Gopal Ganesh Agarkar: बुद्धिप्रामाण्यवादी सुधारक

Social Reformer: गोपाळ गणेश आगरकर हे विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करून समाज सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी मोठे काम केले. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे.
Gopal Ganesh Agarkar
Gopal Ganesh AgarkarAgrowon
Published on
Updated on

सौ. सुरेखा बोऱ्हाडे

Maharashtra History: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून समाज प्रबोधन केले. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींना शिक्षण मिळायला पाहिजे, तसेच त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात १४ जुलै १८५६ रोजी झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी कष्ट करून, ठिकठिकाणी कामं करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्‍नागिरी येथे गेले. १८७५ मध्ये ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. डेक्कन कॉलेज येथे एम. ए. करताना त्यांची लोकमान्य टिळकांशी ओळख झाली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. त्यांच्या मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. १ जानेवारी १८८० रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. तेथे ते काम करू लागले.

Gopal Ganesh Agarkar
Muskmelon Farming : खरबुजाचा लोकप्रिय ‘डीपीके’ ब्रॅण्ड

विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले. ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्यही झाले. सोसायटीच्या सदस्यांना कमी पगार असूनही शिक्षण आणि अध्यापनाच्या कार्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करून त्यांनी कार्य केले. आगरकर राष्ट्रवादी वृत्तपत्रात लेख लिहीत आणि संपादित करीत असत. त्यांचे लेख राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या कारणाचे जोरदार समर्थन करत असत आणि ब्रिटिश अत्याचारांना प्रतिकार करत असत.

ते सामाजिक सुधारणांसाठी सक्रिय प्रचारक होते. राजकीय सुधारणांसाठी सामाजिक सुधारणा आवश्यक आहेत असे त्यांना वाटे. आगरकरांनी भौतिकता-ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा केला. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान दिले. परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती दिली.

Gopal Ganesh Agarkar
Agriculture Success Story : कुटुंबाची एकी, फुलवली बहुविध पीक पद्धती

स्त्री-पुरुष समानता

आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार प्रभावीपणे त्यांनी मांडला. ‘स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत’, असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता, की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत, अशा विचारांचे ते होते.

समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ मध्ये त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले. जातिवादाला आव्हान देणारे हे वृत्तपत्र होते. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे, असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला, तो खूप गाजला. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला.अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.

आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे, याला स्त्रियादेखील अपवाद असता कामा नयेत. स्त्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा आग्रह आगरकरांनी केला. डोंगरीच्या जेलमध्ये त्यांनी ‘विकार विलसित’ हे शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीत भाषांतर केले. त्यानंतर डोंगरीच्या तुरुंगांतील अनुभवाचे आमचे डोंगरीतील १०१ दिवस हे पुस्तक त्यांनी लिहिले. अशा या थोर समाजसुधारकांचे वयाच्या अवघ्या एकोणचाळिसाव्या वर्षी १७ जून १८९५ रोजी पुणे येथे निधन झाले.

९१५८७७४२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com