
साक्षी पवार
Indian History: भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी आपले अद्वितीय शौर्य, कुशल प्रशासकीय नेतृत्व आणि लोककल्याणकारी कारभाराने जनमानसावर एक वेगळी छाप सोडली. त्यातीलच एक तेज:पुंज रत्न म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर. त्यांच्या जन्मोत्सवाला उद्या तिसरे शताब्दीवर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला हा उजाळा.
त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि प्रजेच्या हितासाठी केलेल्या अथक प्रयत्नांतून अठराव्या शतकात मराठा साम्राज्याच्या वैभवाला नवा आयाम देणाऱ्या लोकमाता म्हणजे अहिल्याबाई होळकर! अहिल्याबाई म्हणजे महाराष्ट्राच्या पेशवेकालीन इतिहासातले सुवर्णपान. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याबाई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला असीम धैर्याने तोंड देत पुढे होळकर राजवंशाच्या शासनकर्त्या झाल्या.
मानकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे यांचं तेजस्वी कन्यारत्न अहिल्येचे वेगळेपण आणि हुशारी ओळखून मल्हारराव होळकरांनी त्यांना आपला मुलगा खंडेराव यासाठी विवाहाची मागणी घातली. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. गरिबीमुळे अहिल्याबाईंना लहानपणी पुरेसे शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही; मात्र विवाहानंतर मल्हाररावांनी त्यांना विविध विषयांचे शिक्षण आणि नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली.
अहिल्याबाई आपल्या पती आणि सासऱ्यांच्या गैरहजेरीत प्रशासनाची सारी कामे सांभाळून यशस्वीरीत्या पार पाडायच्या. कधीच कोणतेही काम न टाळता, उशीर न करता ते काम छोटे असो अथवा मोठे दृढनिश्चयाने पूर्ण करायच्या. अशा रीतीने त्या शासन प्रशासनाच्या सर्व कार्यात पारंगत होत गेल्या. त्यामुळे मल्हाररावांचा त्यांच्यावर अधिकाधिक विश्वास वाढत गेला.
प्रजेशी सुसंवाद
एका लढाईत त्यांचे पती खंडेराव होळकरांना वीरमरण आले. त्या वेळी अहिल्याबाई अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या होत्या. त्या काळात प्रचलित सती प्रथेनुसार त्यांनी सती न जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. आपलं जीवन लोककल्याणासाठी वाहून देण्याचा त्यांचा निश्चय होता. जीवनात अंधार पसरला असतानाही आपल्या कर्तव्यपथावरून त्या विचलित झाल्या नाहीत. अहिल्याबाईंजवळ धरतीसारखं धैर्य, हिमालयासारखी दृढता आणि आकाशासारखे उदार मन होते.
या कठीण काळात त्यांनी स्वतःला सावरले व आपल्या दृढनिश्चयाने तीस वर्षे माळवा प्रांताची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. त्यांच्या कर्तृत्वाने राज्याच्या इतिहासात शांती व समृद्धीचा नवा अध्याय जोडला. त्या काळी सामाजिक रूढी- प्रथांनी समाजमनात आपली मुळे घट्ट रोवली होती. अशा परिस्थितीत एका स्त्रीने राज्यकारभार सांभाळणे म्हणजे मोठे आव्हान होते. त्यांची लढाई ही फक्त बाहेरच्याच नाही, तर अंतर्गत प्रतिगामी शक्तींसोबत सुद्धा होती. या संघर्षाला त्या धीराने सामोऱ्या गेल्या. अहिल्याबाईंचा प्रजेशी सुसंवाद होता. त्या लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या. शोषित, वंचितांना त्यांनी न्याय दिला, विधवांना मदत केली. सामान्य जनता हा त्यांच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू होता, म्हणूनच जनतेमध्ये त्यांच्याविषयी श्रद्धाभाव होता.
शेती क्षेत्रात केले बदल
सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या अहिल्याबाईंच्या सैन्यात विविध जातिधर्मांचे सैनिक होते. अहिल्याबाईंचा सरदारांप्रती बुद्धिमत्तापूर्ण व्यवहार होता. एकीकडे त्यांचा यथोचित सन्मान करायच्या व दुसरीकडे प्रशासनावरही त्यांची करडी नजर होती. अहिल्याबाईंच्या शासन काळात माळवा प्रांतात आर्थिक प्रगती झाली. शेती व्यवसाय अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे हे ओळखून, त्यांनी शेती क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल केले.
