
Chh. Sambhajinagar News : अलीकडच्या आठवडाभरात तापणाऱ्या उन्हाने जमिनीतील ओलही झपाट्याने तुटते आहे. त्यामुळे तगलेली पिके दुपारच्या वेळी ऊन धरताना दिसतात. आणखी काही दिवसस्थिती अशीच राहिल्यास बहुतांश भागात जेमतेम पावसाच्या भरवशावर आजवर पीक तगली, पुढचे काय, हा प्रश्न पावसावर शेती अवलंबून असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांपुढे आहे.
पावसावर शेती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यातही पावसाची मोठी तूट असलेल्या तालुक्यात व मंडळात त्यातही हलक्या जमिनीतील स्थिती जास्तच अडचणीची होण्याची चिन्ह आहेत.
निविष्ठांचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी, वातावरणीय बदलामुळे पिकांना पोषक स्थिती नसणे, अपेक्षित उत्पादन न होणे, उत्पादन झाले तर दर न मिळणे, शेतीच्या शाश्वततेसाठी आवश्यक बाबी करण्याकरिता भांडवलाची अडचण या सर्वच साठमारीत शेतकरी अडचणीत आहेत. हे कमी की काय वन्य प्राण्यांमुळे शेती पिकाचे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत जून आणि जुलै महिन्यांत पावसाचा कमी अधिक प्रमाणात खंड पाहायला मिळाला. त्यामुळे पावसाळ्याचे निम्मे दिवस संपले असताना अजून अनेक भागांतील पाणीसाठे तहानलेलेच आहेत. काही वेळात किंवा एखाद्या दिवशी भरपूर पाऊस पडून जाणे इतर दिवशी मात्र नुसती भरपूर वा झाडाखालच भिजणार नाही अशी स्थिती.
त्यामुळे पावसाचा टक्का दिसत असले तरी पडलेला पाऊस पिकांना पोषक आहे का, यातील वारंवारितामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसणारा फटका लक्षात घेता २.५ मिलिमीटर म्हणजे पावसाचा दिवस या संकल्पनेचा फेरविचार करण्याची गरज आहे का, हा प्रश्न निर्माण होतो आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ९१.५ टक्के, पैठणमध्ये ९७.३ टक्के गंगापूरमध्ये ७२.९ टक्के, वैजापूरमध्ये १०५ टक्के, कन्नडमध्ये १३१ टक्के, खुलताबादमध्ये १०६.९ टक्के, सिल्लोडमध्ये ९४.८ टक्के, सोयगावमध्ये ८७.६ तर फुलंब्रीत ११४.१ टक्के पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४३ मंडळात पावसाची मोठी तूट आहे. यातही गंगापूर तालुक्यातील गंगापूर, मांजरी, भेंडाळा, जामगाव या मंडळात केवळ ३५.५ ते ६५.९ टक्केच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, सिल्लोड सोयगाव या तालुक्यांत पावसाची तूट आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १०१.३ टक्के, जाफराबादमध्ये ११३.७ टक्के, जालनामध्ये ११६.२ टक्के, अंबडमध्ये ९६.९ टक्के, पतूरमध्ये ८९.८, बदनापूरमध्ये १२८. ७ टक्के, मंठामध्ये ८६.९ टक्के तर घनसावंगीत ९०.८ टक्के पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील २१ मंडलांत पावसाची तूट मोठी आहे. श्रीष्टी मंडलात सर्वांत कमी पाऊस झाला आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचे प्रमाण आजवर अत्यंत कमीच असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील बीड तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ७४.३ टक्के, पाटोदामध्ये ६३.३ टक्के, गेवराई ७३.६ टक्के, माजलगावमध्ये ८६.८ टक्के, आंबेजोगाईत ८५.७ टक्के, केजमध्ये ७६.२ टक्के, परळीत ८२.३ टक्के, धारूरमध्ये ६३.८ टक्के, वडवणीत ७०.४ टक्के, तर सर्वांत कमी आष्टी तालुक्यात ३५.१ टक्केच पाऊस झाल्याची स्थिती आहे.
नैसर्गिक आपत्तीचाही फटका
छत्रपती संभाजीनगर व बीड या दोन जिल्ह्यातील शेतीपिकाचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५२८८.०७ ,तर बीड जिल्ह्यातील १९१६.७८ हेक्टर क्षेत्राचा नुकसानीत समावेश आहे.
आढळून आलेले कीड-रोग
मकावर लष्करी, पाने खाणारी अळी
कपाशीवर मर, मावा, मूळकुज, हुमणी अळी
सोयाबीनवर पाने खाणारी अळी
मुगावर रस शोषक किडी
उडदावर, मावा, तुडतुडे, मर, खोडमाशी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.