अनुभव असतात. पण दरवर्षी शाळेत नवनवीन विद्यार्थी येतात आणि वरच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचन सराव क्रमप्राप्त आहेच!

अरुण चव्हाळ, ७७७५८४१४२४
(लेखक रानमेवा शेती-साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com