Muskmelon Farming : खरबुजाचा लोकप्रिय ‘डीपीके’ ब्रॅण्ड

Muskmelon Production : आज एकरी १४ टनांची उत्पादकता मिळवत आपल्या उत्तम प्रतीच्या खरबुजाला दरही चांगले मिळवत त्याचा डीपीएके ब्रॅण्ड लोकप्रिय केला आहे. परिसरातील गावांमध्येही या पिकाचा विस्तार होऊ लागला आहे.
Muskmelon Farming
Muskmelon FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण परिसराचा बॅकवॉटर परिसर सुपीक माती आणि पाण्याने जितका समृद्ध आहे, तेवढाच तो प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील तसाच समृद्ध आहे. मालेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कांदा हे मुख्य पीक आहे. याच परिसरातील असलेल्या मथुरपाडे (ता. मालेगाव) येथील दीपक शिंदे यांची सात- आठ एकर शेती आहे.

वडील पोपटराव यांच्याकडून २००४ मध्ये त्यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. कांदा व द्राक्षे हीच त्यांची मुख्य पिके आहेत. या भागातील शेतकरी कांदा पिकाला फेरपालट म्हणून गहू किंवा अन्य पिके निवडतात. मात्र दीपक यांनी व्यावसायिक उत्पन्न देईल, बेवड म्हणून उपयोगात येईल असे फळपीक निवडण्याला प्राधान्य दिले.

‘सोशल मीडिया’द्वारे अभ्यासू शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या नेटवर्किंग केले आहे. त्याचा फायदा दीपक यांना झाला. माचला (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी मित्र दीपक पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना खरबूज पिकाचा पर्याय मिळाला. प्रत्यक्ष पीकपाहणीतून त्यांना कामाची दिशा देता आली.

तंत्र केले अवगत

आता मागील तीन वर्षांपासून खरबूज उत्पादन ते बाजारपेठ हे तंत्र दीपक यांनी अवगत केले आहे. मागील दोन वर्षे दीड एकरांत हे पीक होते. यंदा ते दोन एकरांमध्ये आहे. जमिनीचा पोत, सुपीकता, निरोगी रोपांची निवड, एकात्मिक कीड नियंत्रण, गरजेएवढाच रासायनिक निविष्ठांचा वापर करून सेंद्रिय व जैविक निविष्ठांवर भर व मजबूत विक्री व्यवस्था ही आपल्या खरबूज शेतीची वैशिष्ट्ये असल्याचे दीपक सांगतात.

Muskmelon Farming
Muskmelon Cultivation : खरबुजाची बारमाही शेती साधली उल्लेखनीय प्रगती

दरवर्षी डिसेंबर- जानेवारी काळात दोन टप्प्यात खरबूज लागवड होते. लागवडीपूर्वी प्लॅस्टिक ट्रेमध्ये वाढविलेल्या दर्जेदार रोपांची उपलब्धता करून पुनर्लागवड केली जाते. जमीन भुसभुशीत करून सहा फुटी बेड बनविले जातात. त्यावर निंबोळी पेंड, कुक्कुटखतांचा वापर होतो.

बेडवर माती पसरवून इनलाईन पद्धतीचे चार लिटर प्रति तास क्षमतेचे ठिबक व २५ एमएम जाडीचा पॉलीमल्चिंग पेपर अंथरला जातो. त्यावर झिगझॅग पद्धतीने लागवड होते. लागवडीपासून नवव्या दिवशी रोपांवर ‘क्रॉप कव्हर’ अंथरले जाते. फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर (सुमारे २२ ते २४ दिवसांनंतर) ते काढून घेण्यात येते.

Muskmelon Farming
Muskmelon Farming : एकेकाळचा मजूर झाला खरबूज शेतीतील मास्टर

परागीभवनाला महत्त्व

खरबूज उत्पादन वाढ व गुणवत्तेसाठी फूलअवस्था व परागीभवन प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे दीपक सांगतात. त्यामुळे मधमाश्यांचा अधिवास टिकून राहण्यासाठी रासायनिक फवारण्या टाळून जैविक फवारणीला प्राधान्य देण्यात येते. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा तर फळमाशीसाठी गंध सापळ्यांचा वापर होतो.

