Sugarcane Variety : भारतातही जीएम उसासह अन्य पिकांना चालना

Sugarcane GM Variety : पाकिस्ताने जीएम ऊस विकसित करून व व्यावसायिक लागवडीस चालना देऊन जगात आघाडी घेतली आहे. जगभरातील शेतकऱ्यांच्या समस्या ओळखून त्यानुसार विविध गुणधर्मांची जीएम पिके विकसित होत आहेत.
Sugarcane GM Variety
Sugarcane GM VarietyAgrowon
Published on
Updated on

मंदार मुंडले

Sugarcane Farming : जगभरात जनुकीय तंत्रज्ञानावर आधारित (जेनेटिकली मॉडिफाइड- जीएम) पिकांवर संशोधन सुरू आहे. ‘ट्रान्सजेनिक’ पिकांना युरोपीय किंवा अन्य देशांमधून विरोधही आहे. त्यामुळे अलीकडे शास्त्रज्ञांचा जनुकीय संपादित (जेनेटिकली इडिटेड) पिकांवर अधिक ‘फोकस’ आहे.

जीएम पिकांच्या विश्‍वात सध्या दखल घ्यावयाचे कारण म्हणजे पाकिस्तानातील फैसलाबाद कृषी विद्यापीठाच्या कृषी जैवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी उसाचे दोन जीएम वाण विकसित केले आहेत.

शेंडा खोडकिडीला (टॉप बोरर) प्रतिकारक व ग्लुफोसिनेट या तणनाशकाला सहनशील असे हे ट्रान्सजेनिक वाण आहेत. तेथील पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या तांत्रिक सल्लागार समितीने त्यांच्या व्यावसायिक लागवडीसाठी शिफारस केली आहे. त्यामुळे हे संशोधन प्रयोगशाळेत अडकून न राहता तेथील ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जगातील जीएम उसाविषयी ठळक बाबी

खरे तर जीएम उसाची (कीड प्रतिकारक बीटी ऊस) व्यावसायिक लागवड करणारा जगातील पहिला देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. सन २०१८ पासून लागवडीस प्रारंभही झाला. पहिल्या वर्षी या पिकाखाली ४०० हेक्टरपर्यंत क्षेत्र होते. सन २०२९ मध्ये १८ हजार हेक्टर, २०२१- २२ मध्ये ३७ हजार हेक्टर तर २०२२-२३ मध्ये ते ७० हजार हेक्टरवर पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इंडोनेशियाचे यश

इंडोनेशिया देशालाही महत्त्वाचे श्रेय द्यायला हवे. सन २०१३ मध्ये तेथील एका राज्याची मालकी असलेल्या साखर कंपनीने संस्थांच्या सहकार्याने अवर्षण सहनशील जीएम ऊस वाण विकसित करण्यात यश मिळवले. अवर्षण परिस्थितीत हा ऊस पारंपरिक वाणांच्या तुलनेत १० ते ३० टक्के साखर अधिक उत्पादन करू शकतो असा दावा करण्यात आला होता. सन २०१८ मध्ये तेथील सरकारने या वाणाला संमती दिली. मात्र संशोधनापुरताच मर्यादित राहिलेला हा देश या उसाची व्यावसायिक लागवड करण्यात अद्याप यशस्वी झालेला नाही.

Sugarcane GM Variety
Sugarcane GM Variety : पाकिस्तानात उसाच्या दोन जीएम वाणांना संमती

भारतातील जीएम ऊस संशोधन

जीएम ऊस संशोधनात भारतही मागे नाही. कोइमतूर (तमिळनाडू) येथील ऊस पैदास संस्थेने (शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट) अवर्षण सहनशील जीएम ऊस विकसित केला आहे. दुष्काळाला प्रतिकारक १८ इव्हेंट्स संस्थेकडे उपलब्ध होते. महाराष्ट्रासह देशभरात लोकप्रिय को ८६०३२ वाणातही या तंत्रज्ञानाचा प्रयोग झाला.

अर्थात, हे प्रयोग ‘ग्लासहाउस’ पुरते मर्यादित होते. संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. बक्षी राम सांगतात, की प्रत्यक्ष शेतातील चाचण्यांना संमती मिळविण्यासाठी २०१७ च्या सुमारास आम्ही सरकारकडे प्रस्ताव दिला. मात्र अनेक हरकतींतून त्यास जावे लागले असून, इतक्या वर्षांत त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. सरकारने नव्या तंत्रज्ञानाला चालना देणे गरजेचे आहे. संशोधन स्तरावर प्रोत्साहन आहे. मात्र प्रक्षेत्र चाचण्यांवरील संमतीसाठी जलद प्रक्रिया व निर्णय होणे गरजेचे आहे.

सुरक्षितता पाहूनच संमती हवी

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे म्हणतात, की इंडोनेशियाने विकसित केलेला जीएम ऊस प्रत्यक्ष पाहण्याची संधी दोन वेळा मिळाली. उसाचा प्रत्येक भाग खाण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे जीएम ऊस विकसित करताना मानवी आरोग्य, पर्यावरण, मधमाश्‍या यांना हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. तणनाशक प्रतिकारक वाण असेल तर चांगलेच. पण बीटीसारखे वाण अपायकारक ठरू नये याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. अधिक उत्पादनक्षम वाण ही शेतकऱ्यांची गरज केंद्रस्थानी असावी.