भूमिहीन शेतकऱ्यांना करात सूट दिली व गरज पडल्यास करमाफी दिली. त्यांच्या शेतीविषयक योजना कार्यक्षमता वाढविणाऱ्या होत्या. जलसिंचन आणि पाण्याचे व्यवस्थापन, योग्य आणि समान कर अशा उपाययोजना करून शेतकऱ्यांचे कराचे ओझे त्यांनी कमी केले. अहिल्याबाईंचा दृष्टिकोन प्रागतिक होता. शेती करण्याच्या पद्धतीत व साधनांमध्ये सुधारणा केल्या. त्यांच्या प्रशासनाने बहुपीक पद्धतीला चालना दिली, त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारले.
त्याचबरोबर उत्तम प्रतीच्या बियाण्यांचे वाटप केले. त्यांच्या योजनेतून शेती क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले व आर्थिक स्थिरता स्थापन झाली. त्यांची कार्यप्रणाली प्रजेसाठी उत्साहवर्धक होती. जनकल्याणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. अहिल्याबाईंनी सार्वजनिक गोशाळांची निर्मिती, मंदिरांचा जीर्णोद्धार, फकिरांना जमिनी देणे, स्थानिक बाजारांचे नियमन करण्यासह तसेच कवी, संगीतकार, विणकर आणि शिल्पकार अशा कलावंतांना नियमितपणे निधी उपलब्ध करून दिला.
अहिल्याबाईंनी खासगी आणि सरकारी तिजोरीचे हिशेब वेगळे ठेवले होते. आपल्या खासगी तिजोरीतून नर्मदा, गंगा अशा नद्यांच्या किनारी घाट बांधून घेतले. व्यक्तिगत खर्चाच्या बाबतीतही त्यांनी स्वयंशिस्त व इमानदारी राखली. या खर्चासाठी त्या कधीही राजकोशातून धन घेत नसत. व्यक्तिगत भेटवस्तू स्वीकारत नसत. दरबाऱ्यांनी त्यांच्यासाठी काही खर्च केला तर तो त्या परत करत. यावरून त्यांचा पारदर्शीपणा दिसून येतो. त्यांची मानवतावादी दृष्टी प्रांतातल्या सर्वच घटकांकडे लक्ष ठेवून होती.
आदिवासी समुदायातील नेत्यांशी सुसंवाद साधला. त्यांना जमिनीवर अधिकार दिले, त्यांच्यावर आपल्या क्षेत्रातील यांत्रिकांना सुरक्षा देण्याची जबाबदारीही सोपवली व योग्य तो मोबदला दिला. अहिल्याबाईंच्या उत्कृष्ट राजनीती व कूटनीतीमुळे माळवा प्रांतात शांती व समृद्धी नांदली. त्यांच्या एकूण कार्यकाळात दोन युद्धांचा उल्लेख आढळतो, ज्यांचा सामना त्यांनी अत्यंत साहसाने आणि विचारपूर्वक केला.
सत्तेच्या लालसेपोटी रघुनाथराव पेशव्यांनी माळवा प्रांत हडपण्याचा डाव रचला, तेव्हा अहिल्याबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी हिमतीने रघुनाथरावांना इशारावजा पत्र लिहिलं. महिलांच्या फौजेसकट लढण्यास सज्ज झाल्याचे कळवले. या धीरोदात्त राणीशी न लढण्यातच आपले भले आहे हे ओळखून वाघोबांनी सैन्य मागे घेतलं.
‘युद्ध विनाशकारी आहे’ असे अहिल्यादेवींचे मत होते. कारण त्यामुळे जीवितहानी होते आणि ज्या धनामुळे लोकांची प्रगती होण्याची शक्यता असते त्या धनाचा दुरुपयोग युद्धात होतो. ब्रिटिश इतिहासकार जॉन की याने आपल्या लेखणीतून ज्यांची ‘तत्त्वज्ञानी राणी’ अशी ओळख करून दिली आहे त्या सुशासन, न्यायप्रक्रिया, दूरदृष्टी, रणनीती यांच्या जोरावर पराक्रमी इतिहास रचणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या उद्याच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
९६६५२८८९८५
(लेखिका साहित्यिक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.