ज्या शेतीत फक्त निसर्गातून मिळणाऱ्या घटकांचाच वापर केला जातो अशा शेतीला नैसर्गिक शेती (Natural Farming) असे म्हणतात. निसर्गातून मिळणाऱ्या कोणत्याही घटकासाठी पैसे मोजावे लागत नसल्याने या शेतीला फार कमी खर्च येतो. शेतीसाठी पाण्याची (Water) गरज किती असते हे सर्वांना माहीतच आहे. महाराष्ट्रातली सुमारे ८० टक्के शेती निव्वळ पावसाच्या पाण्यावर केली जाते. या पाण्याचा, त्याचप्रमाणे विहिरीच्या आणि समुद्राच्याही पाण्याचा वापर परिणामकारकरीत्या कसा करावयाचा यासंबंधी आमच्या संस्थेने केलेल्या काही संशोधनाची माहिती या लेखात देत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा पूर्वभाग आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा असा दक्षिणोत्तर पट्टा अवर्षणग्रस्त मानला जातो. या भूभागातले सरासरी पर्जन्यमान सुमारे ५०० मिलिमीटर इतके असते. एवढ्या पावसावर एखादे कमी मुदतीचे खरीप हंगामी पीक घेणे शक्य असते. पण या भूभागात पडणाऱ्या पावसापैकी जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये एकूण फक्त १५० मिलिमीटर पाऊस पडतो आणि सुमारे ३५० मिलिमीटर पाऊस हा एकट्या सप्टेंबर महिन्यात म्हणजे पावसाळ्याच्या शेवटी पडतो.
पावसाच्या अशा विषम विभागणीमुळे इथल्या शेतकऱ्यांना खरिपाचे पीक घेणे शक्य होत नाही. म्हणून ते खरिपात आपली जमीन मोकळी ठेवून पडणारा सर्व पाऊस जमिनीतच साठवून ठेवतात आणि सप्टेंबर महिन्यात या जमिनीत रब्बी ज्वारीचे बियाणे पेरतात. जमिनीत साठविलेल्या पाण्यावर हे पीक यावे अशी त्यांची अपेक्षा असते.
या परिस्थितीचा अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले, की ५०० मिलिमीटर पाणी जर जमिनीत साठवून ठेवावयाचे असेल, तर आपल्या जमिनीतल्या मातीचा थर सुमारे दोन मीटर इतका खोल असावा लागतो. परंतु या अवर्षणग्रस्त पट्ट्यात मातीची खोली सर्वसाधारणपणे एक मीटरपेक्षाही कमी असून, त्याखाली खडकच असतो. त्यामुळे अशा जमिनीत केवळ साठविलेल्या पाण्यावर एक संपूर्ण पीक घेणे अशक्य होते.
ज्वारी पेरताना शेतकरी पिकाच्या दोन ओळींमध्ये ३०-३० सेंटिमीटरचे अंतर ठेवतात. पण माझ्या प्रयोगिक ज्वारीत मी दोन ओळींमधले अंतर १५० सेंटिमीटर ठेवले होते. यामागचा विचार असा होता की जर मातीची खोली कमी असेल तर दोन ओळींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या मातीच्या रुंद पट्ट्यातले पाणी हे पीक घेऊ शकेल. या पद्धतीने लावलेल्या पिकातून मला हेक्टरी २५०० किलोग्रॅम ज्वारी मिळाली, तर माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची ज्वारी कणसे येण्यापूर्वीच वाळून गेली होती.
