Soil Health : कृषी उत्पादकता वाढीसाठी जमिनीच्या आरोग्याचे व्यवस्थापन

Soil Fertility : कृषी उत्पादनाकरिता जमीन व पाणी हे दोन महत्त्वाचे नैसर्गिक साधन घटक आहेत. सुपीक जमीन ही निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती दीर्घकाळ अन्न उत्पादन शक्य होते.
Soil Health
Soil HealthAgrowon
Published on
Updated on

विशाल पांडागळे, डॉ. अनिता चोरे, डॉ. राजेश पातोडे

Soil Productivity :
कृषी उत्पादनाकरिता जमीन व पाणी हे दोन महत्त्वाचे नैसर्गिक साधन घटक आहेत. सुपीक जमीन ही निसर्गाची एक देणगी असून तिची योग्य काळजी घेतल्यास ती दीर्घकाळ अन्न उत्पादन शक्य होते. मात्र, कोरडवाहू क्षेत्रात ३९ टक्के जमिनी धुपेमुळे नापीक झाल्या आहेत, तर सिंचन क्षेत्रात पाण्याच्या अतिरेकी आणि अयोग्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्याला जोड मिळाली आहे, ती फेरपालट नसलेली एकसारखी पीक पद्धती, सेंद्रिय खतांचा अपुरा किंवा शून्य वापर, रासायनिक खतांचा भरमसाठ आणि असंतुलित वापर इ. अयोग्य व्यवस्थापनाची. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जरी कमी पडली तरी उत्पादनात घट येते. जमिनीची उत्पादन क्षमता ही जमिनीची पोत, जैविक गुणधर्म, अन्नद्रव्ये, पुरवठा क्षमता, वनस्पतीच्या वाढीस लागणारे तापमान, पाण्याचा पुरवठा, सूर्यप्रकाश, मातीमध्ये खेळती हवा इ. अनेक घटकांवर अवलंबून असते.

जमिनी खूपच आम्लयुक्त किंवा विम्लयुक्त असलेल्या जमिनीतील पिकांना काही अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही. म्हणूनच अन्नद्रव्याची उपलब्धता योग्य प्रकारे होण्यासाठी मातीचा सामू उदासीन (७) च्या जवळपास असणे अत्यंत गरजेचे आहे. या स्थितीमध्ये बहुतांश सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकांना चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे अशा जमिनीमध्ये पिकांची वाढ समाधानकारक होऊन अपेक्षित उत्पादन मिळते.

Soil Health
Cotton Productivity : उत्पादकता वाढीसाठी कपाशीचे काटेकोर व्यवस्थापन हवे

जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी जमिनीच्या व्यवस्थापनांत खालील बाबींवर भर दिला पाहिजे.
१. जमिनीतील पाणी, हवा व वनस्पती यांचा योग्य संबंध राखण्यासाठी योग्य मशागत करावी.
२. जमिनीला पिकांच्या आवश्यकतेनुसार माती परीक्षण करून सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल पुरवठा करावा.
३. जमिनीचा पोत, प्रत आणि सुपीकता यांचा विचार करून जमिनीचे फूल टिकून ठेवावे. त्यासाठी पिकांची फेरपालट करावी.
४. जमिनीची धूप थांबवण्याच्या उपाययोजना नियमित कराव्यात.
५. जमिनीतील अपायकारक क्षाराचा निचरा करण्यासाठी भुसूधारकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. त्यासाठी जमिनीत उघडे अथवा बंदिस्त चर खोदून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. जमिनी जास्त विम्लयुक्त असल्यास जिप्समचा वापर करावा आणि जास्त आम्लयुक्त असल्यास चुन्याचा वापर करावा. त्यासाठी जमिनीस द्यावयाच्या जिप्सम किंवा चुन्याची मात्रा ठरविण्यासाठी मातीचे नमुने प्रयोगशाळेतून तपासून घ्यावेत.
६. जमिनीमध्ये सेंद्रिय खते, सेंद्रिय पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

जमिनीतील पाणी
जमिनीतील पाणी वनस्पतीच्या वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचे द्रावक व वाहक म्हणून कार्य करते. जमिनीतील सूक्ष्म आकारमानाच्या पोकळ्या, चिकण कणांचे आकुंचन प्रसरण, सेंद्रिय पदार्थांचे अस्तित्व आणि माती पाणी कणांमध्ये असणारे आकर्षण, इ. कारणांमुळे जमिनीत पाणी धरून ठेवले जाते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता प्रत्येक जमिनीची प्रकारानुसार वेगवेगळी असते. जमिनीत साठलेल्या पाण्याचे प्रमाण हे बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन क्रियेमुळे सतत कमी होत जाते. जमिनीतील पाणी वेगवेगळ्या वातावरणीय दाबामुळे जमिनीच्या सूक्ष्म पोकळीत आणि माती कणांशी धरून ठेवलेले असते.

