Vegetable Market : गणेशोत्सवात भाव खाऊन जातेय पडवळ

Padwal Vegetable : पुणे बाजार समितीतील चित्र
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

Pune Vegetable Market : गणेशोत्सवात फुले-फळांबरोबरच गौरीपूजनात पडवळ या भाजीला विशेष महत्त्व आहे. या काळात घरोघरी नैवेद्यासाठी या भाजीला मोठी मागणी असते. साहजिकच पुणे येथील बाजार समितीत पडवळाची सोलापूर, मराठवाडा, कोकण आदी भागांतून मोठी आवक होऊन चांगली उलाढाल होते. त्याचा हा थोडक्यात आढावा.

गणेशोत्सव सुरू झाला आहे. गौरींचे आगमनही होत आहे. या काळात विविध फुले- फळांसह विविध भाज्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामध्ये पडवळ ही मुख्य भाजी असते. पुणे- गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये वर्षभर या शेतीमालाची आवक असते. बाजार समितीतील पडवळाचे पारंपरिक अडतदार बाबूराव शिंदे म्हणाले, की जानेवारी ते मार्च दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी, तुळजापूर परिसरांतील गावांमधून आवक होते.

साधारण ती चार-पाच टनांमध्ये असते. प्रति किलो सरासरी १५ ते ३० रुपये प्रति किलो दर असतो. उन्हाळ्यातील आवक कोकण आणि पनवेल भागांतून होते. ती साधारण एक ते दोन टनांपर्यंत राहते. या काळात आवक कमी झालेली असल्याने दर वाढलेले म्हणजे सरासरी ४० ते ५० रुपये असतात.

...अशी असते मागणी

पडवळला असलेल्या वर्षभरातील मागणीत घरगुती भाजीसह हॉटेल, खाणावळी, कंपन्या तसेच
लष्कराची कॅन्टीन आदींचा समावेश असतो. धार्मिक कारणांसाठी गणेशोत्सवामध्ये गौरी आगमनाच्या काळात पडवळाचे महत्त्व अधिक असते. साहजिकच पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील विविध उपबाजारांमधून या वेळी मागणी वाढते.

या काळात प्रति किरकोळ भाजीविक्रेत्यांकडून सरासरी दोन ते तीन डाग (प्रति ५० किलो) खरेदी केले जातात. बाजार समितीत १० ते २० रुपये प्रति किलो दराने विक्री होणारे पडवळ गणेशोत्सव काळात किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होते.

Vegetable Market
Fruit Market : गणेशोत्सवात फळांचे दर स्थिर

दुष्काळी परिस्थितीचा परिणाम

पडवळ सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या वर्षी पावसाचे प्रमाण कमी व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे लागवड थोडी कमी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. दरवर्षी कोकणातील व्यापाऱ्यांकडून पुण्यातील बाजार समितीत खरेदी मोठ्या प्रमाणावर व्हायची. प्रति खरेदीदार साधारण १० ते १५ डाग ( प्रति ५० किलोचा) खरेदी करायचे. यंदा मात्र पाऊसमान स्थिती पाहता कोकणातील शेतकऱ्यांनीही पडवळाची लागवड केली. स्थानिक पातळीवरच ते उपलब्ध झाले.
त्यामुळे कोकणातून मागणी कमी होऊन दरांवरही त्याचा परिणाम झाल्याचे अडतदार शिंदे यांनी सांगितले. सदाशिव पेठ, पुणे येथील किरकोळ भाजीविक्रेते प्रकाश ढमढेरे म्हणाले, की गणेशोत्सवात प्रति ग्राहक साधारण पावशेर ते अर्धा किलोपर्यंत खरेदी करतात. दर किलोला साधारण ६० ते ८० रुपये आहेत.

Vegetable Market
Market Rate Vegetables : टोमॅटो, वांगी दरात घसरण तर डाळी, गोडतेलाच्या दरात किंचीत वाढ

शेतकरी अनुभव

आमच्या कुटुंबात सुमारे ४० वर्षांपासून पडवळाची लागवड सुरू आहे. दोन हंगामांत ठिबक सिंचनावर दोन एकरांत लागवडीचे नियोजन असते. यातील एक लागवड मार्चमध्ये होळीच्या दरम्यान असते.
त्याचे उत्पादन मे किंवा जूनमध्ये सुरू होते. या काळात उन्हाळा असल्याने दर चांगले म्हणजे
किलोला ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळतात. याला आम्ही आगाप हंगाम म्हणतो. दुसऱ्या हंगामातील लागवड जून- जुलै काळात असते. त्याचे उत्पादन गणेशोत्सव काळात सुरू होते. या काळात खरिपातील सर्वच उत्पादन सुरू होत असल्याने दर तुलनेने कमी मिळतो. आम्ही पुणे, मुंबईसह हैदराबाद येथे माल विक्रीसाठी पाठवतो. यंदा पुणे बाजारात १० ते २० रुपये दर मिळत आहे. एकरी साधारण दोन ते अडीच हजार झाडे असतात. याचे बियाणे दरवर्षी राखतो. त्याचाच पुढील हंगामाच्या लागवडीसाठी वापर होतो. एकरी सुमारे १५ ते २० टन, तर उत्पादन खर्च सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत येतो.
वर्षभरात सरासरी २० ते २५ रुपये दर मिळून तीन ते कमाल चार लाखांपर्यंतही उत्पन्न मिळते.
सचिन चव्हाण
बोरमणी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
९२८४४८१९७७

‘मी यंदा एक एकर पडवळ लावली होती. आता हंगाम संपत आला असून, गणपती उत्सवात कोकणात विविध भागांतील वैशिष्ट्यांनुसार नैवेद्यामध्ये या भाजीचा वापर केला जातो. कोकणातून पुणे, मुंबई येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांकडून गणपती काळात पडवळला अधिक मागणी असते. मी बहुतेक माल कणकवली, गोव्यासह कोल्हापूरला पाठवतो. जेव्हा घाटावर पडवळाची आवक कमी असते तेव्हा कोकणातील पडवळ १०० रुपये प्रति जोडी या दराने किरकोळ बाजारात विक्री होते. आता गणपतीत हा दर ४० रुपये आहे. कारण घाटावरून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे
सुशांत नाईक, ९४०५१८४४७८
वेटोरे ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

बाबूराव शिंदे, ९४२०८६०७९६
(पडवळचे प्रमुख अडतदार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती)

भाजीपाला व फळांना मागणी

गणेशोत्सवामध्ये महत्त्वाचा दिवस असलेल्या गौरी भोजनाच्या दिवशी विविध भाज्यांना मागणी असते. यामध्ये प्रामुख्याने पालेभाज्या व त्यात मेथी आणि शेपूचा समावेश आहे. मेथीचे दर ५० रुपयांपर्यंत, तर शेपू १५ ते २० रुपये प्रति पेंडी राहण्याची शक्यता असल्याचे भाजीपाल्याचे किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. महत्त्वाच्या पाच भाज्यांमध्ये भेंडी, गवार, कारली, कोशिंबिरीसाठी काकडी यांचा समावेश असतो. त्यांच्याही दरात वाढ अपेक्षित आहे. पेरू, सीताफळ, केळी, डाळिंब आणि सफरचंद या फळांनाही मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात १५० ते ३०० रुपये प्रति किलोपर्यंत त्यांचे दर
आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com