कोरडवाहू कपाशीचा प्रयोग
पावसाच्या पाण्याचा वापर अधिक परिणामकारक व्हावा, या दृष्टीने मी विदर्भातल्या कोरडवाहू कपाशीवरही एक प्रयोग केला. या भागात कपाशी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरावी अशी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे; पण विदर्भात पावसाला सुरुवात होते तीच मुळी २० जूनच्या पुढे आणि त्यामुळे शेतात कपाशीचे बी पेरले जाईपर्यंत जुलैचा पहिला आठवडा उजाडतो. या समस्येवर मी काढलेला तोडगा असा होता, की प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये माती भरून त्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात बी लावावे आणि पाऊस सुरू होईपर्यंत या पिशव्यांना हाताने पाणी द्यावे. जेव्हा पाऊस सुरू होऊन जमिनीत पुरेशी ओल निर्माण होईल तेव्हा पिशवीतली रोपे जमिनीत लावावीत. या पद्धतीचे प्रात्यक्षिक मी विदर्भातल्या ३० खेड्यांमध्ये करून असे दाखवून दिले की जूनमध्ये रोपे तयार करून पाऊस सुरू झाल्यावर शेतात लावलेल्या पिकातून मिळालेले कपाशीचे उत्पन्न हे जमिनीत बी पेरून घेतलेल्या कपाशीच्या तुलनेत ८० टक्के अधिक होते. विदर्भ आणि खानदेशातले अनेक शेतकरी आता या पद्धतीचा वापर करीत आहेत.
कोकणात ऊस लागवड
प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे निर्माण करण्याचे तंत्र वापरून निव्वळ पावसाच्या पाण्यावर कोकणात उसाचे पीक घेता येते, हेही आमच्या संस्थेने दाखवून दिले होते. यासाठी माती भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये उसाची एक डोळ्याची पेरे एप्रिल महिन्यात लावून रोपे करून घेतली. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यावर ती जमिनीत लावली. एप्रिलमध्ये लावलेला ऊस नोव्हेंबरमध्ये काढणीस तयार होतो. कोकणातील उसात स्फटिकशर्करेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा उपयोग नसतो; पण या उसात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन शर्करा भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्याच्या रसाची गोडी काही कमी नसते. त्यामुळे हा ऊस स्थानिक रसवंतिवाल्यांना विकल्यास त्याचे चांगले पैसे होतात. हा प्रयोग आम्ही कोकणात व मावळात सतत तीन वर्षे आणि ३० वेगवेगळ्या ठिकाणी केला. निव्वळ पावसाच्या पाण्यावर उसाचे हेक्टरी ७० ते १०० टन इतके उत्पादन येते हे या प्रयोगातून आम्ही दाखवून दिले.
आपल्याला पेट्रोलला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात इथेनॉल किंवा मिथेन तयार करण्यासाठी कोकणात ऊस लागवड करण्यासाठी हे तंत्र वापरता येईल. कारण या उसात स्फटिकशर्करेचे प्रमाण जरी कमी असले तरी सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या किण्वनक्षम शर्करांचे एकूण प्रमाण १५ टक्के असते. त्यांपासून इथॅनॉल किंवा मिथेन सहज तयार करता येते. निव्वळ पावसाच्या पाण्यावर घेतल्यामुळे हा ऊस अत्यंत स्वस्तात तयार होतो.
भूगर्भातले पाणी हाही पाण्याचा एक नैसर्गिक स्रोत शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो. पण भूगर्भातल्या पाण्यात विविध क्षार कमी-अधिक प्रमाणात विरघळलेले असतात. प्रति लिटर पाण्यात पाच ते सहा ग्रॅम क्षार असलेल्या अनेक विहिरी महाराष्ट्रात आहेत. हे पाणी चवीला खारट लागते; पण गहू, कपाशी, मोहरी, पालक, चाकवत, बीटरूट इ. अनेक पिके एवढ्या क्षारतेचे पाणी सहन करू शकतात. परंतु असे पाणी जर सिंचनासाठी सतत वापरले तर जमिनीतले पाणी बाष्पीभवनाने उडून गेल्यावर मागे उरणाऱ्या क्षारांमुळे मातीतल्या क्षारांचे प्रमाण वाढते. ते पिकाला अपायकारक ठरू शकते. हे टाळायचे असेल तर शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीला कोणत्या बाजूला थोडा उतार आहे ते पाहून चढाकडून उताराकडे जाणाऱ्या अशा दीर्घ लांबीच्या सऱ्या काढून घ्याव्यात आणि बरंब्यांवर पिकाची लागण करावी. पाणी देताना ते शेताच्या उंच बाजूला द्यावे आणि ते इतक्या प्रमाणात द्यावे की ते सऱ्यांमधून वाहत जाऊन शेताच्या बाहेर निघून जाईल. सिंचनासाठी वाखोरी करू नयेत. सिंचनासाठी खारट पाणी वापरल्याने दोन पाळ्यांदरम्यान पाण्याचे बाष्पीभवन होऊन या पद्धतीतही मातीत काही प्रमाणात क्षार साठतात. परंतु दीर्घ सऱ्यांमधून वाहणाऱ्या ज्यादा पाण्यात ते विरघळतात आणि पाण्याबरोबर वाहून जातात. या पद्धतीचा अवलंब केल्यास खारट पाण्याच्या सिंचनाने जमीन क्षारमय होण्याचा धोका टळतो.