जमिनीतील ओलाव्यावर परिणाम करणारे घटक
१. जमिनीचा पोत ः जमिनीचा पोत अत्यंत बारीक असल्यास जास्तीची सच्छिद्रता व मातीच्या कणांच्या पृष्ठीय भागावर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
२. जमिनीची जडणघडण ः जमिनीतील चिकण माती, रेती व वालुका कणांची एकमेकांवरील रचनेमुळे जडणघडण झाल्यामुळे जमिनीत पोकळ्या निर्माण होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
३. सेंद्रिय पदार्थ ः सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचा पोत व रचना यामध्ये सुधारणा होऊन जमिनीत पाणी धरून ठेवण्याच्या प्रक्रियेस गती मिळून जमिनीची जलधारणा शक्ती वाढते.
४. जमिनीची घनता ः जमिनीची घनता वाढल्यास सच्छिद्र पोकळ्यांचे प्रमाण कमी होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.
५. तापमान ः कमी तापमान असलेल्या विभागातील जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते, तर जास्त तापमान असलेल्या विभागात ती कमी असते.
६. क्षारांचे प्रमाण ः जास्त क्षार असलेल्या जमिनीतील पाणी पिकास फार थोड्या प्रमाणात उपलब्ध असते.
७. जमिनीची खोली ः खोल काळ्या किंवा अतिखोल काळ्या जमिनीत अधिक पाणी धरून ठेवले जाते. जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता पिकांना गरजेनुसार उपलब्ध होण्याची प्रक्रिया ही जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असते. जमिनीची क्षारता, सेंद्रिय पदार्थ व सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण या बाबींचे योग्य रितीने व्यवस्थापन केल्यास जमिनीतील पाणी पिकांना उपलब्ध होऊ शकते.

जमिनीतील ओलाव्याचा ताण, त्याचा पीकवाढीवर परिणाम ः
पावसात पडणाऱ्या खंडामुळे पिके बऱ्याच वेळा धोक्यात येतात. पावसातील खंड चार आठवड्यांपेक्षा जास्त असेल तर पिकांना धोका संभवतो. पावसाचे कमी प्रमाण, त्याची अनिश्चितता आणि पावसाची प्रतिकूल विभागणी व त्यात पडणारे पावसाचे खंड ही कोरडवाहू विभागासाठी महत्त्वाची ठरतात. खरीप हंगामात वाऱ्याची गती २० ते २५ किमी प्रति तासापेक्षा जास्त असल्यास जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो.

तक्ता ः जमिनीचा प्रकार, लागणारा पाऊस व उपलब्ध ओलावा
जमिनीचा प्रकार --- खोली (सेंमी) --- पाऊस (मिमी) --- उपलब्ध ओलावा (मिमी)

उथळ --- २२.५ --- ७५ --- ३०.३५
मध्यम खोल --- ४५.० --- ११५ --- ६०.६७
मध्यम खोल --- ६०.० --- २०० --- ८०.९०
खोल --- ९०.० --- २९० --- १४०.१५


उपलब्ध ओल ही जमिनीची खोली व प्रकार यांवर अवलंबून असते. जमिनीची खोली जसजशी वाढते, तसतसे उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण वाढते. उथळ जमिनीत ओलावा कमी पडतो. खोल जमिनीतसुद्धा पीक पेरणीनंतर पाऊस न पडल्यास ओलावा कमी पडतो. त्यामुळे जमिनीच्या क्षमतेनुसार पिकाचे नियोजन केल्यास उपलब्ध ओलाव्याचा पुरेपूर उपयोग होऊन पिकांचे उत्पादन वाढते. अत्यंत उथळ जमिनीत चारा, गवत व फळे देणारी झाडे, उथळ जमिनीत हुलगा, मटकी, गवत तर मध्यम खोल जमिनीत बाजरी, उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफुल, बाजरी-तूर यासोबत योग्य ती आंतरपिके घ्यावीत.
- पावसाच्या लहरीपणावर मात करण्याकरिता पीक योजना तयार करावी.
- उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी योग्य पिकांची निवड करणे.
- शक्यतो लवकर तयार होणारी, प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देणारी, खंडीत पावसाच्या काळात सुप्तावस्थेत राहून चांगला पाऊस होताच जोमाने वाढणारी पिके व त्यांच्या जाती लावणे हा उत्तम उपाय ठरू शकतो.

विशाल प्रकाश पांडागळे, ९६२३६१६८०२
(कृषी साहाय्यक, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com