Sugarcane Production : एकरी ८० टन ऊस उत्पादनात राखले सातत्य

Sugarcane Farming : पुणे जिल्ह्यातील कुसूर येथील पोपट तुकाराम महाबरे (ता. जुन्नर) हे पारंपारिक ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आजोबा, वडिलांपासून सुरू असलेली ऊस उत्पादनाची परंपरा पोपटराव यांनी कायम ठेवली आहे.
Sugarcane Production
Sugarcane Production Agrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

Pune News : पुणे जिल्ह्यातील कुसूर येथील पोपट तुकाराम महाबरे (ता. जुन्नर) हे पारंपारिक ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आजोबा, वडिलांपासून सुरू असलेली ऊस उत्पादनाची परंपरा पोपटराव यांनी कायम ठेवली आहे. सिंचन आणि खतांचा संतुलित वापर करून त्यांनी ८६०३२ या ऊसाचे हेक्टरी २७४ टन उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. सातत्यपूर्ण एकरी ८० टन ऊस उत्पादन घेतल्याबद्दल पोपट महाबरे यांना वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने २०२३-२४ या वर्षीचा ऊसभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

पोपट तुकाराम महाबरे यांचे एकत्रित कुटुंब. त्यांची पारंपरिक ५ एकर आणि नव्याने घेतलेली ६ एकर अशी एकूण ११ एकर शेती आहे. शेती दोन वेगवेगळ्या गावांमध्ये विखुरलेली आहे. उपलब्ध संपूर्ण शेतजमिनीमध्ये ऊस लागवड केली जाते. उत्पादित ऊस विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी दिला जातो.
महाबरे यांचे आजोबा किसन आणि वडील तुकाराम हे पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करत होते. त्या वेळी उत्पादित ऊस खांडसरीला पाठविला जात असे. त्यानंतर आजोबा आणि वडिलांच्या मार्गदर्शनानुसार पोपटराव यांनी ऊस शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. पारंपरिक ज्ञानातून ऊसाचे चांगले उत्पादन घेण्यात त्यांनी सातत्य राखले आहे. ऊस शेतीमध्ये थोरले बंधू वसंत, पुतणे हिरेन आणि देवेश यांच्या मदतीने पोपटराव ऊस शेती करत आहेत.

Sugarcane Production
Sugarcane Production : एकरी ११० टन ऊस उत्पादनात जपले सातत्य

लागवड व्यवस्थापनील बाबी ः
ऊस लागवडीसाठी शेताची आडवी उभी दोन वेळा नांगरणी केली जाते. त्यानंतर रोटर, कल्टिव्हेटर मारून ५ फुटांच्या सऱ्या काढल्या जातात. एकरी दोन टन याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरले जाते. तसेच रासायनिक खतांचे बेसल डोस म्हणून १०ः१६ः१० हे खत १०० किलो, युरिया ५० किलो, पोटॅश ५० किलो, सल्फर १० किलो यांच्या मात्रा दिल्या जातात. त्यानंतर लागवडीसाठी ९ महिने वयाच्या रसरशीत बेण्याची दोन डोळ्यांच्या टिपऱ्यांची निवड केली जाते. जेवढे रसरशीत बेणे तितकाच उतारा जास्त यामुळे बेणे निवड अत्यंत महत्त्वाची असल्याचे महाबरे सांगतात. लागवड केल्यानंतर डोळे उतरून आल्यावर एकरी १०० किलो युरीयाचा डोस दिला जातो.

Sugarcane Production
Sugarcane Production : सांगलीच्या संजय कदम यांनी एकरी १३३ टन ऊस उत्पादन घेण्याची किमया कशी केली?

...असे आहे खत व्यवस्थापन
उसाची उगवण झाल्यावर खोडाला माती लावून बाळभरणी केली जाते. यामुळे खोड आणि मुळांसाठी पोषक स्थिती निर्माण होते. या वेळी २४ः२४ः०० या खताची एकरी ५० किलो प्रमाणे मात्रा दिली जाते. त्यानंतर दर आठवड्याला नियमित पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाते. ९० दिवसांनी १८ः४६ः०० हे खत १०० किलो, पोटॅश ५० किलो, १०ः२६ः२६ हे १०० किलो, सल्फर १० किलो प्रमाणे मात्रा दिली जाते. त्याशिवाय विद्राव्य खतांच्या मात्रा देखील दिल्या जातात. याच दरम्यान हुमणी प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर देखील केला जातो.

चार महिन्यांत मोठी भरणी ः
ऊस चार महिन्यांचा झाल्यावर पॉवर टिलरचा वापर करून मोठी भरण केली जाते. या वेळी ऊसाच्या खोडाशी तीन फुटांचा मातीचा थर लावला जातो. यामुळे खोड मजुबत होऊन ऊसाची वाढ चांगली आणि झपाट्याने होण्यास मदत होते. या वेळी मुळांच्या वाढीसाठी विद्राव्य खतांच्या मात्रा सुरू केल्या जातात. यामध्ये अमोनिअम सल्फेट, १२ः६१ः०० हे खत १०० किलो, फॉस्फरिक ॲसिड ५ किलो प्रमाणे मात्रा दिली जाते.

शाश्वत पीक उत्पादनासाठी शेणखत महत्त्वाचे...
शेती करायची म्हटली तर घरात भरपूर पशुधन हवे अशी शिकवण पोपट यांच्या आजोबांची शिकवण होती. शेणखतामुळे जमिनीचा पोत टिकतो, सुधारतो आणि शेती फायद्यात राहते असे ते कायम सांगायचे. त्यानुसार सध्या गोठ्यात ३ म्हशी, दोन बैल, चार गायी आणि ५ वासरे असे पशुधन संगोपन केले जात आहे. यामुळे वर्षभरात सुमारे ५० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. उपलब्ध शेणखताचा वापर शेतीमध्येच केला जात असल्याने मातीचा पोत टिकून असल्याचा पोपटराव यांचा अनुभव आहे.

तण खाई धन ः
ऊस पिकाला विविध टप्प्यांत दिल्या जाणाऱ्या खत आणि पाण्याचा फायदा होण्यासाठी पिकांतील तणांचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. उसात तणांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास ऊस शेतीला दिले जाणारे खत आणि पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. म्हणूनच ‘तण खाई धन’ अशी शेतकऱ्यांची म्हण आहे. उसात तण वाढूच नये यासाठी प्रत्येक महिन्याला तणनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे उसाची चांगली वाढ होऊन, वजन आणि साखरदेखील चांगली मिळते असा महाबरे यांचा अनुभव आहे.

पाटपाणी पद्धतीवर भर ः
ऊस ठिबक सिंचनावर का घेत नाही, असा प्रश्‍न विचारल्यानंतर पोपट महाबरे म्हणतात, की प्रवाही पद्धतीने देखील कमी पाण्यावर ऊस उत्पादन घेता येते. मात्र बहुतांश शेतकरी उपलब्ध पाण्याचा निष्काळजीपणे अति वापर करतात. तर ठिबक सिंचनाचा वापर करणारे काही शेतकरीदेखील मोटर सुरू करून निघून जातात. या निष्काळजीपणामुळे ठिबकद्वारे देखील जास्त पाणी ऊसाला दिले जाते. परिणामी टनेज घटते. योग्य टनेज मिळवायचे असेल तर पिकाच्या गरजेनुसार संतुलित पाणी, खत व्यवस्थापन तसेच तण व्यवस्थापन यावर भर देणे आवश्यक आहे.

- पोपट महाबरे, ९३०७३२३२४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com