समुद्राच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर
हीच पद्धत वापरून आमच्या संस्थेने समुद्राच्या पाण्याचाही सिंचनासाठी उपयोग करता येईल हे दाखवून दिले. समुद्राच्या पाण्यात प्रति लिटर सुमारे ४० ग्रॅम क्षार असतात. पण माड, भेंडीचा वृक्ष, पिलू (मेस्वाक), तिवर इ. वृक्ष आणि चाकवत, पालक, शर्कराकंद इत्यादी हंगामी वनस्पतींमध्येही समुद्राच्या पाण्याची क्षारता सहन करण्याची क्षमता असते. परंतु या वनस्पती जमिनीत लावून त्यांच्या सिंचनासाठी जर पुन्हा पुन्हा समुद्राचे पाणी वापरले तर पाण्याच्या बाष्पीभवनाने त्या जमिनीची क्षारता वाढत जाऊन शेवटी त्या वनस्पती मरतात.
आम्ही समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी एक मीटर रुंदीचा एक चर खणला. हा चर उंचावर सुरू करून समुद्रापर्यंत नेला. या चरात समुद्राकाठची वाळू भरून घेतली आणि या वाळूत वनस्पती लावल्या. पाणी समुद्राचेच पण ते पंपाने उपसून चराच्या वरच्या बाजूला दिले. पाण्याचे प्रमाण जास्त ठेवले, त्यामुळे चरातून वाहत वाहत ते परत समुद्रात जाई. तीन वर्षे हा प्रयोग चालू होता. तीन वर्षांनी या प्रयोगातल्या पिलू आणि भेंडी या वनस्पतींना फुले येऊन फळेही लागली आणि माडाची झाडे सहा मीटर उंच वाढली. चाकवत आणि पालक या पालेभाज्यांमध्ये मात्र जमिनीतले क्षार साठवून ठेवण्याचा गुणधर्म असल्याने त्या इतक्या खारट झाल्या, की त्यांची भाजी खाणेच अशक्य झाले. पण त्यांचा पाला वाळवून त्याची पूड केल्यास पर्यायी मीठ म्हणून ती स्वयंपाकात वापरता येते. नेहमीच्या मिठाचे सर्व घटक तर त्यात असतातच पण शिवाय समुद्राच्या पाण्यामधील अन्य खनिजे, पानांमधील जीवनसत्त्वे आणि उच्च प्रतीची प्रथिने यांचाही त्यात समावेश असतो. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे राजस्थानात घेण्यात आलेल्या एका संशोधनप्रकल्पात असे आढळले की पालकाच्या पानांची पूड गरोदर स्त्रियांच्या रोजच्या आहारात मिठाऐवजी वापरली तर त्यांना होणाऱ्या बालकांचे जन्माच्या वेळचे वजन हे सागरी मीठ खाणाऱ्या गरोदर स्त्रियांच्या बालकांपेक्षा अधिक भरते.
लेखक ‘आरती’चे (ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.