भारतातील जीएम पिकांवर दृष्टिक्षेप

बीटी कापूस हे व्यावसायिक लागवडीखाली असलेले भारतातील सध्या तरी एकमेव जीएम पीक.

बीजी वन व बीजी टू निष्प्रभ झाल्यानंतर गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तसेच तणनाशक सहनशील जीएम कापूस वाणाची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा.

भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) अंतर्गत देशातील संस्था तसेच खासगी उद्योगांकडून बीटी वांगे, बीटी हरभरा, भाजीपाला, भुईमूग व अन्य पिकांवर संशोधन. ‘गोल्डन राइस’ही चर्चेत होता.

दिल्ली विद्यापीठांतर्गत ‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लॅंट्‍स’ केंद्राकडून जीएम मोहरीचे वाण विकसित.

केंद्र सरकारकडून २०१६ मध्ये त्याच्या क्षेत्रीय चाचण्यांना संमती. मात्र पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर सार्वजनिक मते जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चाचण्यांना स्थगिती.

पुढे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (जीईएसी) पर्यावरणीय प्रसारणाची शिफारस. त्यामुळे पुन्हा व्यावसायिक लागवडीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. परंतु कापूस वगळता देशात कोणत्याच जीएम पिकास व्यावासायिक लागवडीसाठी अद्याप संमती नाही.

Sugarcane GM Variety
Sugarcane Variety : वैविध्यपूर्ण ऊस वाणांना परराज्यातूनही मागणी

अलीकडे संमतीपात्र जगातील निवडक जनुकीय पिके

(सन २०२१ ते २०२३ या काळातील)

जीएम गहू- ब्राझील-अवर्षण प्रतिकारक- मानवी आहारासह जनावरांच्या खाद्यासाठी.

नायजेरिया, कोलंबिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडकडूनही या गव्हाला संमती.

बीटी वांगे- शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीला प्रतिकारक. बांगला देशाकडून २०१३ मध्ये संमती. फिलिपिन्सकडून मानवी आहार, पशुखाद्य, प्रक्रियेसाठी अलीकडेच संमती.

कॅनोला- फिलिपिन्स- अन्न, पशुखाद्य व प्रक्रियेसाठी.

याच पिकातील तणनाशक सहनशील वाण- अमेरिका.

सोयाबीन- फिलिपिन्स- अन्न, पशुखाद्य व प्रक्रियेसाठी- सूत्रकृमी प्रतिकारक व तणनाशक सहनशील.

चवळी- घाना देश- कीटक प्रतिकारक वाण. आफ्रिकन ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी फाउंडेशनद्वारे विकसित.

मका- तुर्की- ग्लायफोसेट तणनाशकाला सहनशील. फिलिपिन्सकडूनही ग्लायफोसेट, ग्लुफोसिनेट ही तणनाशके तसेच प्रतिजैविकाला सहनशील व कीटक प्रतिकारक मका वाणाला मंजुरी.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड विद्यापीठाकडून जीएम केळीचे वाण विकसित. केळीचे हे जगातील पहिलेच जीएम वाण. ऑस्ट्रेलिया सरकारकडून लागवडीस संमती. पनामा रोगास उच्च प्रतिकारक.

जागतिक जीएम पिके

अमेरिका, ब्राझील व अर्जेंटिना हे जीएम पिके लागवडीत जगातील पहिल्या तीन क्रमांकाचे देश.

सोयाबीन, मका, कापूस, कॅनोला ही चार पिके अग्रस्थानी.

सन १९९६ मध्ये १.७ दशलक्ष हेक्टर असलेले जीएम पिकांखालील क्षेत्र २०१९ मध्ये ११२ पटींनी वाढून १९०.४ दशलक्ष हेक्टरपर्यंत पोहोचले.

जनुकीय संपादित पिके

जनुकीय संपादित पिकांमध्ये जगभरात सध्या ‘क्रिस्पर’ (CRISPR) हे तंत्रज्ञान वापरले जाते.

अमेरिकेतील एका कंपनीकडून त्याआधारे ब्लॅकबेरी फळाचे जगातील पहिले बिनबियांचे जनुकीय संपादित वाण विकसित.

फिलिपिन्स देशातही जीई केळीवर संशोधन सुरू.

इटलीतील मिलान विद्यापीठाने तेथील स्थानिक भातावर आधारित जीई वाणाच्या प्रक्षेत्र चाचण्या घेण्यापर्यंत प्रगती केली आहे.

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी ‘क्रिस्पर’च्या तुलनेत अधिक अचूकता देणारे जनुकीय संपादित तंत्रमाध्यम तयार केले आहे.

(माहिती स्रोत : इंटरनॅशनल सर्व्हिस फॉर द ॲक्विझिशन ऑफ ॲग्री बायोटेक ॲप्लिकेशन्स- आयएसएएए)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com