Sugarcane GM Variety : पाकिस्तानात उसाच्या दोन जीएम वाणांना संमती

Sugarcane Variety : पाकिस्तानमधील फैसलाबाद कृषी विद्यापीठाने उसाचे दोन जनुकीय सुधारित (जीएम) वाण विकसित करण्यात यश मिळविले आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Pune News : पाकिस्तानमधील फैसलाबाद कृषी विद्यापीठाने उसाचे दोन जनुकीय सुधारित (जीएम) वाण विकसित करण्यात यश मिळविले आहे. शेंडा खोडकीड (टॉप बोरर) प्रतिकारक व ग्लुफोसिनेट या तणनाशकाला सहनशील अशा या वाणांच्या व्यावसायिक लागवडीसाठी तेथील पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केली आहे.

यंदाच्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्येच पाकिस्तानातील ऊस उत्पादकांना त्याचे बेणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ब्राझील पाठोपाठ जीएम उसाच्या व्यावसायिक लागवडीस चालना देणारा पाकिस्तान हा जगातील दुसरा देश ठरला आहे.

Sugarcane
Sugarcane Farming : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे अन्नद्रव्यांचा वापर

सध्या जगभरात जनुकीय सुधारित (जीएम) तसेच जनुकीय संपादित (जेनेटिकली इडिटेड) पीक वाणांवर वेगाने संशोधन सुरू आहे. ऊस हे पीकही शास्त्रज्ञांच्या केंद्रस्थानी आहे. त्याच अनुषंगाने पाकिस्तानातील फैसलाबाद कृषी विद्यापीठाच्या कृषी जैवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी उसाच्या दोन ‘ट्रान्सजेनिक’ जाती विकसित करण्यात यश मिळवले आहे.

‘ॲग्रोवन’ला माहिती देताना विद्यापीठाचे प्रकुलगुरू व प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. मूहम्मद सरवार खान म्हणाले, की विकसित केलेल्या दोन वाणांपैकी एक वाण शेंडा खोडकीड (टॉप बोरर) या किडीला प्रतिकारक असून, सीएबीबी- आयआरएस असे त्याचे नाव आहे. तर सीएबीबी- एचटीएस या नावाचे वाण ग्लुफोसिनेट या तणनाशकाला सहनशील आहे. हे तणनाशक आंतरप्रवाही व बिना निवडक (पीक व तण असा भेद न करणारे) असले तरी त्याच्या वापराने जीएम वाण सुरक्षित राहणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनात झाला आहे.

Sugarcane
Sugarcane Variety : वैविध्यपूर्ण ऊस वाणांना परराज्यातूनही मागणी

शेतकऱ्यांना यंदाच होणार उपलब्ध

दोन्ही वाणांच्या व्यावसायिक लागवडीसाठी पाकिस्तानातील पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केली आहे. सध्या देशातील सार्वजनिक संस्था व शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मर्यादित स्वरूपात या वाणांची लागवड झाली आहे. यंदाच्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातील बहुतांशी ऊस उत्पादकांना त्यांचे बेणे उपलब्ध होणार आहे. उर्वरित बेणे पुढील वर्षी शेतकऱ्यांच्या हाती पडेल. प्रगतिशील ऊस उत्पादकांसह छोट्या शेतकऱ्यांनाही त्यांचा फायदा होणार असल्याचे डॉ. खान यांनी सांगितले.

पर्यावरणासाठी सुरक्षित

डॉ. खान म्हणाले, की लवकर पक्व होणारे व अधिक फुटवे देण्याची क्षमता असलेले हे जीएम वाण सजीव व पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत. गव्हाच्या काढणीनंतर एप्रिल- मे काळात त्यांची लागवड शेतकऱ्यांना करणे शक्य आहे. प्रति एकर बेणे वापरही अन्य नेहमीच्या वाणांपेक्षा कमी आहे. खाद्यप्रकारात ऊस हे या देशातील पहिलेच जीएम पीक ठरले आहे. ब्राझील हा जीएम उसाची व्यावसायिक लागवड करणारा जगातील पहिला देश असून, तेथे २०१७ मध्ये त्यास संमती मिळाली आहे. त्या दृष्टीने ब्राझीलनंतर पाकिस्तान हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com