
Pune News: मॉन्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागांत दाणादाण उडाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, खानदेश, मराठवाडा व विदर्भात हलका ते जोरदार पाऊस पडला. तर पुण्यात मुसळधार पाऊस झाला. खरिपाच्या तोंडावर झालेला पाऊस पोषक असला, तरी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसाने काही ठिकाणी बाजरी, भुईमूग, मका पिकांना कोंब फुटू लागले आहेत.
राज्यात मंगळवारी (ता. २०) रात्री आठनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पूर्वमोसमी पावसाने अनेक जिल्ह्याला चांगलेच झोडपले. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत चिंचवड येथे १०१ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्ते पाण्याखाली गेले. तर ग्रामीण भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोकणात जोरदार पाऊस
कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील अनेक शहरांत पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. वीज पडून कुडाळ येथील एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी (ता. २१) सकाळपासूनदेखील पावसाची रिपरिप सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रात जोर
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर तर खानदेशातील धुळे, जळगाव जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरला पूर्व मोसमी पावसाने झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस सुरूच होता. जोरदार पावसाने खरीप तयारीला ब्रेक लागला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने वाफशासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. बहुतांश तालुक्यांतून पाऊस झाला असून,
यामुळे सुमारे शंभर हेक्टरमधील काढणीला आलेली उन्हाळी पिके शेतात अडकली आहेत. सांगलीतील दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांना झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यात दीड तासांहून अधिक पाऊस झाला. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त ठरणार असून पूर्वमशागती खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील मिरज, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, शिराळा, तासगाव यांसह अन्य भागांत मंगळवारी सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक गावांत शेतात पाणी साचले.
पुणे जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाने पुण्यासह, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, पुरंदर तालुक्यांना चांगलेच झोडपले. सातारा जिल्ह्यातही सर्वच तालुक्यांत तिसऱ्या दिवशी बुधवारी जोरदार पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. माण तालुक्यातील म्हसवड परिसरातील धुळदेव, मासाळवाडी, कारखेल, हवालदारवाडी तसेच खटाव तालुक्यातील औंध परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे परिसरातील घराचे नुकसान झाले आहे.
तसेच पुसेसावळी परिसरातील राजाचे कुर्ले, पारगाव, गोरेगाव परिसरातही सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला आहे. अहिल्यानगरमधील अनेक तालुक्यांतही पावसाने कांदा, मका, आंबा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. खानदेशात रोज वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी विविध भागांत वादळी पावसात पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा भागांत पाऊस झाला. साक्री तालुक्यातील वार्सा, पिंपळनेर भागांत पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत विजेचे खांबही वाकले आहेत.
मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसामुळे आजवर सुमारे ४२१८ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी मे महिन्यातच सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाकडून देण्यात आला होता. महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार २०२५ मध्ये अवेळी पावसामुळे ५९७ गावांतील ७१४६ शेतकऱ्यांचे सुमारे २४१८.५४ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीमध्ये जिरायत २५१.०८ हेक्टर, बागायत १८८४.७२ हेक्टर, तर फळपिकांचे सुमारे २०८२.७४ क्षेत्रांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
पुण्यात मॉन्सूनपूर्व ढगफुटीसदृश पाऊस
चिंचवडमध्ये १०१ मिलिमीटर पावसाची नोंद
कांदा, आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
तातडीने पंचनामे करण्याची मागणी
कोल्हापुरात काही ठिकाणी विजांच्या कडकडटासह वादळी पाऊस
पावसाने वाशीम जिल्ह्यात भुईमुगाला निघाले कोंब.
मराठवाड्यात पावसाने ३९१ जनावरे दगावली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.