
Nashik News : जमिनीची काळजी घेण्यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, जमीन धूप थांबविण्यासाठी उपाययोजना तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी संवर्धित शेती पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र (निफाड) येथील मृद शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील यांनी केले.
गुरुवारी (ता. ५) जागतिक मृदा दिवसानिमित्त सुरगाणा येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला. त्या वेळी डॉ. पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व चाचणी अधिकारी संदीप वळवी, सुरगाणा तालुका कृषी अधिकारी, प्रशांत रहाणे, मंडळ कृषी अधिकारी सुनील मोरे, पंचायत समिती सुरगाणा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यंदा ‘मातीची काळजी : मापन, निरीक्षण आणि व्यवस्थापन’ ही संकल्पना असून त्यावर प्रबोधन करण्यात येत आहे. डॉ. पाटील म्हणाले, की संवर्धित शेती पद्धतीत शेतजमिनीवर कायमस्वरूपी आच्छादन, जमिनीची कमीत कमी मशागत आणि पिकांची फेरपालट या बाबींचा समावेश होतो.
त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर आणि खाली जैवविविधता आणि नैसर्गिक जैविक प्रक्रिया वाढते पाणी आणि अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. डोंगर उतारावरील जमिनीची मोठ्या प्रमाणावर होणारी धूप थांबविण्यासाठी समपातळीत बांध, ढाळीचे बांध, खाचरे तयार करणे, समपातळी मशागत पाणलोट व्यवस्थापन करावे.
आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील ५०० तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे. आकांक्षित तालुका कार्यक्रम देशाच्या सर्वांत दुर्लक्षित आणि मागासलेल्या तालुक्यांत सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केला आहे.
तालुका कृषी अधिकारी रहाणे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी वळवी यांनी माती नमुना कसा घ्यावा याची सविस्तर माहिती देऊन जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळेमार्फत माती परीक्षण केलेल्या सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन आरोग्य पत्रिका यांचे वाचन केले. कार्यक्रमप्रसंगी सुरगाणा परिसरातील १५० शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. पंकज माळी यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत महाले यांनी आभार मानले.
आरोग्य पत्रिकेनुसार अन्नद्रव्यांचा वापर करावा
जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध सुधारणा उपाय तसेच जमीन आरोग्य पत्रिकेनुसार अन्नद्रव्यांचा वापर करावा. याचेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.