जैविक निविष्ठांमध्ये मायकोरायझा, गूळ, ताक, पीएसबी, केएसबी जिवाणूंचा वापर होतो. वाफसा अवस्थेनुसार सिंचन केल्याने मातीतून उद्‍भवणाऱ्या रोगांचे नियंत्रण होते. त्यामुळे मर रोगाला अटकाव होतो. मजूरटंचाईवर मात करण्यासह कार्यक्षमता वाढीसाठी सुधारित व आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर होतो. प्रयोगशील शेतकरी मित्रांच्या चर्चेतून नवे बदल स्वीकारण्यात येतात.

गोड फळांचा डीपीके ब्रॅण्ड

मागील तीन वर्षांपासून खरबुजाचे एकरी १४ ते १५ टनांच्या आसपास उत्पादन दीपक घेतात. तीन वर्षांपासून गिरणा खोऱ्यातील रात्रीची थंडी व दिवसा उष्णता अनुकूल ठरत आहे. गुणवत्ता, एकसारखा तपकिरी- पिवळसर रंग, सहाशे ग्रॅमपासून ते एक किलो व त्यापुढे वजन, रसाळ, गोड चव या वैशिष्ट्यांमुळे दीपक यांच्या खरबुजांना चांगली मागणी आहे.

व्यापारी तुलनेने जास्त दर देऊ करीत आहेत. बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणांचीच निवड केली जाते. डीपीके (दीपक, वडील पोपट व आजोबा किसन) असा फळांचा ब्रॅण्डनेम तयार केला आहे. मालेगाव बाजारात याच नावाने व्यापाऱ्यांत हा ब्रॅण्ड लोकप्रिय झाला आहे. काही प्रमाणात दिल्ली मार्केटलाही फळ पाठवले जाते.

तीन वर्षांतील दर स्थिती (प्रति किलो रुपये)

वर्ष किमान कमाल सरासरी

२०२३ १५ २८ २०

२०२४ २२ ५० ३०

२०२५ १४ ३० १७

कांद्याला फायदेशीर बेवड

दीपक म्हणाले, की योग्य फेरपालट होत नसल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे आमच्या भागात कांद्याची उत्पादकता घसरू लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खरबुजाच्या पिकाचा बेवड म्हणून कांद्याला फायदा होऊ लागला आहे. कांद्याचे उत्पादन पूर्वीपेक्षा वाढले नसले तरी घसरलेले उत्पादन पातळीवर आले आहे. खरबुजाचा पाला जमिनीवर पडतो. त्याचा खत म्हणून उपयोग होतो. कांद्याचे एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. खरबूज केवळ आर्थिकदृष्ट्या किती परवडते एवढे पाहून चालणार नाही. त्याचे अन्य फायदेही होत आहेत. पूर्वी कलिंगड घेऊन पाहिले. पण ते एकाचवेळी काढणीस येऊन सर्व त्या वेळीच मंदी असो वा तेजी, त्याच दरात विकावे लागते. खरबूज मात्र थोड्या थोड्या काळानंतर काढणीस येते. त्यामुळे विक्री व दरांचे योग्य नियोजन करता येते असे दीपक म्हणाले.

खरबुचाचा मित्रपरिवारात विस्तार

दीपक यांनी खरबूज पीक यशस्वी केलेले पाहून चुलत भाऊ दत्तात्रेय सोपान शिंदे, राहुल बाळू शिंदे यांनीही लागवड सुरू केली. आता मथुरपाडे गावासह अजंदे, भुईगव्हाण या दोन गावातील मित्रपरिवारही दीपक यांच्या प्रेरणेतून हे पीक घेऊ लागला आहे. त्यामध्ये दत्तात्रेय शिंदे, भरत कांडेकर, मनोज काकडे, राहुल शिंदे, शेखर आमराळे, शेखर शिंदे, चंद्रशेखर शिंदे, गुरुनाथ ढमाले, सागर जाधव, गणेश शेळके, आकाश शिंदे, शरद ठाकरे आदींचा समावेश आहे.

दीपक शिंदे ८४६८८३६३५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com